विशेष प्रतिनिधी, मुंबई
आता मास्क हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मास्कमुळे बरेचदा चेहरा ओळखायला येत नाही. उद्या मात्र मास्क नसेल तर फोटो सुद्धा ओळखता येणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. पण हा मास्क सलग सात–आठ तास नाका–तोंडावर लावून ठेवल्याने त्याचेही दुष्परिणाम लोकांना जाणवू लागले आहेत. तासनतास मास्क नाकावर असल्यामुळे तोंडात दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी लोक करीत आहेत.
अशा प्रकारच्या समस्येला हेलीटॉटिस म्हणतात. काही रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये दिवसाला पाच ते सात रुग्ण हीच समस्या घेऊन येत आहेत. ज्यांच्या श्वासात पहिले कधीच दुर्गंध येत नव्हती, पण मास्क लावायला लागल्यापासून हा त्रास वाढला आहे, असे रुग्ण जास्त आहेत. अर्थात दंतरोगतज्ज्ञांनी हा स्थायी आजार नसल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी काही पारंपरिक व घरगुती उपायही सांगितले आहे. भोपाळ एम्स, हमिदिया, जेपी रुग्णालय येथील ओपीडीमध्ये सातत्याने या समस्या घेऊन येणारे रुग्ण वाढत आहेत.
ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नसल्याने आणि कार्बन डायआक्साईड पूर्णपणे बाहेर पडत नसल्याने हा त्रास होत आहे. भोपाळ एम्सचे दंतचिकित्सा विभागाचे सहप्राध्यापक डॉ. अंशुल राय यांनी सांगितले की, मार्च–एप्रिमध्ये कमीत कमी सात रुग्ण दररोज यायचे. यातील तिघांना तर दुर्गंधीचा त्रास जास्त होता. डॉ. अनुज भार्गव यांनी सांगितले आहे की, ज्यांना पूर्वीपासून पायरिया आहे, दात खराब आहेत किंवा मधुमेह आहे, त्यांना हेलिटॉटीसची समस्या जाणवत आहे.
काय करावे…
– ऑफिसच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत जाऊन दोन मिनीटांसाठी मास्क काढा व लांब श्वास घ्या.
– घरी आल्यावर मास्क काढल्यानंतर दात नक्की घासा व त्यानंतर भरपूर पाणी प्या
– जेवण झाल्यावर तोंड धुताना बोटांनी दात चांगले घासा
– दोन ते तीन वेळा बेटाडीनच्या गुळण्या करा