अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लाखो अँड्रॉइड वापरकर्त्यांवर धोक्याचं सावट आहे. आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम वापरकर्त्यांसाठी एक नवीन इशारा जारी केला असून त्यात या अँड्रॉईड वापरकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दला आहे.
रिस्पॉन्स टीमने विशेषतः अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११, अँड्रॉईड १२ आणि अँड्रॉईड १२ एल वापरकर्त्यांसाठी हा इशारा दिला आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक असुरक्षा नोंदवण्यात आल्या आहेत, ज्याचा कोणीतरी फायदा घेऊन तुमचे डिव्हाइस पूर्णपणे हॅक केले जाऊ शकते. तसेच संवेदनशील माहिती आणि इतर सेवांचा गैरवापरही केला जाऊ शकतो. यातून आपल्या गोपनीय माहितीची चोरी होणे, आपण बँकिंगसंदर्भात घेत असलेल्या सेवा थेट बंद करण्याचे प्रकार हॅकर्स करु शकतात. या असुरक्षा अँड्रॉईड ओएस फ्रेमवर्क, मीडिया फ्रेमवर्क, सिस्टम घटक, कर्नल एलटीएस, मीडियाटेक, क्वॉलकॉम आणि क्वॉलकॉम क्लोज्ड सोर्स या घटकांमधील त्रुटींमुळे निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या त्रुटींमुळे हॅकर्सला फोनमधील गोपनीय माहिती काढण्यात यश मिळू शकते. संवेदनशील माहिती ते सहजपणे उघड करू शकतात. तसेच सुरक्षित राहण्यासाठी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने तुमचा स्मार्टफोनसाठी उपलब्ध अँड्रॉईड ओएसच्या लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. सेटिंग्जमध्ये जाऊन फोन सहजपणे अपडेट करता येईल.
DoS हल्ला म्हणजे काय?
डिनायल ऑफ सर्विस (DoS) हल्ला हा एक सायबर सुरक्षा धोका आहे यापासून धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा वापरकर्त्याला डिव्हाइस किंवा नेटवर्कचा वापर करणे अशक्य होते. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचा स्मार्टफोन DoS हल्ल्यात असेल तेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरू शकणार नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, या प्रकारच्या हल्ल्यांमुळे चोरी किंवा माहिती जाण्यासह इतर नुकसान होत नसल्याचेही समोर आले आहे