अधिक मास विशेष
विष्णुपुराण कथासार अंश -१ भाग-१
विश्वाचे प्रयोजन
आज पासून इंडिया दर्पणच्या वाचकांसाठी आपण श्री विष्णु पुराणातील कथा सादर करणार आहोत. मुळात विष्णुपुराण संस्कृत भाषेत आहे. सर्वच्या सर्व पुराणे व इतर शास्त्रे ही महर्षी कृष्णद्वैपायन व्यास यांनी कथन केली. तथापि या विष्णुपुराणाची संहिता महर्षी पराशरांनी मुनी मैत्रेय यांना पुनश्च कथन केली म्हणून याला ‘पराशरसंहिता’ असेही म्हटले जाते.
महाभारत व पुराणात पुराणांची मुख्य अशी पाच लक्षणे सांगितली आहेत. ती अशी –
१) सर्ग अर्थात सृष्टीची निर्मिती, २) प्रतिसर्ग अर्थात प्रत्येक प्रलयानंतरची पुननिर्मिती, ३) वंश अर्थात घराण्यांच्या परंपरा, ४) मन्वंतर म्हणजे मनू व त्यांचा विस्तार आणि ५) वंशानुचरित म्हणजे राजांची चरित्रे. या पुराणाचे सहा अंश म्हणजे खंड असून एकूण १३४ अध्याय आहेत.
यांतील पहिल्या अंशात सृष्टीची, देवांची आणि राक्षसांची उत्पत्ती कथन केली आहे शिवाय समुद्राचे मंथन केल्याची कथा आहे.
एकदा महामुनी पराशर नित्यकर्मे आटोपून अंमळ विश्रांती घेत बसले होते. अशावेळी मैत्रेय ऋषी तिथे आले. त्यांनी पराशरांना विनम्रपणे अभिवादन करून विचारले- “हे गुरुवर! मी आपणाकडून वेद- वेदांग व धर्मशास्त्रांचे अध्ययन केले आहे. माझी ज्ञानजिज्ञासा व परिश्रम आपण जाणत आहात. मीही सर्व शक्ती एकवटून अभ्यास करीत असतो.
तरीही मला अजून हे जाणावयाची उत्सुकता आहे की, हे सर्व जग मुळात उत्पन्न कसे झाले? केव्हा झाले? पुढे त्याचे काय होईल? तसेच या चराचर जगाच्या उत्पत्तीचे मूळ घटक कोणते? हे उत्पन्न होण्यामागचे कारण कोणते? हे निर्माण होण्याआधी कुठे होते? पुढे अंती हे कशामध्ये विलीन होईल?
तसेच पंच महाभूते, समुद्र, पहाड, देव-देवता, अनेक प्राणी, त्यांचे वंशज, युगांतरे, कल्यांतरे, मन्वंतरे, त्याचप्रमाणे महाप्रलय कसा होतो? चार वर्ण व त्यांची रचना या विषयी सर्व काही आपण कृपा करून मजला समजावून द्या.”
तेव्हा पराशर मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले, “मैत्रेय ऋषी! तुम्हा आता प्रश्न केला व त्यामुळे मला एक जुनी घटना आठवली आहे. ती आता मी तुम्हाला सांगतो. ऐका!
“विश्वामित्रांनी फितवल्यामुळे एका राक्षसाने माझ्या वडिलांना खाल्ले. ते समजले तेव्हा मी रागाने अत्यंत बेभान झालो. त्या संतापाच्या भरात संपूर्ण राक्षसजात नष्ट करावी म्हणून मी यज्ञ आरंभ केला. त्या यज्ञात रोज शेकडो राक्षस येऊन पडत व जळून जात असत.
असा प्रकार चाललेला असताना माझे आजोबा वसिष्ठ यांनी मला बोलावून सांगितले की, “बाळा! तुझा राग आवरता घे. अति राग काही चांगला नसतो. तुझ्या पित्याचा अंत ही विधिघटना होती. त्यांत राक्षसजातीचा दोष नाही. पूर्वकर्मांची फळे प्रत्येकाला भोगावीच लागतात. राग हा अविचारी लोकांना येतो. त्यामुळे आपल्याच पुण्याईची हानी होते. विवेकी लोक रागाच्या अधीन होत नसतात. त्यामागचे खरे कारण हेच आहे. तेव्हा आता शांत हो आणि हा यज्ञ समाप्त कर.” त्यावर मी खूप विचार केला आणि यज्ञ थांबवला.
