मुंबई – जगात अब्जाधीश आणि कोट्यधीश झालेल्या अनेक व्यक्ती आहेत. अशा व्यक्ती त्यांच्या पैशांनी अनेक घरे खरेदी करतात किंवा विक्री करतात. यामध्ये सांगण्यासारखे काय कौतुक आहे, असे तुम्ही विचाराल. पण सांगायचे तात्पर्य हे की कोट्यधीश व्यक्तीला घर घेणे सोपे असते. परंतु एक कुत्रा कोट्यधीश आहे आणि त्याला २३० कोटी रुपयांची मालमत्ता विकायची आहे. असे तुम्ही कधी ऐकले आहे का? ऐकले नसेल तर ही बातमी वाचा.
अमेरिकेतील फ्लोरिडाच्या मियामी भागातील एक मोठा बंगला विक्रीसाठी निघाला आहे. त्या बंगल्याचे मालक दुसरे तिसरे कोणी नसून, चक्क एक जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे. गंथर-VI असे या कुत्र्याचे नाव आहे. या कुत्र्याने २३० कोटी रुपयांची हवेली विक्रीसाठी काढली आहे. एकेकाळी हा बंगला हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका मॅडोनाचा होता.
काउंटेस कार्लोटा लिबेस्टिन नावाच्या महिलेचा हा बंगला होता. त्यांनी गंथर-VI चा पूर्वज गंथर-III या पाळले होते. काउंटेस कार्लोटा लिबेस्टिन यांच्याकडून गंथर-III याला ४३० कोटी रुपयांची मालमत्ता १९९२ रोजी वारसा हक्काने मिळाली होती. त्याच दरम्यान मालकीण काउंटेस कार्लोटा लिबेस्टिन यांचा मृत्यू झाला होता.
गंथर-III याच्यानंतर ही मालमत्ता गंथर-VI याच्या नावावर झाली आहे. गंथर-VI याच्यासह बंगल्याची काळजी घेणारी मोठी टीम आहे. त्याची खाणे-पिणे, दिनचर्या पाहण्यासाठी वेगळी माणसे ठेवली आहेत. गंथर-VI हा आपले आयुष्य अगदी श्रीमंत व्यक्तीसारखे जगत आहे.
हा बंगला मियामीमधील श्रीमंत व्यक्तींच्या परिसरात आहे. नऊ बेडरूम आणि आठ बाथरूम असलेल्या या बंगल्याच्या समोरील अंगणात मोठा जलतरण तलाव सुद्धा आहे. बंगल्यातील बैठकीत गंथर-VI चे सोनेरी रंगाने रंगवलेले सुंदर चित्र ठेवलेले आहे. या बंगल्यातून संपूर्ण मियामीचे सुंदर दृश्य दिसते.