इंडिया दर्पण विशेष लेखमाला
आपलं पर्यावरण
जलसंस्कॄतीचे वैभव – तलाव
पाणी पुरवठ्यापासून तर सिंचनापर्यंत आणि धार्मिक विधींपासून तर आग विझविण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून, अशा विविध कारणांसाठी नैसर्गिक अथवा मानव निर्मित तलाव जतन करण्याची वा निर्माण करण्याची वैभवशाली परंपरा भारतीय इतिहासात पदोपदी जाणवते. लक्षात येते. हळूहळू काळ बदलत गेला आणि या जलाशयांचा उपयोग पर्यटनासाठीही होऊ लागला. मानव निर्मित जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आणि जमिनीत ते मुरण्याची प्रक्रिया लक्षात घेता जलसाठा अधिक काळ टिकविण्यासाठी देखील आपले पूर्वज विचार, संशोधन करीत असत, याचेही दाखले मिळतात. दगडांचा वापर करून तलाव बांधले जाण्याचा प्रयोग त्याचाच भाग मानला जातो. कालांतराने पायऱ्या, बागबगिचे, कला शिल्प, काठावरील बसण्याची आकर्षक व्यवस्था या बाबींतून तलावांच्या सौंदर्यीकरणाची कल्पना साकारू लागली.

जल अभ्यासक
मोबाईल – 9822380111
इतिहासातील काही नोंदी ध्यानात घेतल्या तर पूर्वजांनी जलसंवर्धनाबाबत केलेल्या दखलपात्र कामांची कल्पना येईल. खान्देशी फड पद्धतीच्या सिंचन प्रकल्पांची निर्मिती जिरे माळी समाजातील लोकांनी १३ ते १५ व्या शतकाच्या दरम्यान केली होती. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील अक्षरशः शेकडो तलावांची निर्मिती गोंड राजाच्या काळात कोहळी या आदिवासी समाजातील लोकांनी स्वतःची संपत्ती खर्च करून आणि मजुरी करुन केली. बीडजवळची खजिना विहीर १५७२ साली तयार करण्यात आली होती. जवळच्या पहाडी भागातून या विहिरीत पाणी संकलित करण्याची व्यवस्था हे या विहिरीचे वैशिष्ट्य. असं म्हणतात की, दोनशे पेक्षा अधिक हेक्टर जमिनीचे सिंचन या विहिरीतील पाण्याने त्याकाळी होत असे.
मंदिराच्या उभारणीसाठी जमीन खोदताना निघालेल्या दगडांचा वापर करून पुष्करणी तलावांची निर्मिती तर प्रचलित धार्मिक कार्य ठरले होते एकेकाळी. पहाडांवरून वाहून येणारे पाणी अडवून दौलताबाद किल्ल्यासमोर तयार करण्यात आलेले जलाशय असो की, सातपुडा पर्वतराजीत भिल्ल या आदिवासी समाजातील लोकांनी पहाडावरून वाहून जाणारे पाणी दगड व मातीचे बंधारे बांधून अडवून धरत निर्माण केलेली कित्येक धरणे असोत, नैसर्गिक जलाशयांच्या पलीकडेही मानवी समुहाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत चिंतन आणि कॄती केली असल्याचे यातून स्पष्ट होते. अगदी, युद्धकाळात पाणी अधिक लागेल याचा किंवा संभाव्य दुष्काळाचा विचार करून अतिरिक्त, राखीव जलसाठे त्याकाळी तयार केले जात.
आपली जलसंस्कॄती किती श्रीमंत होती याचे दाखले देणारी अनेक उदाहरणे सापडतात. जलसंस्कॄतीचे तेच वैभव पुन्हा निर्माण करण्याची आज गरज आहे. तलाव, विहिरी या अशा बाबी आहेत की त्याचे निर्माण मानव करू शकतो. राजेरजवाड्यांनीच नव्हे तर, अशिक्षित मानल्या गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांनी सुद्धा या बाबतीत प्रभावी उपाय केलेले दिसतात. नद्यांचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून शेताकडे वळविण्याचा प्रयत्न करून सिंचन व्यवस्था साकारण्याच्या कल्पनेपलीकडची उपयोगिता तलावांची आहे. आजुबाजुची जमीन सिंचनाखाली येणे हा तर त्याचा स्वभाविक परिणाम आहे. पण पिण्यापासून तर धार्मिक विधी, पर्यटनापर्यंतचे त्याचे अन्य विविध उपयोग देखील आहेत. बरं, केवळ जलाशये निर्माण करून आपली पूर्वकालीन मंडळी थांबली नाही, तर पाणी वापराचे नियोजन, त्यासाठीची नियमावली, नियमभंग करणाऱ्यांना दंड, अशा सर्वच बाबतीतली तरतूद हेही जुन्या काळातील पाण्याच्या वापराबाबतचे वैशिष्ट्य राहिले आहे. पाण्याबाबत राजे, लोक, व्यवस्था, प्रशासन किती जबाबदारीने वागायचे, याची उदाहरणे शेकडोंच्या संख्येत असताना अलीकडच्या काळातील पाण्याबाबतचे लोकांचे बेजबाबदार वर्तन चिंताजनक ठरावे इतके निम्नस्तरीय आहे. पूर्वजांच्या उज्ज्वल परंपरेला छेद देणारही आहे.
पाण्याची गरज भागविणाऱ्या, जलपूर्तीची क्षमता असलेल्या तलावांची निर्मिती ही लोकचळवळ होऊ शकेल का, याचा विचार व्हायला हवा. पूर्वजांनी निर्माण केलेली जलसंवर्धनाची रीत आणि एकूणच जलसंस्कॄती आज जपली गेली नाही तर पुढील पिढ्यांसमोर आगामी काळात उभ्या टाकणाऱ्या संभाव्य समस्यांना जबाबदार कोण असेल, याचे वेगळ्याने उत्तर देण्याची गरज आहे? नदी, समुद्र, झरे, ओढे ही निसर्गाची देण आहे, त्यांची निर्मिती मानवी मर्यादेपलीकडची आहे. पण तलाव? तलावांची निर्मिती, निर्माणा नंतरची त्याची देखभाल, जपणूक, ही तर मानवाला शक्य असलेली बाब आहे. त्या बाबतीत विचार का होऊ नये?
डॉ. प्रवीण महाजन,
जल अभ्यासक,
डाॅ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन.
सदस्य – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत ‘चला जाऊया नदीला’ राज्यस्तरीय सदस्य, महाराष्ट्र शासन.
Water Conservation Lake Importance by Pravin Mahajan