पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साता-यामध्ये जानेवारीत होणा-या ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली. या पदासाठी कोसलाकार भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे यांच्या नावाची चर्चा होती. पण, नेमाडे यांनी याअगोदरच नकार दिला. ही निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत झाली. महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही घोषणा केली.
आज सकाळी ११ वाजता ही बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली होती. त्यात रंगनाथ पठारे, विश्वास पाटील, बाळ फोंडके यांचे नाव आघाडीवर होते. पण, यात विश्वास पाटील यांची वर्णी लागली.
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिध्द व लोकप्रिय कांदबरीकार आहेत. त्यांनी एेतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारीत अनेक प्रभावी कांदब-या लिहिल्या आहेत. पानिपत ही त्यांची सर्वाधिक गाजलेली एेतिहासिक कादंबरी आहे. हे संमेनल १ ते ४ जानेवारी २०२६ रोजी साता-यातील शाहू स्टेडियम येथे होणार आहे.