वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचा प्रकार संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. पुणे येथे अशा घटना एकापाठोपाठ घडत असताना वर्धा येथेही असाच प्रकार घडला आहे.
लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरुन प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. या आरोपीने मित्रासह दुचाकीवरुन हातात ज्वलनशील द्रव्य असलेली शिशी घेऊन पीडितेचा पाठलाग सुरु केला. तसेच त्याच्याकडील ज्वलनशील पदार्थाची शिशी फेकून मारली. सुदैवाने ज्वलनशील द्रव्याचे काही थेंब तरुणीच्या मानेवर पडल्याने ती किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी आरोपी विकृतास अटक केली असून तर मित्राचा शोध सुरु आहे.कृष्णनगर परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तरुणीचे आणि आरोपी कस्तुबचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या आई वडिलांनी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिला. मागील एका वर्षांपासून आरोपीसोबत तरुणीचे कोणतेही संबंध नव्हते. मात्र, तरीही आरोपी वारंवार तरुणीला भेटण्यासाठी बोलवत होता. याच रागातून दुपारच्या सुमारास तरुणी तिच्या खोलीजवळील किराणा दुकानाकडे जात असताना आरोपी कौस्तुब सेलवटे हा त्याच्या एका मित्रासह दुचाकीने तिचा पाठलाग केला. यावेळी कौस्तुबच्या हातात ज्वलनशील द्रव्याची शिशी असल्याने तरुणी भीतीपोटी पळू लागली.
तरुणीच्या मानेचा भाग जळाला
तरुणी पळत असतानाच कौस्तुबने त्याच्या हातातील द्रव्य तिच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने द्रव्याचे काही थेंबच तरुणीच्या मानेवर पडल्याने मानेचा काही भाग जळाल्यासारखा झाला. ही सर्व बाब तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी कौस्तुब सेलवटे व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी कौस्तुब सेलवटे याला अटक केली तर त्याच्या मित्राचा शोध रामनगर पोलीस घेत आहे.