इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्हिजन नाशिक
लॉजिस्टिक कॅपिटल ऑफ इंडिया
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मा. केंद्रिय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी नाशिक मधील एका कार्यक्रमामध्ये असे आवाहन केले होते कि, “नाशिक हे भारताचे मध्यवर्ती स्थान असून, भविष्यात नाशिक देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ व्हावे आणि त्यासाठी ‘ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ ने पुढाकार घ्यावा.” आपणांस नक्कीच प्रश्न पडला असेल कि ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणजे काय? आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकचे महत्व कसे? चला आपण जाणून घेऊया.
‘मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क्स’ (MMLP) हा केंद्र सरकारचा एक प्रमुख धोरणात्मक उपक्रम आहे, जो रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) अंतर्गत ‘राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड’ (NHLML) तसेच ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ (NHAI) द्वारे चालवला जातो. ‘मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क’ हे एक ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल असून त्याद्वारे संपूर्ण मालवाहतुकीचा एकूण खर्च आणि वेळ कमी करणे, गोदाम (स्टोरेज) खर्च कमी करणे, देशाच्या एकूण मालवाहतूक (ट्रान्सपोर्ट) उद्योगामुळे होणारे वाहनांचे प्रदूषण तसेच ट्रॅफिकची समस्या कमी करणे, ज्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता सुधारते, व्यवसायांच्या वाढीसाठी नवीन संधी निर्माण करून अर्थव्यवस्था वाढविणे आणि रोजगार निर्मिती करणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे आहेत.
लॉजिस्टिक पार्क मध्ये औद्योगिक किंवा कृषी उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, उत्पादित मालाच्या साठवणूक, ग्रेडिंग आणि वितरणासाठी साठी लागणारी गोदामे, शीतगृहे, कार्गो – फ्रेट स्टेशन, ट्रक टर्मिनस, वे-ब्रिज, वर्कशॉप, मुनष्यबळ, मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, संबंधित शासकीय कार्यालये, कौशल्य विकास केंद्र, आय-टी सेवा, पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशन्स, हॉस्पिटल्स, बॅंक्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, इत्यादी विविध प्रकारच्या सुविधा असतील.
दळणवळणाच्या पारंपरिक व्यवस्थेमध्ये, मालवाहतूक व साठवणूक या क्षेत्रात भारताचा तळाशी ४४ वा क्रमांक असून २०३० पर्यंत तो प्रगत २५ देशांच्या रांगेत आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच सध्या मालवाहतुकीच्या खर्च जीडीपीच्या साधारण १३ ते १४ टक्के इतका येत असून हा खर्च कमी करून तो एकअंकी करण्याचा राष्ट्रीय मालहाताळणी (नॅशनल लॉजिस्टिक पॉलीसी) धोरणाचा उद्देश आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पायाभूत सुविधांसाठी महत्वाकांक्षी अशी ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली आहे. भारत सरकार या कार्यक्रमासाठी सुमारे १०७ लाख कोटी रुपये खर्च करणार असून ‘मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी’ साठी केंद्र सरकारचा हा राष्ट्रीय मास्टर प्लॅन गेम चेंजर ठरणार आहे.
गती शक्ती योजनेअंतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचे एकात्मिक जाळे तयार केले जाणार आहे. या योजने अंतर्गत भारतमाला, सागरमाला, बंदरे, आर्थिक क्षेत्र, रेल्वे, हवाई कनेक्टिव्हिटी यासारख्या पायाभूत योजनांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत औद्योगिक कॉरिडॉर उभारले जातील, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर, फार्मा क्लस्टर, टेक्सटाईल क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क तयार करण्याचेही लक्ष्य निश्चित करण्यात आलेय.
‘मुंबई, पुणे आणि नाशिक’ ह्या सुवर्ण त्रिकोणामधील नाशिक हे एक वैशिष्ट्यपूर्ण कोण असून सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर आहे. नाशिकचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे नंतर सर्वात जास्त आहे. नाशिक हि कुंभनगरी असूनही, औद्योगिक प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा आहे. नाशिक मधील सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी इत्यादी विविध औद्योगिक वसाहतींमध्ये साधारण पाच हजारांहुन अधिक उद्योग यशस्वीरित्या सुरु आहेत. नाशिक जिल्ह्यात साडेसतरा हजारांहून अधिक उद्योग आहेत.
