दरभंगा (बिहार) – कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे बिहारमध्ये सध्या लॉकडाउन लागू आहे. खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही ट्विट करुन लोकांना लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन केले. असे असूनही, काही लोक ऐकण्यास तयार नाहीत. कोरोना काळातील विवाह सोहळ्याचे आयोजन करणे एका कुटुंबाला खूप महाग पडले, इतके नव्हे तर कोरोना कुटुंबाच्या जिवावर बेतले. आतापर्यंत या कुटुंबातील चार लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना संक्रमणाची ५७८ नवीन प्रकरणे, ३३१२ सक्रिय प्रकरणे असताना या कुटुंबाने मोठ्या थाटात लग्न आयोजित केले होते. मिर्जापूरमध्ये राहणारे विपिन बिहारी चौधरी यांची मुलगी १६ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाली. या लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी नातेवाईक दूरवरुन आले होते.
दरम्यान, गेल्या २० ते २५ दिवसातच लग्नसमारंभात सहभागी झालेल्या चार नातेवाईकांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. लग्नानंतर चार दिवसांनी विपिन बिहारी चौधरी यांचे पुतणे कोरोनामुळे मृत्यू पावले. तसेच कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत कुटुंबातील आणखी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. चौधरी यांच्या कुटुंबातील नातू, पुतणे, सासरे आणि एक नातलग हे कोरोनामुळे मरण पावले आहेत. आता अन्य लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.