संदीप बत्तासे, हरसूल
भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये नानाविध गोष्टींचा समावेश असते. विविध प्रकारच्या प्रथा-परंपरा जपतानाच त्याला आधुनिकतेची जोड देण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावात असाच एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे नवरदेवाचे वऱ्हाड हे कुठल्याही वाहनातून नाही तर चक्क बैलगाड्यांमधून आले. त्यामुळे ही बाब आता राज्यभरात चर्चिली जात आहे.
पद्माकर कनोजे या तरुणाचा विवाह शिरसगाव येथील मोहनदास साबळे यांची कन्या विजया यांच्याशी होणार होता. इंधनाचे वाढते तर आणि खासकरुन आजोबांची इच्छा यामुळे वऱ्हाड नेण्यासाठी कुठल्याही यांत्रिक वाहनाऐवजी पारंपरिक अशा बैलगाड्यांची निवड करण्यात आली. त्यासाठी या सर्व बैलगाड्या सजविण्यात आल्या. २० पेक्षा अधिक बैलगाड्यांद्वारे हे वऱ्हाड शिरसगावात दाखल झाले. अत्यंत देखण्या आणि सजायवटीच्या या बैलगाड्या जात असल्याने रस्त्याने सारेच जण अवाक झाले. वऱ्हाडाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले आणि हा विवाह सोहळाही अत्यंत दिमाखात संपन्न झाला. त्यामुळे या सोहळ्याची पंक्रोशीतच नाही तर सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
बघा, वऱ्हाडाच्या आगमनाचा हा व्हिडिओ