विशेष प्रतिनिधी, मुंबई :
राज्यात यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने पावसाळ्याच्या सुरुवातीस दिला होता. त्यानुसार यंदा तीन महिने काही ठिकाणी सरासरी आणि अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परंतु काही भागात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून कोकण, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात तर मोठी हानी झाली आहे. आता पावसाळा संपायला केवळ पंधरा दिवस बाकी असताना हवामान खात्याने आणखी चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या महिन्यात काही ठिकाणी पावसाने काहीशी ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत होता, परंतु त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले. आता गणेश विसर्जनानंतर म्हणजेच रविवारी आणि सोमवारी राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच खानदेशातील काही भागात तसेच मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळाला. पण आता राज्यात पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.
उद्या म्हणजेच रविवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अन्य ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रविवारपासून पुढचे तीन दिवस साधारणत : राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहेत. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजेच नाशिक सह खान्देशातील बहुतांशी भाग आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यात राज्यातील अनेक भागात पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. कापूस, केळी, ऊस या नगदी पिकांबरोबरच उडीद, मूग आणि भाजीपाल्याचे सारखी पिके पाण्यामुळे पिवळी पडली. त्यातच आता पुन्हा पाऊस आल्याने कडधान्य पिके काढण्यास अडचण निर्माण होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. परंतु काही भागात पाऊस लांबल्यास दिवाळीपूर्वी पिके काढणे शक्य होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामे करावी अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.