गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्म त्यागून हिंदू धर्म स्विकारला आहे. त्यानंतर त्यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘मला इस्लाममधून काढून टाकल्यानंतर दर शुक्रवारी माझे डोके कापण्याचा फतवा काढला गेला असता आणि त्यासाठीचे बक्षिसही वाढविले असते. म्हणून मी सनातन धर्म स्वीकारला. माझ्या कुटुंबातील ज्या व्यक्ती हिंदू धर्म स्विकारणार नाहीत, त्यांचा मी त्याग करीन, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले आहे.
नामकरणानंतर आता ते जितेंद्र नारायण झाले आहेत. ते म्हणाले की, पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले. त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा माझा निर्णय होता. मी सर्व धर्म वाचले. त्यात मला हिंदू धर्म सर्वोत्तम वाटला. तो मानवतेचे रक्षण करतो, असे त्यांनी नमूद केले.
या संदर्भात यती नरसिंहानंद म्हणाले की, वसीम एक मानवतावादी आणि धैर्यवान व्यक्ती आहे. सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर काहीही संकट येणार नाही. माझ्या वडिलांचे तिसरे पुत्र म्हमून जितेंद्र नारायण यापुढे ओळखले जातील, असे त्यांनी जाहीर केले.
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात झालेल्या धर्मांतरावर उलामांचे म्हणणे आहे की, रिझवी यांचे धर्मांतर आश्चर्यकारक नाही. कारण त्यांना आधीच इस्लाममधून नाकारण्यात आले होते. त्यानंतर ते मुक्त होते. आता ते कोणता धर्म स्वीकारतात हे महत्त्वाचे नाही.
जमियत दावतुल मुसलमीनचे संरक्षक आणि प्रसिद्ध अलीम-ए-दीन मौलाना कारी इशाक गोरा म्हणाले की, आमच्या धर्मात कोणतीही जबरदस्ती नाही. आपला देश हा लोकशाही देश आहे, इथे प्रत्येकाला आपापल्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे, पण कुणाच्याही धर्मावर टीका करण्याची परवानगी नाही.