वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी असते तिथे सर्वाधिक दारू प्यायली जाते, असे निदर्शनास आले आहे. पण पिणाऱ्यांना त्यासाठी कमालीचे कष्ट घ्यावे लागतात. अश्या ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा सडा पडला तर काय होईल..? कल्पनाही करवत नाही ना? अगदी कल्पनेच्या पलीकडची घटना दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात घडली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सहवासाने पावन झालेला जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वर्धा मार्गानेच पुढे जातो. या समृद्धी महामार्गावरून जाताना नीलगाय वाचविण्याच्या प्रयत्नात एक ट्रक उलटला. ट्रक पलटी झाला तोपर्यंत चालकाचे काय झाले असेल याची चिंता लोकांना होती. पण ज्या क्षणी ट्रकमधून बिअरच्या बाटल्या बाहेर पडल्या त्या क्षणी लोकांचा संयम सुटला आणि बॉटल घेऊन पळण्यासाठी लोकांनी धावा केला. अनेकांनी बॉटल घेत पळ काढला. वर्धा जिल्ह्यातील महाकाळ शिवारात पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
रस्त्याशेजारी बिअरच्या बॉटल्स पडलेल्या दिसताच लोकांनी धाव घेतली आणि हाती येतील तेवढ्या बॉटल्स घेऊन लोक पळू लागले. नागपूरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक होता. हा ट्रक औरंगाबाद एमआयडिसीतून बिअरच्या बॉटल्सचे बॉक्स घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. वर्धा शेजारी असताना ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावर अचानक मोठी नीलगाय आडवी आली. ट्रक चालकाने नीलगायिला वाचविण्यासाठी जोरदार ब्रेक दाबला. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक पलटी झाला आणि त्यातील बॉटल्स सगळ्या रस्त्यावर पडल्या.
दहा लाखांचे नुकसान
चालकाने करकचून ब्रेक दाबल्याने ट्रक पलटी झाला आणि त्यातून बिअरच्या बॉटल्सचे बॉक्स खाली पडले. त्यातून बाटल्या घरंगळत बाहेर पडल्या. या अपघातात ट्रकचे आणि मालाचे मिळून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सेलू पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.
वेगावर पाळत ठेवणार
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग खुला झाला त्या दिवसापासून सातत्याने मोठे अपघात होत आहे. या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे. पण आता अपघात रोखण्यासाठी ज्या वाहनांचे टायर्स कालबाह्य झालेले आहेत, त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारला जाणार आहे. तर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ओव्हरस्पीडवर पाळत ठेवली जाणार आहे.
Wardha Liquor Ban District Beer Truck Overturned Accident