अधिक मास विशेष लेखमाला (भाग २८)
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग -४)
विष्णूभक्ती आणि वर्णाश्रमांतील कर्तव्ये
मैत्रेयांनी विचारले की, विष्णूची उपासना कशा प्रकारे करावी? त्यावर पराशर म्हणाले की, “हाच प्रश्न महात्मा सगर याने और्व मुनींना विचारला असता त्यांनी जे सांगितले होते ते असे की
विष्णूची आराधना करणाऱ्याने वर्णाश्रम धर्माचे पालन करावे. हीच त्याची एकमेव पात्रता आहे. चारी वर्ण व चारी आश्रमांतील लोकांनी आपापल्या धर्मानुसार वागत जावे; कारण असे आहे की, सर्वत्र सर्वकाली सर्वांना विष्णूच व्यापून राहिला आहे.
अशा भक्ताने परनिंदा, चुगली व असत्यवचन या गोष्टींपासून दूर राहावे. परस्त्री, परद्रव्य तशीच हिंसा या तिन्ही गोष्टी टाळाव्या. देव, ब्राह्मण व गुरू यांची सेवा करीत जावी. आपल्या पुत्रांप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी मनात ममता असावी. निर्मळ चित्त जर असले तर श्रीहरि प्रसन्न असतो. आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार वागूनच विष्णूला भजता येते. त्यासाठी दुसरा उपाय नाही.
त्यावर सगराने विनंती केली की, चार वर्ण आणि चार आश्रम यांची कर्तव्ये कोणकोणती आहेत ती सांगण्याची कृपा करावी. तेव्हा और्व मुनींनी सांगायला आरंभ केला.
ब्राह्मणाची सहा प्रमुख कर्तव्ये अशी आहेत – १ दान, २ प्रतिदान, ३ अध्ययन, ४ अध्यापन, ५ यजन आणि ६ याजन. ब्राह्मणाने दान घ्यावे तसेच दान देत जावे. स्वतः शिकत राहावे (स्वाध्याय) व इतरांना विद्यादान करावे. चरितार्थासाठी इतरांचे यज्ञयाग करून घ्यावेत. सर्वांशी सख्य असावे. पत्नीशी शरीरसंबंध ठेवताना नियमपूर्वक ठेवावा.
क्षत्रियांनी वीरवृत्ती ठेवावी. दानधर्म करीत जावा. राज्याचे व प्रजेचे पालन करावे. यज्ञयाग करावेत. त्यासाठी शस्त्रसंपन्न असणे व वेळप्रसंगी शस्त्रप्रयोग करणे हा त्यांचा धर्म आहे. सज्जनांचे रक्षण करणे व दुर्जनांना शिक्षा देणे ही कर्तव्ये पाळून ते उत्तम गती प्राप्त करतात.
वैश्य लोकांनी पशुपालन करावे. शेती करावी तसाच व्यापार उद्योग करून चरितार्थ चालवावा, नित्याची आणि नैमित्तिक अशी धार्मिक कृत्ये करीत जावीत.
आता चौथा वर्ण आहे शूद्र! त्यांनी इतर तीनही वर्णांना साह्य करत जावे. तेवढ्याने जर उदरनिर्वाह होत नसला तर व्यापारधंदा करावा अगर कोणतीही कला-कौशल्याची कामे करावी. मालकाची प्रामाणिक रीतीने सेवा करणे, नम्र असणे, अमंत्रक पूजा करणे, चोरी न करणे, सत्संग व ब्राह्मणांचे रक्षण करणे हा त्यांचा धर्म आहे.
त्यानेही दान द्यावे, पूजा करावी, नैवेद्य-वैश्वदेव करीत जावे. श्राद्ध करावे. एकंदरीत शुद्ध कर्मे करीत प्रपंच चालवावा. स्त्रीशी संबंध ठेवून प्रजेची वृद्धी करावी. आता सर्व वर्णांसाठी सामान्य गुण असे आहेत.
सर्वांभूती दया ठेवावी, सहनशील असावे, गर्व कधी करू नये. सत्यपालन करावे, स्वच्छता पाळावी, अति कष्ट करू नयेत, शुभ बोलत जावे, प्रिय वाटेल असे बोलावे, सर्वांशी प्रेमाने वागत जावे. कंजूषपणा करू नये आणि इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावे, हे सामान्यपणे सर्वांसाठी आवश्यक आहे.