यज्ञसमाप्तीच्या वेळी मोठ्या भाग्याने पुलस्ती ऋषींचे आगमन झाले. त्यांचे स्वागत व पूजन केल्यावर ते मला म्हणाले की,
“बाळा! तू वसिष्ठ आजोबांचे ऐकून वागलास व शांत झालास हे फार छान झाले. माझे वंशज राक्षस हे संपूर्ण नष्ट न होता वंश शाबूत राहिला. मी तुला वरदान देतो की,
१. तू सर्व शास्त्रांचा ज्ञाता होशील. २. सर्व पुराणांचा रचनाकार होऊन देवांचे मूळ स्वरूप जाणशील. ३. कर्माचे गूढ रहस्य व कर्माची गहन गती यांचे तुला ज्ञान होईल.”
हे मैत्रेय! तुमच्या प्रश्नामुळे मला तो सर्व प्रसंग आठवला. असो! आता मी तुम्हाला संपूर्ण पुराणकथा सांगतो. नीट लक्ष द्या –
ही सर्व चराचर सृष्टी विष्णूपासून निर्माण झालेली आहे. त्याच्यातच स्थिरावली आहे आणि अंती त्याच्यातच विलीन होणार आहे. जे जे सर्व काही आहे ते सर्व त्याचाच अंश आहे.
अशी आहे विश्वाची रचना
पराशर पुढे सांगू लागले, “ब्रह्मदेव, हरि व हर हे तिघे जण या सृष्टीला कारणीभूत आहेत. या तिघांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते असे एक ‘वासुदेव’ नावाचे तत्त्व आहे. ते तत्त्व निराकार, निर्विकारी, अविनाशी, परमपवित्र, सर्वसमावेशक, सर्वत्र सम असून त्याची उपासना करणाऱ्या भक्तांना प्रपंचातून तारून नेते. अशा त्या विष्णूतत्त्वाला मी नमस्कार करतो.
तो विष्णू अत्यंत सूक्ष्म (तरल) असून सर्व विश्वाचा आधार आहे, तो सर्वात आहे. खरोखर तो अत्यंत निर्मळ असून केवळ ज्ञान (शुद्ध जाणीव) हेच त्याचे स्वरूप आहे. तथापि ज्ञानाच्या अभावी त्याच्या ठिकाणी अनकेत्वाचा भास होतो. तोच काल बनून विश्वाची निर्मिती, धारणा व अंत करतो. अशा त्या अनुपमेय आणि सर्वश्रेष्ठ विष्णूचे स्मरण करून मी क्रमाक्रमाने सर्व काही वर्णन करणार आहे.
हे वर्णन प्रथम ब्रह्मदेवाने दक्ष आदिकरून मुनिजनांना सांगितले; मग पुढे त्या ऋषींनी ते सर्व नर्मदेच्या किनारी राजा पुरुकुत्साला ऐकविले होते. तो विष्णू एकट्यानेच सर्व घडामोडी करीत असतो. जरी सर्व गोष्टी अनेकांच्या द्वारे घडत आहेत असे दिसत असले, तरी त्या सर्व प्रक्रिया तोच घडवितो. या विश्वाची निर्मिती, पालन व संहार करून तो शेवटी आत्मलीन होऊन रहातो.”
मैत्रेयांनी विचारले “महाराज! ब्रह्म तर गुणविरहित, अनुपमेय, परमपवित्र असे असताना मग त्याला सृष्टिकर्ता का म्हणतात? हे कोडे काय आहे?”
तेव्हा पराशर म्हणाले “हे तपोनिधी मैत्रेय! सर्व प्रकारची शक्ती ही अंतर्ज्ञानानेच फक्त जाणता येते. दुसरा कोणताच मार्ग त्यासाठी नाही. अग्नीमधील उष्णता जशी आहे तशाच ब्रह्माच्या अनेक शक्ती या स्वयंपूर्ण असतात. त्या सर्व तंत्रस्वतंत्र आहेत.
आता सृष्टी कशी घडते ते पहा. आधी नारायण नावाच मूळपुरुष (आदिपुरुष) उत्पन्न होतो, असे म्हणावयाची वहिवाट आहे. ती विषय समजण्यापुरतीच आहे. त्या नारायणाचा जीवनकाल १०० वर्षांएवढा (त्याच्या प्रमाणात) असतो. त्या काळाला ‘पर’ असे नाव आहे. त्याच्या निम्म्या काळाला ‘परार्द्ध’ असे म्हटले जाते. आता काळाची मोजणी कशी केली जाते, तेही समजून घ्या.
कालगणना कशी करतात
पापणीची उघडझाक होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला ‘निमिष’ असे म्हणतात. अशा पंधरा निमिषांएवढा काळ म्हणजे ‘काष्ठा’ होय. तीस काष्ठांची एक ‘कला’, तीस कलांचा एक ‘मुहूर्त’ बनतो. असा तो तीस मुहूर्त म्हणजे मनुष्यांची एक दिवस- रात्र होय. अशा तीस दिवसांचा एक महिना होतो. ६ महिने म्हणजे एक अयन व दोन अयनांचे एक वर्ष होते.
