मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंधदेखील लागू होत आहेत. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले आहेत.
येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास आधीपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर पासून प्रचार, प्रसार व जाहिरात याबाबत असणारे निर्बंध आणि घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी काटेकोरपणे काळजी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरोधात संबंधित कायदा व नियमांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.