पुणे : राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा यंदा २६ सप्टेंबर रोजी होणार असून या परीक्षेसाठी १७ मे पासून १० जून पर्यंत या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसीच्या आदेशाने दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणार आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. सदर परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी आयोजित केली जाणार होती, मात्र कोरोना संसर्गामुळे ती लांबणीवर पडली होती. आता विद्यापीठाकडून ३७ व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. २६ सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण १५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षेविषयीची अधिक माहिती ttp://setexam.unipune. ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची सांगितले.
दरम्यान, राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोविड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश, यूजीसीने दिले आहेत. प्राध्यापक, शिक्षक , विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा, अशा सूचनाही यूजीसीने दिल्या आहेत. तसेच कोविड टास्क फोर्सद्वारे शक्य होईल तितकी मदत करावी आणि समाजामधील विविध घटकांचं समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात युजीसीचे अध्यक्ष डॉ.डी पी सिंह यांनी विद्यापीठांना पत्र पाठवले असून राज्यातील सर्वच विद्यापीठात कोविड हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.