भारतमाला परियोजने अंतर्गत निर्माण होणारा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे, मुंबई – नागपुर समृद्धी महामार्ग, प्रस्तावित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे, प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश होणाच्या संभावनेने एकूणच नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई आणि पुण्यात औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी वाव नाही त्यामुळे येत्या काळात नाशिक हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे प्रमुख औद्योगिक केंद्र ठरणार, हे निश्चित.
याशिवाय नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा कृषी जिल्हा असून येथे जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जातात. नाशिकची द्राक्षे, कांदे, टमाटे, डाळिंब ह्यासाठी केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. नाशिक मधून दररोज हजारो टन ताजा हिरवा भाजीपाला मुंबई आणि इतर ठिकाणी पुरवठा होत असतो. इतकेच नव्हे तर नाशिक विविध प्रकारची फुले आणि भरड धान्ये (मिलेट्स) साठी देखील प्रसिद्ध आहे. नाशिक मध्ये साधारण ५० वाईनरी असून नाशिकची वाईन संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. निफाड मध्ये होऊ घातलेला ‘ड्रायपोर्ट’, लॉजिस्टिक पार्क, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि हवाई मार्गाच्या माध्यमातून नाशवंत भाजीपाला, फळे, कृषि उत्पादने, व उद्योजकांच्या मालाची निर्यात सुकर आणि वेगवान होण्यास मदतच होईल. शिवाय निर्यातवाढीतून रोजगाराची निर्मिती होईल आणि विकासाचे नवीन दालन उघडेल.
आपल्याकडे ‘लॉजिस्टिक कॉस्ट’ हि एक मोठी समस्या असून डिझेल इंधनाच्या अधिक वापरामुळे वाहतुकीचा खर्च तर वाढतोच शिवाय प्रदूषणही होते. प्रगत देशांमध्ये दळणवळणाचा खर्च ८ ते १० टक्क्यांच्या आसपास असून आपल्याकडे मात्र १६ टक्के आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन, बायोडिझेल, मिथेनॉलचा वापर, सीएनजीचा वापर वाढवून लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल असे अशी अपेक्षा आहे.
‘मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क्स’ मुळे एकूण वाहतूक खर्च आणि वितरणासाठी लागणारा वेळ कमी करून भारताच्या ‘लॉजिस्टिक’ क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता आहे. इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांप्रमाणेच, जेव्हा अंमलबजावणीचा प्रश्न येतो तेव्हा आव्हाने तर आहेतच, परंतु प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास ‘लॉजिस्टिक’ क्षेत्रामध्ये भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास मदत होईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या महत्वपूर्ण घोषणेनुसार, नाशिकची वैशिष्ट्ये आणि भौगोलिक स्थान पाहता येणाऱ्या काळात काश्मीरहून कन्याकुमारीला सोलापूर किंवा नाशिक मार्गे जाणे शक्य होणार आहे. त्यामुळेच लवकरच नाशिकची उत्तर ते दक्षिण थेट अशी कनेक्टिव्हिटी असेल. नाशिकची एकूण क्षमता पाहता नाशिक निश्चितच आयात आणि निर्यातीचे एक महत्वपूर्ण केंद्र होऊ शकते आणि केवळ ट्रान्सपोर्ट असोसिएशन नव्हे तर सर्व औद्योगिक, शेतकरी, व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांनी एकत्रितपणे सकारात्मक प्रयत्न केल्यास नाशिक देशाचे “लॉजिस्टिक कॅपिटल” देखील होऊ शकते, ह्याबद्दल शंका नाही.
नाशिककरांनो आपणास काय वाटते? नक्की कळवा.
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी (सहलेखक – विशाल जोशी)
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Vision Nashik Nashik Logistic Capital of India by Piyush Somani