गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2025 | 8:12 pm
in मुख्य बातमी
0
IMG 20250131 WA0354 1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत आणि देशातून, राज्यातून, परदेशातून आलेल्या साहित्यिक, मराठीप्रेमींच्या प्रचंड उत्साहात उद्घाटन झाले.

आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीतील आपले अभिजात साहित्य पुढच्या पिढीकरिता कसे नेता येईल यादृष्टीने चॅट-जीपीटी सारखे एखादे ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

फर्ग्यूसन महाविद्यालय येथे संमेलनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचे मनापासून आभार मानतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हा दर्जा देण्याचे भाग्य लाभले असा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रमाण मराठीच्या माहेरघरी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होत आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पुढील महिन्यात पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, ही देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

वयाच्या चौथ्या वर्षी साहित्याच्या निर्मितीला सुरूवात करुन अजूनही वयाच्या 93 व्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार देताना आनंद होत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या संमेलनाला महाराष्ट्रातून, इतर राज्यातून, परदेशातून मराठीप्रेमी, साहित्यिक आले असून मराठी भाषा विभागाने खऱ्या अर्थाने हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचे केले आहे. जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे मराठी माणूस पोचलेला नाही. दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे गेलो असता तेथील एका चिमुरड्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुंदर म्हणून दाखवले हे पाहून अभिमान वाटला की मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही, आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

भाषा ही भावना व्यक्त करण्याचे साधन, संपर्काचे साधन असते आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचे देखील साधन असते. म्हणूनच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे राज मान्यता मिळाली आहे. मराठी भाषा ही अभिजात होतीच, प्राचीन भाषा होतीच परंतु कुठल्याही भाषेला राज मान्यता मिळणे देखील महत्त्वाचे असते. मोगलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती; त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढून स्वराज्याची भाषा मराठी भाषा करुन मराठीला राजमान्यता देण्याची खऱ्या अर्थाने सुरूवात केली.

मराठीची मुळे खोलवर गेलेली आहे. आपली मराठी भाषा काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी तिची गोडी वाढतच जाते. किंबहुना मराठीच्या बोलीभाषांत निर्माण झालेले साहित्य, त्याचे प्रकार व बोलीभाषातील काव्य आदींची गोडी वेगळीच असून मनाला अतिशय मनाला भावनारे असल्याचे पहायला मिळते.

मराठी माणूस हा कधीही स्वार्थी राहिला नाही. पानिपतच्या लढाईत मराठे हे आपले साम्राज्य वाढवण्याकरता नव्हे तर भारताचे रक्षण करण्याकरता गेले होते. त्यावेळी मराठ्यांनी दिल्ली जिंकल्यानंतर अहमदशहा अब्दालीने तहाचा लखोटा दिला होता की पंजाब, सिंध आणि मुलतान दिल्यास उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा राहील. पण मराठ्यांनी संपूर्ण अटकेपर्यंतचा भारत हे हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचा राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे अशी भूमिका घेतली आणि ते पानिपतमध्ये लढले. ही ताकद, क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यात तयार केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकोबारायांनी आपल्याला दिला होता तो वैश्विक विचार मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे. या विचारामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्था अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे.

संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग असो, संत चोखा मेळा यांचा सामाजिक समतेचा संदेश, संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या त्याचे कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांमध्ये एक दुवा म्हणून काम करत होती.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हा जो नारा दिला किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये स्फूरण दिले. दादासाहेब फाळके यांनी सिने सृष्टीची निर्मिती केली, गान कोकिळा लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर आदी अनेक नावांची मांदियाळी आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मराठी असल्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना येतो. या संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसाला हीच मराठीची परंपरा पुढे नेण्याचीच नव्हे तर जगभरात मराठी जगवायची, टिकवायची, समृद्ध करायची आहे अशा प्रकारची साद देखील घालत आहोत.

आज देशाच्या पाठीवर ज्या रंगभूमींनी खऱ्या अर्थाने नाट्य संस्कृती टिकवली आहे. त्याच्यामध्ये पहिले नाव आपल्या मराठी रंगभूमीचा आम्हाला घ्यावं लागेल. हे जे काही सगळे आपल्या मराठी माणसाने जतन करून, संवर्धन करून ठेवले आहेत ते पुढे नेण्याकरता आपण सर्वजन या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. त्यासाठी आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रचारासाठी करायचा असतो. असा प्रयत्न मराठीला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करण्याचा करत असताना स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करुन आपले अभिजात साहित्य पुढील पिढीला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध होईल असा प्रयत्न मराठी भाषा विभागाने करावा.

इंग्लंड मधील मराठी मंडळाला त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात आवश्यक ती मदत येत्या पंधरा दिवसांमध्ये निश्चितच देण्यात येईल. तसेच दिल्लीतली मराठी शाळा देखील अव्याहत चालल्या पाहिजेत याकरितादेखील महाराष्ट्र शासन आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मराठी तितुका मेळवावा…’ असे सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. माझी भाषा अभिजात आहे, ही भावनाच अभिमान निर्माण करणारी आहे. आपली भाषा प्राचीन आहे, आजही प्रचलित आहे. माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं, हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केले. त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हे विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचाच हा महाकुंभमेळा आहे, असेही ते म्हणाले.

