इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
वाॅर इफेक्ट!
युद्धाचा विविध क्षेत्रांवर होतो तसा पर्यावरणावरी मोठा परिणाम होतो. पर्यावरणाच्या क्षेत्राचे आतोनात नुकसान होते. विशेष म्हणजे, हे नुकसान कधीही भरुन न निघणारे असते. ते कसे हे आता आपण जाणून घेऊया…
वातावरण दूषित करणाऱ्या, पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या विविध मुद्द्यांचा सतत विचार होतो. अलीकडे तर तो अधिक गांभीर्याने होऊ लागला आहे. निसर्गचक्रापलीकडे या प्रदूषणासाठी प्रामुख्याने मानवी कॄतीच अधिक जबाबदार आहे, हे देखील आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर युद्धाच्या परिणामांचा विचार मात्र फारसा होत नाही. कारण युद्ध ही दोन देशांमधील किंवा कोणत्याही दोन गटांमधील आपसी बेबनावाचा स्वाभाविक परिणाम असल्याच्या निष्कर्षावर येत, फारतर जगात शांतता नांदावी म्हणून युद्ध थांबविण्यासाठीचे प्रयत्न होतात.
पण युद्धाच्या, पर्यावरणावरील विपरीत परिणामांची चिंता वाहत, एखादे युद्ध थांबविण्यासाठीचे प्रयत्न कुणी कधी केल्याचे ऐकिवात नाही. जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण, क्लायमेट चेंज, वाढते तापमान वगैरे विषयांवर उपाययोजनांकरिता वैश्विक मोहीमा सुरू असतानाही अगदी अलीकडच्या रशिया-युक्रेन युद्धात देखील कुणी, युद्धाच्या पर्यावरणावरील दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त केल्याचे स्मरत नाही.
पण, इतिहास आणि या संदर्भातील अभ्यास मात्र हेच सांगतो. युद्धबंदी हा अमन- शांतीसाठीचा पर्याय तर आहेच पण तो पर्यावरण रक्षणासाठीचा देखील एक हमखास उपाय आहे. पण त्या अंगाने युद्धाचा वा युद्धबंदीचा विचार फारसा होताना दिसत नाही. युद्ध वाईटच. त्याचे परिणाम तर अधिक घातक. युद्धात माणसं मारली जातात. संपत्तीची हानी होते. साधन-संसाधने नष्ट होतात. या पलीकडे निसर्ग आणि पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते.
विशेषतः अलीकडे युद्धात जी न्युक्लिअर आणि रासायनिक आयुधं वापरली जाताहेत, त्याचे वातावरणावरील परिणाम अतिशय घातक आहेत. त्यामुळे एकूणच इकोसिस्टीमवर, पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो आहे. गेल्या दोन-अडीच शतकांचा विचार केला तरी, पहिले-दुसरे महायुद्ध, व्हिएतनामचे युद्ध, रावदान, कोसोवो, गल्फ युद्ध, इराण-इराकमधील युद्ध, ९/११ नंतर अमेरिकेने इराकवर केलेला हल्ला आणि अगदी परवा परवाचा रशिया -युक्रेन दरम्यानचा संघर्ष…अशी भलीमोठी यादीच तयार होईल वेगवेगळ्या युद्धांची. या शिवाय, समान सीमारेषा असलेल्या देशांमधील आपसातील संघर्ष, बाॅम्बस्फोट, गोळीबार आदी बाबी तर आहेतच.
व्हिएतनाम युद्धाच्या भीषण व दाहक परिणामांच्या कथा आजही अंगावर शहारे आणतात. तो केवळ, त्या देशाचे सैन्य पराभूत करण्याचा प्रयत्न नव्हता तर तिथली शेतं, जंगलं अशी निसर्ग संपदा संपवण्याचा देखील तो प्रयत्न होता. त्या युद्धात अमेरिकेने तब्बल दोन कोटी गॅलन हर्बीसाईड्सचा वापर त्यासाठी केला होता. शेतातील उभी पिके, हिरवेगार जंगल सारेच भक्ष्यस्थानी पडले होते. आज इतकी वर्षे झाली ते युद्ध संपून, पण व्हिएतनाम मधील कालच्या उपजाऊ जमिनीचे आज उजाड माळरानात झालेले रुपांतर, तिथल्या जंगलातील कमी
झालेल्या पशु-पक्षांच्या प्रजाती, अन्य जीव-जंतूंवरचे युद्धाचे दुष्परिणाम…सारंच हताश करणारं आहे.
अफ्रिकेत तर युद्धात हरवलेल्या ईकाॅलाॅजीच्या पुनर्स्थापनेसाठी विशेष मोहीम राबवावी लागली आहे. कारण युद्धानंतर तिथे झाडांपासून तर पशु-पक्षांच्या अनेक प्रजातींचे प्रमाण चिंताजनकरित्या कमी झाले होते. कुवैती तेलावर दावा सांगण्यासाठी अमेरिकन सैन्याने १९९१च्या युद्धात सरळ समुद्रात तेलाचे तवंग पसरवण्याचा आणि नंतर त्या तेलाला आग लावून देत भर समुद्रात आगीचे लोळ उठविण्याचा केलेला उपद्व्याप, सारं जग हतबलपणे बघत होता… कित्येक महिने पेटत राहिलेल्या त्या आगीचे समुद्रातील जीवनसॄष्टीवर काय परिणाम झालेत, पाण्याचे तापमान किती वाढले, किती मासे मेले, किती जलवनस्पती संपल्या…अनेकानेक अनुत्तरीत प्रश्न त्या युद्धाने निर्माण केलेत. एकूण काय तर, युद्ध, त्यात वापरली जाणारी शस्त्रे, बव्हतांशी घातक परिणाम करणारी आयुधं, मारली जाणारी माणसं… निसर्गचक्र बिघडवणारे त्याचे दुष्परिणाम…थांबायला हवे आता सगळेच.
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक मोबाईल – 9822380111
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय
समिती सदस्य,(महाराष्ट्र शासन).
War Effect on Environment Article by Pravin Mahajan