इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात अनेक चमत्कारिक घटना घडत असतात, वास्तविक पाहता बहुतांश वेळा यामध्ये अंधश्रद्धा असते, मात्र खरा शोध घेतला असता त्यामुळे काहीतरी वैज्ञानिक कारण आढळते. परंतु काही नागरिक कोणताही सारासार विचार न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि ती बघण्यासाठी गर्दी निर्माण होते आणि त्याला धार्मिक रंग दिला जातो. मग एखादा नंदी दूध पिण्याची घटना असो की आणखीन काही असो, सध्या मध्य प्रदेशातील एका गावात देखील अशीच घटना घडली आणि त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमा झाली. शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी नगरमध्ये सोमवारी सकाळी झाडावरून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचे पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. ते दृश्य पाहताच झाडाजवळ नागरिकांची गर्दी जमली.
झाडातून पाण्याचा प्रवाह येत असल्याचे पाहून आलेल्या नागरिकांमध्ये अचानक श्रध्दा जागृत झाली. गंगामाईचा जयघोष करत झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची भाविक पूजा करू लागले. काही सुशिक्षित तरूणांनी जवळ जाऊन पाहिले तर त्यातून स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्यानंतर पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी गंगा मैया की जयच्या जयघोषात प्रार्थना केली.
याबाबत गोपी जाटव सांगतात की, सकाळपासूनच झाडातून बाहेर पडणारे पाणी थांबलेले नाही. काही जणांनी गंगामाईचा चमत्कार असे वर्णन केले आहे. त्याचवेळी पोहरीचे एसडीएम बी. नादिया सांगतात की त्यांनाही झाडावरून पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली आहे. तपासानंतर खरे प्रकरण स्पष्ट होईल. ज्या झाडावरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे ते झाड वर्षांनुवर्षे जुने असून वर्षांनंतर झाडाची मुळेही पोकळ असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. झाडाच्या आजूबाजूला जमिनीत पाण्याची पाइपलाइनही टाकल्याचे लोक सांगतात. शक्यतो फुटलेल्या पाण्याच्या पाईपमधून बाहेर पडणारे पाणी झाडाच्या मुळांच्या साहाय्यानेही बाहेर येऊ शकते, असेही नादिया सांगतात.
Water Flowing from tree citizen crowd