विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरातून उद्भवलेले ‘यास ‘ चक्रीवादळ वायव्य दिशेने वेगाने जात धोकादायक बनत चालले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या चोवीस तासांत याचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुंपातर होण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी सकाळी ‘यास ‘ हे प. बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात पोहोचेल.
दरम्यान ओडिशामधील बालासोर पारादीप आणि बंगालमधील सागर बेटा दरम्यान चक्रीवादळ येणार असून नॅशनल डिजायर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) तसेच बंगाल आणि ओडिशाच्या राज्य सरकारांसह नौदल, हवाई दल आणि केंद्रीय संस्था आदिंनी या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. नौदलाने मदत कार्यांसाठी चार युद्धनौका आणि काही विमाने तयार केली आहेत, तर हवाई दलाचे ११ वाहतूक विमान आणि २५ हेलिकॉप्टरसह तयार राहणार आहेत.
कोलकातास्थित क्षेत्रीय हवामान खात्याचे उपसंचालक संजीब बंडोपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी ओडिशा किनाऱ्यावर येताना यासचा वेग ताशी ९० ते १०० किमीचा असेल. बंगालमधील बालासोर आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आगमन होताना चक्रीवादळाचा वेग १४५ ते १५५ किमी प्रति तास असेल बालासोरसह उत्तर ओडिशा आणि पूर्व मिदनापूरच्या किनारपट्टी भागात दोन ते चार मीटरच्या लाटा समुद्रात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ओडिशा सरकारने बचाव आणि मदत पथक मोठ्या संख्येने बालासोरला पाठवले आहेत. खोल व सखल भागातील मोठ्या प्रमाणात लोकांना हलविण्याचे काम मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण केले जाईल. याशिवाय कटक, पुरी, खुरा, नायगड आणि ढेंकनाल येथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक भागात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या टीमसह १५० अग्निशमन दलाचे आणि ३५ झाडे तोडण्याचे पथक तैनात केले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सूचनेनुसार सचिव स्तरावरील पाच वरिष्ठ आयएएस अधिकारी मदत व बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की चक्रिवादळ होण्याची शक्यता असलेल्या २० जिल्ह्यांमध्ये ४००० मदत शिबिरे उघडली गेली आहेत. १० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. ५१ आपत्ती व्यवस्थापन पथके तयार केली गेली आहेत. राज्य सचिवालयात हे नियंत्रण कक्ष उघडण्यात आले असून, ४८ तास या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. किनारपट्टी भागात लाऊडस्पीकरद्वारे लोकांना सतर्क केले जात आहे. रेल्वे स्थानक आणि कारच्या शेडमध्ये साखळ्यांनी गाड्या बांधल्या आहेत. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने २५ ते २७ मे दरम्यान विविध गाड्या रद्द केल्या आहेत.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यास चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम किनारपट्टी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. तसेच त्याचा परिणाम तामिळनाडू, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही दिसून येण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त झारखंड आणि केरळच्या किनारपट्टीच्या भागांवरही वादळाचा परिणाम होऊ शकतो. या काळात जोरदार वारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ वादळ यास मुळे आसाम आणि मेघालयातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार,२६ आणि २७ मे रोजी अनेक राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.