नाशिक : शून्यातून विश्वनिर्मिती करणार्या यशस्वी उद्योजकांची नावे बिलगेटस्, मार्क झुकेरबर्ग, स्टीव जॉब्स या उद्योजकांच्या रांगेत घेतली जातात. अर्थात हे यश मिळवताना व्यवसायात जोखीम पत्कारावी लागते. जे जोखीम पत्कारतात तेच यशाचे शिखर गाठताना किर्ती रचतात, असे प्रतिपादन संगमनेर येथील मालपाणी ग्रुपचे संचालक गिरीष मालपाणी यांनी केले. लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सन्मित्र आयकॉन पुरस्कार व ‘यशोगाथा’ पुस्तक प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे येथील प्रेसिकॉम्पचे संचालक मनोज शिरोडकर, मंडळाचे अध्यक्ष भुषण महाजन, विश्वस्त मधुकर ब्राम्हणकर, ज्ञानेश्वर धामणे, संजय येवले, उपाध्यक्ष शरद धामणे, सरचिटणीस रविंद्र राहुडे, समिती प्रमुख निलेश मकर, प्रशांत शिरूडे, सचिन बागड, गिरीष महाजन आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गिरीष मालपाणी म्हणाले की, ‘व्यवसाय करताना सिस्टीम, वेळेचे नियोजन याचा विचार करायलाच हवा. व्यवसायाची चेन निर्माण केल्यास, प्रगतीचे मार्ग सापडत जातात. त्याचबरोबर वेळेचे नियोजन केल्यास, आणखी विचार करण्याला चालना मिळते. मात्र हे सर्व करत असताना समाजाला अग्रस्थानी ठेवायला हवे. बर्याचदा व्यवसायात पुढे जाताना समाजाचा विसर पडतो. परंतु जेव्हा आपण अडचणीत असतो, तेव्हाच समाज मदतीला धावून येतो, ही बाब सदैव स्मरणात ठेवायला हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मनोज शिरोडकर म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाने बाजी मारली आहे. दूर शिक्षणात तर क्रांतीच घडली आहे. डिजिटल प्रणालीचा व्यवसायातही मोठा समावेश झाल्याने, विदेशात बसून तंत्रज्ञानाची दुरुस्ती करणे शक्य झाले आहे. शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने झाल्याने, जग जवळ येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिकांसाठी जगभरातील बाजारपेठेचे अंतर कमी झाल्याने, त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. स्वत:ला दररोजच्या कामातून मोकळे करून नव्या विचारांना चालना द्यायला हवी, आपल्यातील विद्यार्थी हा नेहमीच जागरूक ठेवल्यास, व्यवसायात झेप घेणे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी वाणी समाजातील शुन्यातून विश्व निर्माण करणार्या ४४ उद्योजकांच्या ‘यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर या उद्योजकांचा यावेळी सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भुषण महाजन यांनी केले. सूत्रसंचालन अमित उपाध्ये आणि प्रतिभा वाणी यांनी ती आभार निलेश मकर यांनी केले.
या उद्योजकांचा केला सन्मान
संगीता दशपुते, पुंजाराम नेरकर, अमर वाणी, प्रदीप कोठावदे, तुषार वाणी, दिपक वाणी, आशिष शिनकर, अविनाश कोठावदे, राजेंद्र कोठावदे, डॉ. सुभाष ढोमणे, मधुकर ब्राम्हणकर, रवी दशपुते, योगेश दशपुते, राहुल वेढणे, बाळासाहेब खानकरी, प्रकाश शिरुडे, दिपक बागड, संदीप येवला, अशोक सोनजे, संजय पाटकर, लक्ष्मण अमृतकर, दिलीप वाणी, सुभाष येवला, सुरेश बागड, रविंद्र शिरूडे, अनिल अमृतकर, किशोर शिनकर, देविदास शिरूडे, विजय शिरूडे, भरत येवला, अनिल कोठावदे, रवी अमृतकर, स्मिता वाणी, शशिकांत दशपुते, रत्नाकर वाणी, गणेश येवला, संजय भामरे, सुरेश मुसळे, सुनिल धामणे, रूपेश वरखेडे,संजय महाजन, शैलेश मुसळे, भुषण सोनजे, संजय अमृतकर यांचा सन्मान कण्यात आला.