इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ६५ वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना सहाय्य साधने आणि उपकरणांसाठी अनुदान मंजूर झाले आहे. काही लाभार्थ्यांच्या आधारकार्ड आणि बँक खाते तपशीलातील किरकोळ तफावतीमुळे अनुदान जमा होण्यास विलंब झाला असला, तरी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समाजकल्याण विभागाने लाभार्थ्यांना सुलभ मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून, ती जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ jalgaon.gov.in वर समाजकल्याण विभागाच्या वेबपेजवर उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना आपले आधारकार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात किंवा समाजकल्याण विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२३१८४७६७ वर सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त योगेश प्रविणसिंग पाटील यांनी केले आहे.
लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही कागदपत्रे सादर करून अनुदान प्राप्त करण्याची संधीचा लाभ घ्यावा, असे पाटील यांनी सांगितले. समाजकल्याण विभाग लाभार्थ्यांना त्वरित सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहे!