आता आपद्धर्माविषयी थोडे सांगतो. जेव्हा बाका प्रसंग समोर उभा राहतो व स्वधर्म पालन करणे अशक्य होते, तेव्हा जो ब्राह्मण असेल त्याने क्षत्रिय अथवा वैश्य यांचेप्रमाणे धर्म आचरून चरितार्थ चालवावा. त्याचप्रमाणे क्षत्रिय असला तर त्याने पशुपालन, शेती अगर व्यापार अशी कर्मे करावी.
मात्र जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा ती कर्मे सोडून आपली मूळची कर्तव्ये करावी. ही सवलत फक्त आपत्काळापुरतीच आहे, हे विसरू नये.”
चार आश्रम व त्यांची कर्तव्ये
और्य सगराला पुढे सांगू लागले “हे राजन्! मुलाची मुंज झाली की त्याने ब्रह्मचर्याचे पालन करून गुरुगृही रहावे. तिथे आश्रमधर्मानुसार आचरण करून गुरूची सर्वभावे सेवा करीत वेदाध्ययन करावे,
प्रातः संध्या व सायंसंध्या या वेळी एकाग्र चित्ताने सूर्य व अग्नी यांची उपासना करावी आणि गुरूला अभिवादन करावे. गुरू उठले की आपण उठावे, ते बसल्यावर बसावे व ते चालू लागले की त्यांच्यामागून जावे , गुरूंनी आज्ञा दिली की अभ्यास करावा तसेच भोजन करावे. गुरूंचे स्नान आटोपल्यानंतर स्वतः पाण्यात उतरावे. पहाटे उठून त्यांच्याकरिता समिधा, पाणी, दर्भ व फुले घेऊन यावे.
अशाप्रकारे सेवा करीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंची आज्ञा घेऊन व त्यांना दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा; मग यथाशास्त्र विवाह करून उचित मार्गाने द्रव्य संपादन करून आश्रमधर्माचे आचरण करीत असावे.
पिंडदानाने पितरांची, यज्ञाने देवांची, अन्नदानाने अतिथींची, स्वाध्यायद्वारा ऋषींची, पुत्र उत्पन्न करून प्रजापतींची, बळी देऊन भूतांची व सर्वांवर प्रेम करून पूजा केल्याने पुरुषाला उत्तमोत्तम लोकांची प्राप्ती होत असते. भिक्षुक, संन्यासी, ब्रह्मचारी अशा सर्वांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. म्हणून चारीही आश्रमात गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे.
जे कुणी वेदाध्ययन, तीर्थयात्रा व देशपर्यटन याकरिता फिरत असतात अशांच्या भोजनादिची व निवासाची निश्चित अशी सोय नसते म्हणून ते सायंकाळी कुठेतरी आसरा घेतात. त्या सर्वांना गृहस्थाचे घरच आश्रय देते. तर असे कुणी जर घरी आले तर त्यांच्याशी गोड बोलावे आणि यथाशक्ती त्यांच्या भोजनाची व झोपण्याची सोय करावी.
जर अतिथि विन्मुख गेला तर यजममानाच्या पुण्याचा क्षय होतो. अतिथीशी गर्वाने बोलणे, त्याचा अपमान करणे, त्याला हाकलून देणे अशासारख्या गोष्टी करू नयेत. अशाप्रकारे जो कुणी पुरुष गृहस्थाश्रमाचे पालन करतो तो सर्व पाशांतून पूर्ण सुटून उत्तम लोकी जातो.
असे आचरण करीत जो प्रौढावस्था ओलांडतो त्याने स्त्रीची व प्रपंचाची जबाबदारी पुत्रांवर सोपवावी किंवा स्त्रीला बरोबर घेऊन वनात जाऊन रहावे. तिथे कंदमुळे, फळे असा आहार घेऊन, जटा व दाढी-मिशा बाढवून ऋषींप्रमाणे रहावे. दर्भ अथवा मृगचर्म यांची वस्त्रे व अंथरुण वापरावे. त्याला त्रिकाळ स्नान करणे आवश्यक आहे. देवपूजा, होम, अतिथीसत्कार, भिक्षा व वैश्वदेव ही कर्तव्ये आवश्यक आहेत.
असे जो वागेल तो दोषमुक्त होऊन श्रेष्ठ लोकी जाऊन राहिल.
आता चौथा व शेवटचा आश्रम जो आहे त्याचेही वर्णन करतो ते ऐक. वानप्रस्थाश्रमा नंतर सर्व लौकिक पाश तोडून चौथ्या आश्रमाचा स्वीकार करावा. सर्वांशी समान वृत्तीने वागून आणि हवे-नकोपणाचा विचारही मनात न आणता राहावे.
