इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न समारंभाशी निगडीत एक वेगळी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या घटनेची देशभरात चर्चा होत आहे. कारण, मिरवणुकीद्वारे नवरदेव लग्न घरी पोहचला. त्याचवेळी नवरीने विवाहास नकार दिला. त्यामुळे नवरदेवाला लग्नाविनाच परतावे लागले.
सीतापूर जिल्ह्यात निघासन नगरानजिकच्या एका गावात आलेली नवरदेवाची मिरवणूक लग्नाशिवाय परतली. कारण वधूने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या बाजूच्या मंडळींनी मुलाकडच्या मंडळीला जवळपास दोन तास एकाच जागी बसवून ठेवले आणि कुठेही जाऊ दिले नाही, असे मिरवणुकीत सहभागी मंडळींनी सांगितले. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच ते तेथे आले आणि नवरदेवाकडील मंडळींना अखेर सोडून देण्यात आले.
सीतापूर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या मुलासोबत निघासन शहरा जवळच्या गावातील मुलीचे लग्न ठरले होते. रात्री मुलीच्या बाजूची मंडळी साक्षगंध व साखरपुडा करून परत आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी नवरदेवाची मिरवणूक मुलीच्या गावात पोहोचली. त्याचवेळी त्यांना मोठा धक्का बसला. कारण, तेथे ना लग्नाची व्यवस्था होती, ना मिरवणुकांच्या मुक्कामाची व्यवस्था होती. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी लग्नास नकार दिला.
नवरदेवाकडील नातेवाईकांनी सांगितले होते की त्यांच्याकडे ३० बिघे जमीन आहे. मात्र वधूच्या मंडळींना सत्य कळले की, त्या मुलाकडे यापेक्षा खूप कमी जमीन आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. तसेच, मिरवणूक रद्द करून साखरपुड्यात दिलेली वस्तू परत करण्यास सांगितले. सुमारे दोन तास संपूर्ण मिरवणूक गावात अडवून ठेवल्याचे नवरदेव मुलाने सांगितले. याप्रकरणी पोलिसांशी फोनवर संपर्क साधल्यानंतर आलेल्या पोलिसांनी त्यांची सुटका केली. अखेर दोन्ही बाजूंमध्ये समेट झाल्यानंतर मिरवणूक परत पाठवण्यात आली.







