पाण्याचा तुटवडा ; दोन महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा
नाशिक : म्हाडाने विकसित केलेल्या आडगाव येथील इमारतीत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. म्हाडाने विकसित केलेल्या ४४८ घरांच्या प्रकल्पात चार विंग पैकी डी विंगसह इतरही विंगच्या रहिवासीयांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रहिवासीयांनी अनेकदा म्हाडाला तक्रार देऊनही अद्याप कुठलीच उपाययोजना न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे. ४४८ घरांच्या या प्रकल्पात सध्या साडे तीनशे ते चारशेच सदनिका धारकांनी ताबा घेतला आहे. आणखीन सर्वांनी ताबा घेतला नसला तरीही पाण्याचा त्रास आहे. सर्व सदनिका धारकांनी ताबा घेतल्यानंतर हा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे म्हाडाने पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने आत्ताच पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. दोन महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की शहरी भागात वास्तव्यास असूनही जणू आपण पेठ – हरसूल अश्या दुर्गम भागातच रहात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता येथील नागरिक संयमाची भूमिका घेत असून प्रशासनाने वेळीच प्रश्न न सोडविल्यास यापुढे गंभीर पाऊले उचलावी लागतील असे नागरिकांनी सांगितले. म्हाडा व मनपा पाणीपुरवठा विभागाने लवकरात लवकर येथे गरजेनुसार योग्य व्यासाची पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करून घ्यावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता म्हाडा नाशिक यांच्याकडे केली आहे.