त्याने गावात एखाद्या रात्रीपुरता व शहरामध्ये पाच रात्रींपुरता मुक्काम करावा. लोकांची जेवणे झाली की, भिक्षेसाठी निघावे. द्वेष, वैर, लोभ, गर्व, राग, तसाच मोह धरू नये. मग त्याला कुठेच भय रहात नाही; मग असा संन्यासी अग्निहोत्र पुरुषांच्या लोकात जातो.
मग आश्रमानुरूप आचरण करणारा तो (ब्राह्मण) एखाद्या इंधनरहित अग्नीप्रमाणे शेवटी विझून जातो आणि ब्रह्मलोकाला प्राप्त होतो.”
जातकर्म, बारसे व विवाह संस्कार
और्वमुनी पुढे म्हणाले – “हे राजा! तू विचारलेस त्याप्रमाणे मनुष्याचे सोळा संस्कार आणि त्यांचे विधी यांच्याविषयी आता तुला सविस्तर वर्णन करून सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक.
पुत्र जन्माला आला की, पित्याने त्याचे जातक संस्कार व अभ्युदय श्राद्ध करावे. तेव्हा ब्राह्मणांना पूर्वाभिमुख बसवून जेवू घालावे. नंतर नांदीमुख द्वारा पितरांसाठी दही, जव आणि बोरे यांनी युक्त पिंड द्यावेत किंवा सर्वोपचार द्यावेत. कन्येच्या अथवा पुत्राच्या विवाहापूर्वी असाच विधी करावा. असो!
पुत्रजन्म झाल्यापासून दहाव्या दिवशी पित्याने त्याचे बारसे करावे. पुरुषाचे नाव पुल्लिंगी शब्दयुक्त असून आरंभी देववाचक असावे. तसेच शेवटी शर्मा, वगैरे असावे. त्यात ब्राह्मणाच्या नावाला शर्मा, क्षत्रियांसाठी वर्मा, वैश्यांसाठी गुप्त आणि शूद्रांसाठी दास हे शब्द योजावेत. नाव ठेवताना त्याची अक्षरे समसंख्येत असावीत, सार्थ व शुभसूचक असून उच्चारावयास सोपी असावीत. नाव फार लांबलचक नसावे.
पुढे मुलाची मुंज करावी आणि त्याला गुरूकडे पाठवावा. तिथे त्याने अध्ययन पूर्ण करावे. अभ्यास पुरा झाला की, गुरूंना दक्षिणा देऊन घरी परतावे.
मग जर इच्छा असली तर लग्न करून प्रपंच चालवावा. नाहीतर कोणत्याही आश्रमधर्मानुसार रहावे. लग्न करायचे असल्यास पुढील गोष्टी जरूर ध्यानी घ्याव्यात
वधू वयाने आपल्यापेक्षा कमी असावी. फार कमी अगर जास्त केस असणारी, अति काळीकुट्ट अगर अति गोरी नसावी. रोगिणी व व्यंग असलेली नसावी. चांगल्या कुळातील असावी. दुष्ट स्वभावाची, कर्कश आवाजाची, ओरडून बोलणारी, फार केसाळ नसावी. पुरुषी बांध्याची व मिचमिचे डोळे असणारी तसेच बटबटीत डोळे असणारी नसावी.
हसतेवेळी जिच्या गालांवर खळी पडते अशी स्त्री निवडू नये, तिची अंगकांती निस्तेज नसावी. नखे पांढरीफटक असलेली, लाल नेत्रांची व मोठ्या पंजांची स्त्री पसंत करू नये, अति ठेंगू, अति उंच, दोन्ही भुवया जोडलेल्या अशी स्त्री, त्याचप्रमाणे विरळ दातांची, दात फार पुढे असणारी स्त्री, अशा मुलीशी विवाह करू नये,
हे राजा! आई-वडील पाचव्या पिढीपर्यंत आणि महिलांकडून सातत्या पिढीपर्यंत संबंध नसेल अशी कल्या निवडावी.
विवाहाचे शास्त्रसमेत आठ प्रकार आहेत. ते असे १) ब्राह्म, २) दैव, ३) आर्ष, ४) प्राजापत्य, ५) आसुरी, ६) गांधर्व, ७) राक्षस आणि ८) पिशाच यांच्यातून आपल्या वर्णासाठी जो प्रकार धर्मानुकूल असेल त्याच पद्धतीने विवाह करावा. इतर विधी टाळावेत
अशी जोडीदारीण निवडून गृहस्थाधमांचे पालन करावे. कारण असे की धर्मानुसार आचरण करण्याचे फळ फार महान असते.”
श्री विष्णु पुराण अंश-३ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७
vishnu puran vishnu bhakti varnashram by vijay golesar