नाशिक – गोदावरी नदीची उपनदी असलेली वालदेवी नदीला प्रचंड प्रदूषणाने ग्रासले आहे. सद्यस्थितीत प्रदुषणामुळे वालदेवी नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. त्यामुळेच वालदेवीचे पात्र सध्या फेसाने भरलेले दिसत आहे. त्यातच वालदेवीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी आहे. परिणामी, वालदेवी नदी काठावरील सर्वच गावे सध्या या दुर्गंधीने ग्रासलेली आहेत. भगूरसह अनेक गावांमध्ये सध्या डेंग्यू, चिकन गुनियासह अनेक साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. एकीकडे वालदेवीची दुर्गंधी आणि दुसरीकडे साथीच्या आजारांमुळे ग्रामस्थ बेजार झाले आहेत. या सर्व प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी उदय थोरात, राहुल बोराडे, संदीप नागरे, नंदकिशोर गायकवाड, अर्जुन टिळे, संतोष भामरे, विजय देशमुख, तेजस पाठक, संजय कोल्हे, प्रकाश लोंढे आदींनी केली आहे. वालदेवीच्या प्रदूषणाबाबत वारंवार आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उदय थोरात व राहुल बोराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.