एका अयनाएवढा देवांचा दिवस असतो आणि तेवढीच रात्र असते. देवांच्या अशा १२००० वर्षांत चार युगे (सत्य, त्रेता, द्वापार व कली) पृथ्वीवर होऊन जातात. त्यात क्रमाने चार हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार एवढी देवांची (दिव्य) वर्षे उलटतात. दोन युगांच्या आधी व अंती संधिकाल असतो, तो ८००+६००+४००+२०० असा एकूण दोन हजार वर्षांचा असतो. अशी ही चार युगांची गणती आहे.
चार युगांची एक ‘चौकडी’ होते. अशा १००० चौकड्यांएवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. या एका दिवसात चौदा ‘मनू’ होऊन जातात. त्या प्रत्येक मन्वंतरात सप्तर्षी, देवदेवता, इंद्र, मनू व मनूच्या वंशातील पृथ्वीपती राजे जन्मतात आणि मरत असतात. प्रत्येक मन्वंतराचा कालावधी हा ७१ चौकड्यांपेक्षा किंचित जास्त असतो. मानवी वर्षगणनेनुसार एक मन्वंतर हे तीस कोटी, सदुसष्ट लाख, बीसहजार वर्षांएवढे असते. याच्या चौदा पट ब्रह्मदेवाचा दिवस असतो.
नंतर ‘ब्रह्मप्रलय’ होतो. तेव्हा ‘भूः भुव व स्वः’ हे तिन्ही लोक जळू लागतात. ती उष्णता सहन न झाल्यामुळे महर्लोकांतील दिव्य आत्मे (सिद्ध जन) जनलोकात निघून जातात; नंतर सर्व सृष्टी पूर्णतया जलमय होते. त्यानंतर ब्रह्मदेव १००० युग चौकड्या एवढा काळ झोपून जातो. पुनश्च तो झोपेमधून जागा होतो व सृष्टिरचना करतो. अशा ३६० दिवसरात्री मिळून त्याचे १ वर्ष होते. अशा १००वर्षांएवढे त्याचे आयुष्य असते.
त्यातील ५० वर्षे पुरी होऊन सध्या ५१ व्या वर्षातला पहिला ‘वाराह’ नावाचा कल्प सुरू आहे.
विश्वाची उत्पत्ती कशी होते?
पराशर पुढे सांगू लागले, ” हे ज्ञान पुरुकुत्साने सारस्वताला व सारस्वताने मला सांगितले. ते आता तुम्ही ऐका. परमात्मा हा सर्वांच्याही पलीकडे असून तो परमपवित्र आहे, निर्विकारी आहे. निराकारी आहे. त्याच्याविषयी फक्त ‘तो आहे’ एवढेच सांगणे शक्य आहे. तो सर्वात असूनही पुन्हा सर्वसमावेशक आहे. तरीही तोच सर्वांचा आधार आहे. जेव्हा काहीच नव्हते, तेव्हा तोच होता व (प्रलयानंतर) काहीच नसेल तेव्हाही तोच असेल. अनादि, अनंत व नित्य गतिमान असा काळ तोच आहे.
नंतर त्याच्यातून महतत्त्व उमटले. महतत्त्वातून सत्त्व, रज व तम हे तीन गुण प्रकट झाले. त्याआधी अहंकार उत्पन्न झाला; मग त्यांच्यातून क्रमाक्रमाने एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे अशी पाच भूते निर्माण झाली. त्यांची नावे – १. आकाश, २. वायू, ३. अग्नी, ४. आप व ५. पृथ्वी अशी आहेत.
मग पुढे दहा इंद्रिये व त्यांच्या दहा देवता बनल्या. अकरावे मन आहे. पाच ज्ञानेंद्रिये तशीच पाच कर्मेंद्रिये आहेत. या पाचही भूतांचे गुणधर्म परस्परांविरोधी स्वरूपाचे असूनही त्यांचे सामर्थ्य सुद्धा भिन्न भिन्न प्रकारचे आहे. तरीही त्यांच्या एकत्रीकरणामुळेच हे विश्व टिकून राहते. अशा या विश्वाची उत्पत्ती रजोगुणात प्रवेश करून ब्रह्मदेवाचे रूप घेऊन तो आदिपुरुष वासुदेव करतो.
नंतर सत्त्वगुणाच्या आश्रयाने विष्णू बनून कल्पांतापर्यंत तोच सांभाळ करतो आणि कल्पांताची वेळ येते तेव्हा तमोगुणाच्या आश्रयाने रुद्र होऊन तोच सर्व विश्व पाण्यात विरघळवून टाकतो. पुन्हा पुढे केव्हातरी तो विश्वाची रचना करतो.”
(श्री विष्णु पुराण कथासार क्रमश:)
सादरकर्ते :- विजय गोळेसर (मोबा. ९४२२७६५२२७)