नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संतांचे अभंग, भक्तीगीते, भारुडांनी भारावलेले सभागृह आणि पारंपरिक वेशभूषेतील बालकलावंतांचे सुमधूर स्वर असा अफलातून मिलाफ नागपूरकर भाविक-श्रोत्यांनी अनुभवला. निमित्त होते ‘विठू माझा लेकुरवाळा’ या संगीतमय कार्यक्रमाचे.
सरगम संगीत अकादमी जुना सुभेदार ले-आऊट यांच्या वतीने आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्षानिमित्त पंढरीचा पांडुरंग आणि संत मालिकेतील संताच्या जीवनकार्यावर आधारित द्रूकश्राव्य असा नागपुरातील २५० बालकलावंतांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा संगीतमय कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला. एकाहून एक भक्तीगीतांनी मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी कलावंतांना उत्स्फूर्त दाद दिली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गायिका यामिनी पायघन यांनी पसायदान सादर केले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील हभप अनिल महाराज अहिर आणि नाट्यक्षेत्रातील देवेंद्र दोडके यांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण दटके, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, नेहा लघाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, चोखामेळा, गोरा कुंभार, संत जनाबाई, जगद्गुरू तुकाराम महाराज, नामदेव महाराज आदी संतांचे अभंग व त्यांची भक्तीगीते, भारुड, दिंडी आदी सादर करण्यात आले. बालकलाकारांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भूमिका साकारल्या. तसेच महाराष्ट्रातील संतांचे जीवनकार्य दृकश्राव्य स्वरूपात बालकलावंतांनी सादर केले. ‘अशा दर्जेदार कार्यक्रमाच्या माध्यमातून बाल कलावंताना रंगमंचावर सादरीकरणाची संधी तर मिळतेच, शिवाय महाराष्ट्रातील संत परंपरेची गोडीही लागते. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या कार्यक्रमातून हा उद्देश नक्कीच पूर्ण होईल,’ असा विश्वास सौ. कांचनताई गडकरी यांनी व्यक्त केला. तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून सरगम संगीत अकादमीच्या बाल कलावंतांना यापुढे मोठा रंगमंच देण्यात येईल, असा विश्वास प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. श्रीरंग वराडपांडे यांची होती. तर निर्मिती-दिग्दर्शन सरगम अकादमीचे संचालक भरत नरुले यांचे होते. काव्य लेखन आणि संहिता – डॉ. राजेंद्रजी नाईकवाडे यांचे होते. कार्यक्रम संरक्षक – डॉ. संजय भक्ते व प्रणव हळदे यांचे असून तेजस्विनी कोमलकर, अंजली वानखेडे, बादल बोंडे यांनी गाणी सादर केली. नाट्यसंयोजन – अमृता बहातकर व अल्का नरुले तर नृत्य दिग्दर्शन – श्रीकांत धबडगावकर, संगीत संयोजन – श्रीकांत पिसे यांचे होते. वादक कलावंतामध्ये ऑर्गन -सौरभ किल्लेदार, तबला – श्री प्रमोद बावणे,सुयोग देवलकर, बासरी – अरविंद उपाध्ये, मृदंग – आशिष गायधन/तेजस सांभरे, मायनर – विक्रम जोशी, टाळ – कुणाल फुलझेले, अभिषेक घुसे, आदींनी साथसंगत केली.
या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून ओम सच्चीदानंद बिल्डर्स बेसा आणि सच्चिदानंद बिल्डर्स त्रिमूर्ती नगर, श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी संस्था रेशिमबाग, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरगम संगीत अकादमीचे पुष्पा मदनकर, माधवी जुननकर, मेघा घिमे, अपर्णा कल्लावार, मेघा खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.