नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पुणे येथील पी. वाय. सी. सी. जिमखाना येथे दिनांक २५ ते २८ जुलै दरम्यान एस. बी. ए. करंडक महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या विश्वजित थवील याने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून १५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात विजेतेपद तर दुहेरी प्रकारात उपविजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकाविला. या स्पर्धेत विश्वजीतला प्रथम मानांकन मिळाले होते. एकेरीचा रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात विश्वजितने आपल्या दर्जाला साजेसा खेळ केला.
या स्पर्धेतील पुणेच्या दुसऱ्या मानांकित खेळाडू चिन्मय फणसे विरुद्ध खेळतांना पहिल्या सेटमध्ये २०-२० बरोबरीनंतर सयंमाने खेळ करत हा सेट २२-२० असा जिंकून आघाडी मिळविली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये चिन्मयने आक्रमक खेळ करत दुसरा सेट २१-१० असा सहज जिंकत १-१ बरोबरी साधली.तिसऱ्या सेटमध्ये चुरशीच्या लढतीत विश्वजीतने मोक्याच्या क्षणी सुंदर ड्रॉप टाकून हा सेट २१-१९ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नांवे केले. दुहेरी प्रकारातही नाशिकचा विश्वीजीत थवील आणि द्वितीय मानांकित रायगडचा मयुरेश भुक्ती यांनी चांगला खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम लढतीत पुणेच्या प्रथम मानांकित सयाजी शेलार आणि छत्रपती संभाजीनगरच्या उदयन देशमुख विरुद्ध खेळतांना विश्वीजीत आणि मयुरेश भुक्ती यांनी चांगला खेळ केला. परंतु त्यांना पहिला सेट २१-१७ असा गमावावा लागला. तर दुसऱ्या सेटमध्येही चांगल्या प्रयत्नानंतर त्यांना हा सेटही २१-१५ असा गमवावा लागला आणि उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विश्वजीत थवीलने याआधी १३ वर्षे गटामध्ये मागील वर्षी एकेरी आणि दुहेरीचे महाराष्ट्राचे विजेतेपद मिळविले होते. तर दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. याचप्रमाणे मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्याशालेय राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षे गटामध्ये उपविजेतेपद पटकावले होते.
विश्वजीत नाशिकच्या दिल्ली पब्लिक स्कुलचा विद्यार्थी असून तो गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक मकरंद देव यांच्याकडे एच. पी. टी. कॉलेजच्या कोर्टवर बॅडमिंटनचे नियमित धडे घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल गोखले शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस डॉ. दीप्ती देशपांडे, शैलेश गोसावी, क्रीडा संचालक डॉ. सुनील मोरे यांनी अभिनंदन केले.