वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या आदेशाने महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या वतीने वर्धा जिल्ह्यात देखील काल १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त युवा संवाद, एक हात मदतीचा, महसूल अदालत, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. सप्ताह कालावधीत महसूलच्या सेवा जास्तीत जास्त नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. मात्र महसूल दिनाचा कार्यक्रम जोरात सुरु असतानाच देवळी येथील जनतेचे सेवक समजले जाणारे निवासी नायब तहसीलदाराने कार्यक्रम आटोपताच शेतकऱ्याकडून ३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून देवळी येथील तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तब्बल १० हजारांची मागणी
राज्यात महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी १ ऑगस्टपासून महसूल महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जनतेची कामे जलद गतीने व्हावीत आणि त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होऊ नये असा यामागील उद्देश आहे. परंतु जनतेचे सेवकच आता शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचे दिसून येते. अटक केलेल्या लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव किशोर शेंडे (वय ५१) असे आहे. वर्धा येथील मास्टर कॉलनी येथील रहिवासी तक्रारदार शेतकरी यांचे आपसात वाटणीपत्र तयार करण्याचे काम होते. त्यासाठी तो वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा मारत होता. मात्र, सदर वाटणीपत्र तयार करण्यासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे याने १० हजार रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीत ८ हजार रुपयांत गुप्त व्यवहार पक्का झाला. सर्वत्र महसूल दिवस साजरा होत असतानाच नायब तहसीलदार शेंडे याने तक्रारदाराला तहसील कार्यालयात पैसे घेऊन बोलाविले. तक्रारदाराने जवळील तीन हजार रुपयांची रक्कम शेंडे याला देताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात अटक लाच स्विकारताना नायब तहसीलदारास अटक केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
wardha bribe corruption crime acb trap revenue department
Farmer Nayab Tahasildar