विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन आतापर्यंत केले जात होते. मात्र, कोरोनापासून बचावासाठी आता घरातही नागरिकांनी मास्क घालावा, अशी कळकळीची विनंती निती आयोगाने केली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी तसे स्पष्ट केले आहे. दैनंदिन आरोग्य स्थितीची माहिती डॉ. पॉल हे देत असतात. आज कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती देत असताना त्यांनी सांगितले की, अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नका. तुम्ही कुटुंबासोबत घरामध्ये राहत असतानाही मास्क घाला. मास्क घालणे अतिशय आवश्यक आहे. बाहेरच्या कुणालाही घरात बोलवू नका, असेही डॉ. पॉल यांनी बजावले आहे.
कोरोनाचा संसर्ग भारतात प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जगभरात ही बाब चर्चिली जात आहे. अनेक देश मदतीला धावून येत आहेत. देशातील सध्याची आरोग्यस्थिती पाहता कोरोनापासून बचावासाठी केवळ मास्क वापरणे हाच मुख्य आणि मोठा पर्याय आहे. तसेच, सतत हात धुणे, घराबाहेर न पडणे हे सुद्धा पर्याय आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे कसोशीने पालन करण्याची नितांत गरज येऊन ठेपल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मासिक पाळीत लस घ्यावी का
महिलांनी मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी का, याबाबत मोठा संभ्रम आहे. याप्रश्नाचे उत्तर देताना डॉ. पॉल म्हणाले की, मासिक पाळीच्या काळात महिला लस घेऊ शकता. लसीकरण लांबण्याचे काहीही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले
https://twitter.com/ANI/status/1386643943979319298