विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
‘गाव करील ते राव काय करील’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. कारण गाव म्हणजे ग्रामस्थांनी ठरवले तर विकासाचे शिखर गाठू शकतात. याचा प्रत्यय नुकताच एका ग्रामीण भागातील कामामुळे आला. गावकऱ्यांनी दृढनिश्चय केल्यास काहीही अशक्य नाही. हे शिमला जिल्ह्यातील कोटखाईमधील बखोल पंचायतीच्या अंतर्गत गावांतील लोकांनीही हे सिद्ध केले आहे. जलसंधारणासाठी त्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
पाण्याचे झरे आणि विहीरी कोरड्या होऊ लागल्या तेव्हा परिसरातील गावमधील लोकांनी मिळून डोंगरावरच्या जंगलात चार लाख लिटर क्षमतेचा मानवनिर्मित तलाव बनविला. विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून तब्बल ८ हजार फूट उंचीवर तयार झालेल्या या तलावामुळे आता कोरडे झरे, नाले, विहीरी आदि पुन्हा पाण्याने भरले आहेत. हा तलाव लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले असूून आजकाल मुले या तलावामध्ये बोटिंगचा आनंदही घेत आहेत.
स्थानिक रहिवासी आणि बागकाम करणारे आत्माराम चौहान आणि रामलाल चौहान यांनी २ वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या सहकार्याने व वनविभागाच्या परवानगीने कोटी जंगलात तलावाचे बांधकाम सुरू केले. मागीलहिवाळ्यात बर्फवृष्टी न झाल्याने हा तलाव पाण्याने भरला आहे. विशेष म्हणजे सुमारे ६ फूट खोल या तलावामध्ये बिलासपूरहून मासेही आणले गेले आहेत.
तलाव तयार झाल्यानंतर आसपासच्या सफरचंदच्या बागांमध्ये सिंचनाची समस्याही संपली आहे. बखोल पंचायतमधील बहुतेक गावे पाण्यासाठी पुरातन विहीरीवर अवलंबून असून गेल्या पाच वर्षांत सुमारे १२ विहिरी कोरड्या पडल्या होत्या, त्यानंतर आता डोंगरावर तलाव बनवून विहीरीमध्ये पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्यामुळे जिल्हयातील अन्य गावांसमोर आदर्श निर्माण झाला आहे.