उद्धवस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…
पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर (रूई) यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ या वास्तूचा लोकर्पण सोहळा शुक्रवार दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.१५ वा. लातूर जिल्ह्यातील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई) या ठिकाणी होणार आहे. अशी माहिती या वास्तूचे संकल्पक, संरचना, नियोजक व निर्मितीकार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली.
या सोहळ्याला सन्माननीय प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र व माजी खासदार सुनील शास्त्री असतील. अध्यक्षस्थानी संत वृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर तसेच माजी केंद्रीय मंत्री व जम्मू काश्मीर राजघराण्याचे वारसदार डॉ.करण सिंह शुभाशीर्वाद देण्यासाठी असतील.
सत्य, शांती, अहिंसा, प्रेम आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या, मानवी इतिहासातील काही उत्तुंग व पथदर्शी व्यक्तिमत्वाच्या चैतन्यदायी प्रतिकांची या ठिकाणी प्रतिष्ठापना आणि पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी रोमन कॅथोलिक चर्च चे माजी बिशप फादर फेलिक्स मचाडो, मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे माजी कुलपती डॉ. फिरोज बख्त अहमद व अमेरिका येथील चिंतक व अभ्यासक मायकेल गनेल हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील.
तसेच सन्माननीय पाहुणे म्हणून भंते राहुल बोधी, महंत रामदास, योगी अमरनाथ, श्रीमती कमलाताई गवई, महाराज परमवीर सिंह, डॉ. मेहेर मास्टर मूस, डॉ. एडिसन सामराज, डॉ. प्रकाश महानवार, इझीकेल मळेकर, मौलाना अन्सारी चतुर्वेदी, डॉ. बिनी सरीन, डॉ. संजय देशमुख, डॉ.लेसन आझादी, वाहिदमियाँ चिस्ती, सौ. पुष्पाताई बोंडे, आचार्य रतनलाल सोनग्रा व सरदार मानजितसिंह खालसा हे उपस्थित म्हणून राहणार आहेत.
महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील रामेश्वर (रूई) हे गांव यज्ञभूमी म्हणून परिचित आहे. याच गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जवळपास २७५ वर्षापूर्वी उध्वस्त केलेल्या श्रीराम मंदिराच्या जागी सुंदर अशा मकराना मार्बलमध्ये श्रीराम मंदिर व सुमारे ६३ वर्षापूर्वी उध्वस्त करण्यात आलेली जामा मस्जिद व ख्वाजा जैनुद्दिन चिश्ती दर्गा यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी विश्वधर्मी राम रहीम मानवता सेतूची उभारणी, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाची उभारणी करण्यात आली आहे.
अशा विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक स्वरूपाच्या उपक्रमांमुळे रामेश्वर रूई खर्या अर्थाने मानवता तीर्थ आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मनातील आदर्श गाव म्हणून उदयास आले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन या वास्तूचा लोकर्पण सोहळा आहे.
भारताची विश्वात्मक संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा अनुभव देणार्या या दिव्य वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती आमदार रमेश कराड, रामेश्वर (रूई) चे सरपंच सचिन कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड, अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीचे विश्वस्त हभप तुळशीराम दा. कराड, प्रगतिशील शेतकरी हभप काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, डॉ. विरेंद्र घैसास, राजेश कराड व समस्त विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रूई ग्रामस्थांनी केले आहे.







