इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला स्वत:चे लष्कर उभे करायचे होते. त्यासाठी त्याने पाकिस्तानची मदत घेत तेथून शस्त्रे मागविल्याची माहिती पुढे आली आहे.
अमृतपाल सिंगला आपल्या अमृतपाल टायगर फोर्स आणि आनंदपूर खालसा फोर्सच्या सदस्यांना एके ४७ आणि एके ५६ चे प्रशिक्षण द्यायचे होते. इतकेच नाही तर फरारी अमृतपाल सिंग पाकिस्तानच्या निवृत्त मेजरच्या मदतीने आपल्या साथीदारांसाठी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैन्य तयार करण्याचा विचार करत होता.
धोकादायक शस्त्रांची ही खेप जम्मू-काश्मीरमधील एका तस्कराच्या माध्यमातून अमृतपाल सिंगपर्यंत पोहोचणार होती. विशेष म्हणजे, अमृतपाल सिंगला शस्त्रांची डिलिव्हरी मिळाली होती की नाही, याबाबत अद्याप सस्पेंस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांची कारवाई शस्त्रास्त्रांची खेप मिळण्यापूर्वी किंवा त्यादरम्यान सुरू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पंजाब पोलिस अधिकाऱ्यांनी आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आहे.
नऊ राज्यांमध्ये शोध
अमृतपाल सिंगच्या प्रकरणात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या ३५३ जणांपैकी १९७ जणांची पंजाब पोलिसांनी सुटका केली आहे. यातील अनेकांवर पोलिसांनी रासुका लावला होता. पोलिसांनी १८ मार्च रोजी अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली, तेव्हापासून तो फरार आहे. पोलिसांना चकमा देऊन तो वारंवार फरार होत आहे. अमृतपाल सिंगचा ९ राज्यांमध्ये शोध सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.
Wanted Amritpal Singh Weapons Pakistan Connection