मराठी भाषेला जवळपास २ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे आपण केंद्राला सिद्ध करून दिले. त्यासाठी साहित्य परिषदेने एक मोठा पुरावा केंद्राला सादर केला होता. जुन्नर तालुक्यातला नाणेघाटातील लेणीमध्ये दगडी भिंतींवर कोरलेला सातवाहन शिलालेख हा तो मौल्यवान पुरावा असून तो आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरला, असे श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

फेब्रुवारीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत असताना विश्व मराठी संमेलन कशाला अशी टीका काही ठिकाणी होताना दिसते. तर दोन्हीही सोहळे शुद्ध मराठी भाषेचेच आहेत. दोन्हीकडे मराठीचेच वारकरी जमणार आहेत. दोन्हीकडे मराठीचाच गजर होणार आहे, असेही ते म्हणाले.

या विश्व संमेलनात तब्बल २२ देशांतून तीनशे मराठीप्रेमी आलेले आहेत. आज तीनशे आहेत, पुढच्या वर्षी हाच आकडा वाढेल. ही मराठी १९३ देशात पोहोचायला हवी हे आमचे स्वप्न आहे. या स्वप्नाला प्रयत्नांची जोड दिली तरच ते साकार होईल. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून आता विश्वात्मके देवे अशी साद घातली. नामदेवांना ७०० वर्षापूर्वी मराठीच्या विश्वव्यापी परिणामाची जाणीव होती, असेदेखील ते म्हणाले.

वैश्विक भाषा किंवा विश्वाची भाषा म्हणजे जी भाषा सर्वांना जोडते, जात पात धर्माच्या पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेत ठासून भरले आहेत. जगात सात हजार भाषा आहेत. एकट्या भारतात १२१ भाषा आहेत. जवळपास वीस हजार बोलीभाषा आपल्या देशातच बोलल्या जातात. या सगळ्या भाषांशी मराठीनं आपलं नातं जोडलं पाहिजे. तेव्हाच माझी अभिजात मराठी वैश्विक मराठी होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे. आता ती ज्ञानभाषा व्हायला हवी. आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतंय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे एआयचं आहे. आता संवादाची भाषाही तंत्रज्ञान ठरवतंय. त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान मोठे आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे. पण, त्यात अनेक अडचणी आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, संगणक अशा अनेक विषयांत मराठीत उत्तम पुस्तके नाहीतच. विज्ञानाच्या विषय, अभियांत्रिकीसह सर्व विषयांत मराठीतून सोपी पुस्तके येणे गरजेचे आहे. मराठी ही नुसती ज्ञानभाषा नाही तर व्यवहार्य भाषा व्हायला हवी. रोजगारासाठी म्हणजे अर्थार्जनासाठी आवश्यक भाषा व्हायला हवी. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून ठोस प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न महाराष्ट्र धर्म वाढवण्याइतकेच महत्त्वाचे आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

परदेशात उच्च पदांवर मराठी मुले जास्तीत जास्त दिसावी. हीच मुले मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे राजदूत बनतील. त्यांनी तिथे मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे. आज इथे साहित्यावर जरूर चर्चा व्हावी पण इथल्या कर्तृत्ववान मराठी जणांनी मराठी विश्व कसे बळकट होईल याचा विचार करायचा आहे, असेही ते म्हणाले.

 
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपला महाराष्ट्राभिमान हा फक्त, चांद्यापासून बांद्यापर्यंत, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांपुरता मर्यादीत नाही. देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसांनी झेंडा रोवला, ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसाने पाऊलखुणा उमटवल्या. इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या, त्या पाऊलखुणांचा आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.

ते पुढे म्हणाले, आपण जेव्हा मराठे म्हणतो, त्यावेळी मराठा ही संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मराठी भाषा, मराठी बोली बोलणाऱ्या, सह्याद्रीच्या वाऱ्यांशी, महाराष्ट्राच्या मातीशी नातं असलेल्या, अठरापगड जाती, धर्म, भाषा, पंथाच्या लोकांना एकत्रित आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली, हे लक्षात घेतलं पाहिजे.

‘विश्व मराठी साहित्य संमेलन साहित्यभूषण पुरस्कार’ प्रदान करुन त्यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन श्री. पवार म्हणाले, मधुमंगेश कर्णिक हे मराठी साहित्यविश्वाशी गेली 75 वर्षांहून अधिक काळ, एकरुप झालेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा साहित्यिक प्रवास आज 2025 मध्ये येऊन पोहचला आहे. मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधु मंगेश कर्णिक यांनी आपले केले आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी त्यांचा गौरव केला.

