नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्शियन आखातात लांब पल्ल्याच्या प्रशिक्षण तैनातीचा एक भाग म्हणून, प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन आयएनएस तिर आणि आयसीजीएस वीरा या युद्धनौका १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बहरीनच्या मनामा बंदरात दाखल झाल्या. नौदल सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने भारतीय नौदल आता रॉयल बहरीन नौदल दलासोबत विविध समुद्री संचालन आणि सर्वोत्तम अनुभवांच्या देवाणघेवाणीवर चर्चा करण्यास सज्ज झाले आहे. या बंदर भेटी दरम्यान व्यावसायिक परस्परसंवाद, एकमेकांच्या जहाजांवर भेटी, संयुक्त प्रशिक्षण सत्रे, योग सत्रे, बँड मैफिली, मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धा, सामाजिक परस्परसंवाद आणि समुदाय कल्याण उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
दोन्ही नौदलांच्या संचालन संघामध्ये सागरी भागीदारी सरावाचे नियोजन आणि आयोजनाबाबत एक समन्वय बैठक देखील होणार आहे. दुसर्या बंदर भेटीत, प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन आयएनएस शार्दूल यूएईच्या दुबई येथील रशीद बंदरात दाखल झाले. जहाजाचे स्वागत भारतीय दूतावासातील संरक्षण अधिकारी आणि यूएई नौदलातील अधिकाऱ्यांनी केले. या भेटीदरम्यान, हे जहाज विविध प्रशिक्षण उपक्रम आणि बंदरावरील परस्परसंवादात सहभागी होणार आहे.
बहरीन आणि यूएईला प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रनची तैनाती केवळ समुद्र प्रशिक्षणार्थींना विविध नौदल प्रशिक्षण उपक्रमांशी परिचित करून देण्यावर भर देणारी नाही, तर सामाजिक, राजकीय, लष्करी आणि समुद्री संबंधांना पुढे नेण्याचा देखील प्रयत्न करणारी आहे. ही भेट भारताच्या बहरीन आणि यूएईसोबतच्या वाढत्या संरक्षण संबंधांचे संकेत देणारी आणि सागरी सुरक्षा सहकार्य तसेच नौदलांमधील समन्वय वाढवणारी आहे.