नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कीर्ति कला मंदिर आयोजित नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पनांनी सजणारा नाशिककरांसाठी आनंद पर्वणी ठरणारा हा महोत्सव यंदा आम्ही मराठी हा नृत्याविष्कार सादर करणार आहे. २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी हा महोत्सव होणार आहे. शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता कालिदास कला मंदिर मध्ये रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणारा आम्ही मराठी हा नृत्याविष्कार कीर्ति कला मंदिराच्या नृत्यांगना सादर करणार आहेत. याचे नृत्य दिग्दर्शन आदिती पानसे आणि रेखा नाडगौडा या जोडगोळीने अर्थातच आदीरेखाने केले आहे. संगीत मधुरा बेळे यांचे आहे.
स्वातंत्र्यप्रियता, लढाऊ वृत्ती, चिकाटी, ज्ञानोपासना, हे मराठी माणसाचे विशेष गुण.तसच भावनेला कर्तव्या पुढे नमते घ्यायला लावण्या इतका तो कठोरही आहे. अशा या मराठी माणसाच्या प्रयोगशील, सर्वव्यापी,सर्वस्पर्शी, आणि तरीही आत्मनिष्ठ रूपाचा एक अखंड सौभाग्यवती प्रवाह पाहायला मिळणार आहे. मराठी माणसाचं राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान प्रतिबिंबित करणाऱ्या आम्ही मराठी या नृत्याविष्काराने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
शनिवार २२ ऑगस्ट महोत्सवाचे द्वितीय पुष्प सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात रंगणार आहे. मोहिनीअट्टम ही नृत्य शैली डॉक्टर कनक रेळे यांनी जगप्रसिद्ध केली. पद्मविभूषण डॉक्टर कनक रेळे यांच्या पट्ट शिष्या डॉक्टर माधुरी देशमुख या कनक रेळे यांचा नृत्य जीवनपट उलगडणारी चित्रफित दाखविणार असून या मोहक नृत्य शैलीतील बारकावे नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत. डॉक्टर माधुरी देशमुख यांनी नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून डॉक्टर कनक रेळे यांच्या मार्गदर्शनाखाली एम एफ ए ही पदवी संपादन केली. त्या आयसीसीआर च्या एमपेनल्ट आर्टिस्ट आहेत. भारतात आणि परदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत सुरसिंगार संसद हरिदास संमेलन, कोणार्क फेस्टिवल, संगीत नाटक अकादमी युवा महोत्सव,आयसीसीआर होरायझन सेरीज अशा अनेक मानाच्या महोत्सवातून रसिकांची दाद मिळविली आहे.
महोत्सवाची सांगता नृत्य गुरु पंडित राजेंद्र गंगाणी यांच्या प्रात्यक्षिकासह असलेल्या जयपुर घराण्यावरील व्याख्यानाने होणार आहे. रविवार २४ ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात हा सांगता समारोह संपन्न होणार आहे. गुरुवर्य कुंदनलालजी गंगाणी यांचे राजेंद्र जी सुपुत्र. वडील आणि गुरु या दुहेरी नात्यातून त्यांनी नृत्यकला आत्मसात केली. स्वतःची एक प्रतिभा संपन्न अशी शैली निर्माण केली. या जयपुर घराण्याच्या रचनांचे वैशिष्ट्य त्यातील वैशिष्ट्यपूर्णरचनांचे सादरीकरण असा अभ्यासपूर्ण कार्यक्रम नाशिककर अनुभवणार आहेत.
तसेच गुरुवर्य कुंदन लालजी यांच्या नृत्य प्रवासातील काही अनमोल क्षण चित्रफितीद्वारे रसिकांना, नृत्य प्रेमींना पाहायला मिळणार आहेत.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी कालिदास कला मंदिर, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी कुसुमाग्रज स्मारकतील विशाखा सभागृह अशा दोन ठिकाणी कीर्ति कला मंदिर आयोजित तीन दिवसीय नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव रंगणार आहे.ह्या संपूर्ण मोहोत्सवाचे सूत्र संचालन पियू आरोळे करणार आहे.नाशिककरांनी, नृत्यप्रेमीनीं, रसिकानी आवर्जून यावे असे आवाहन आयोजकानी केले आहे.