तिसरे मराठी विश्व संमेलन पुण्यात होत आहे. यापुढील संमेलने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आदी ठिकाणीही व्हावीत; परंतु, पुढील पाच वर्षातील एक तरी मराठी विश्व संमेलन परदेशात घेऊयात. त्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

संमेलनातील तीन दिवसात कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातल्या ज्येष्ठ दिग्गज मंडळी आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळे, जून्या-नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मराठी साहित्यापलिकडची मंडळी या संमेलनात येणार आहेत. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या, कर्तृत्ववान मंडळींना याठिकाणी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला मिळणार आहे.

मराठी माणसाच्या मनात, कुठेतरी कोपऱ्यात, एक न्यूनगंड असतो. तो काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल, अशी खात्री आहे. मराठी साहित्य संमेलन, मराठी विश्व संमेलन किंवा मराठी माणसाच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल, तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे घेईल.

जगाच्या इतिहासात रयतेचे राज्य स्थापन करणारे पहिले राजे, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले. देशातली पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात सुरु झाली. बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा नेण्याचं काम, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांनी महाराष्ट्रात केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच नेतृत्व महाराष्ट्राने केले. याच महामानवांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी भावी पिढीच्या मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम, या विश्व मराठी संमेलनातून व्हावे, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.

मंत्री सामंत म्हणाले, मराठीवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक लोकांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खूप मोठी चळवळ केली. त्याला यश आले. पुण्याला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते, मराठीसाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती म्हणून पुणे येथे हे तिसरे संमेलन व्हावे अशी आमची भूमिका होती. हा शासनाचा कार्यक्रम असला तरी सर्व पुणेकरांनी हा कार्यक्रम उचलून धरला. मराठी भाषेचे संवर्धन, जतन झाले पाहिजे आणि प्रचार व प्रसार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठी भाषा आहे तशी टिकविणे, मराठीची अस्मिता टिकविणे आणि मराठी भाषेवरील आक्रमणाचा आक्रमक पद्धतीने प्रतिकार करण्याची युवा पिढीची जबाबदारी आहे. हे करताना ज्यांनी ज्यांनी मराठी भाषा लिहिली, वाढवली त्या सर्वांचा आदर्श दीपस्तभांप्रमाणे स्वत:समोर ठेवला पाहिजे. यामुळे विश्व मराठी संमेलनातील पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांनी देण्यात येत असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड हे कवि केशवसुतांचे जन्मगाव त्यांचे स्मारक उभारुन श्री. कर्णिक यांनी जगभरात प्रसिद्ध केले. ते पुढील वर्षी पुस्तकांचे गाव करण्यात येईल व त्याला आवश्यक तो निधी देण्यात येईल. याशिवाय मराठी वाढविणारी, मराठीला ताकत देणारा, सातासमुद्रापार नेणारी महनीय व्यक्ती ज्या गावात जन्माला आली असेल अशी राज्यातील गावे शोधून त्यांचा समावेश पुस्तकांचे गाव, कवितांचे गाव योजनेत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मराठीला भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याविरुद्ध कडक कायदा व्हावा, अशी भूमिकादेखील श्री. सामंत यांनी मांडली.

श्रीमती पाटणकर- म्हैसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले, हे साहित्य संमेलन साहित्यापुरते मर्यादिन न राहता ‘मराठी- 360’ या संकल्पनेनुसार मराठीच्या सर्व पैलूंवर काम करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा सतत वृद्धींगत होत जाईल यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, सदस्य डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, संजय नहार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ साहित्यिक, नवोदित साहित्यिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

MUHS FIST-25 परिषदेतील ’ट्रायबल व्हिलेज’ ची संकल्पना महत्वपूर्ण….मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक

Next Post

नाशिकमध्ये राज्यस्तरीय भगवान महावीर निबंध स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग…जिल्हाधिकारी व झेडपीच्या सीईओचा राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20250131 194546 Collage Maker GridArt

नाशिकमध्ये राज्यस्तरीय भगवान महावीर निबंध स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग…जिल्हाधिकारी व झेडपीच्या सीईओचा राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता, जाणून घ्या,शुक्रवार, २२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025
WhatsAppImage2025 08 21at6.51.20PM8LSK e1755791500938

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी…४ सुवर्ण आणि १ रौप्यपदकाची कमाई

ऑगस्ट 21, 2025
IMG 20250821 WA0326 1

कुंभमेळा निमित्त होणा-या विविध विकास कामाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक…

ऑगस्ट 21, 2025
20250821 195256

विशेष लेख….खाजगी जमीन भूसंपादन करतांना सरकारी यंत्रणेस या सात गोष्टी पाळणे बंधनकारक, नाही तर भूसंपादन होते बेकायदेशीर

ऑगस्ट 21, 2025
mahavitarn

नाशिकमध्ये या परिसरात वीजपुरवठा शनिवारी राहणार बंद…नवीन विद्युत उपकेंद्र वाहिनी जोडणीचे कार्य

ऑगस्ट 21, 2025
Gyy4 pSWYAAjtUr e1755777906342

खासदार सुनेत्रा अजित पवार संघाच्या कार्यक्रमात…वेगवेगळ्या प्रतिक्रियेनंतर दिले स्पष्टीकरण

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011