अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग १२)
सूर्य आणि त्यांचे सहायक
अहोरात्र कसे कार्य करतात?
श्री विष्णु पुराणाच्या आजच्या भागात सूर्य आणि त्याचे इतर अनेक सहायक अहोरात्र कसे व कोणते कार्य करतात? सूर्यशक्ती आणि वैष्णवी शक्ती यांच्यात कोणता फरक आहे ? आणि या विश्वात जे काही दृश अथवा अदृश्य आहे ते विष्णूमय कसे आहे याचा परिचय करून घेणार आहोत.
या संपूर्ण विश्वाचा कारभार कसा चालतो हे मानवाला अनादि काळापासून पडलेलं कोडं आहे. पूर्वीच्या ॠषि मुनींनी त्याचा अभ्यास करून या कोड्याची उत्तरं दिली आहेत.त्यानुसार पराशर पुढे सांगतात-
” आरोह आणि अवरोह (उत्तरायण व दक्षिणायन) अशा गतीने वर्षभरात सूर्य ज्या मार्गावरून फिरतो त्याच्या दोन्ही टोकांमध्ये १८० मंडले एवढे अंतर आहे. सूर्याच्या स्थावर दर महिन्यास वेगवेगळे आदित्य, ऋषी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, सर्प य राक्षस असतात.
चैत्र महिन्यात धाता नावाचा आदित्य, क्रतुस्थला, अप्सरा, पुलस्त्य ऋषी, वासुकी सर्प, रथभृत् यक्ष, हेति राक्षस व तुंबरू गंधर्व रथात असतात.
वैशाखात अर्यमा हा आदित्य, पुलह ऋषी, रथौजा हा यक्ष, पुंजिकस्थला ही अप्सरा, प्रहेति राक्षस, कच्छवीर सर्प आणि नारद नावाचा गंधर्व असे सर्व जण रथावर असतात.
ज्येष्ठाच्या महिन्यात मित्र नामक आदित्य, अत्रि ऋषी, तक्षक सर्प, पौरुषेय राक्षस, मेनका ही अप्सरा, हाहा नांवाचे गंधर्व आणि रथस्वन नावाचा यक्ष हे रथात असतात.
आषाढात वरूण हा आदित्य, वसिष्ठ ऋषी, नाग नावाचा सर्प, सहजन्या ही अप्सरा, हूहू हे गंधर्व, रथ नावाचा राक्षस तसाच रथचित्र हा यक्ष असतो.
श्रावण महिन्यांत इंद्र नावाचा आदित्य विश्वावसु हा गंधर्व, स्रोत हा यक्ष, एलापुत्र नावाचा सर्प, अंगिरा ऋषी, प्रम्लोचा ही अप्सरा आणि सर्पि नावाचा राक्षस हे सगळे रथावर असतात.
भाद्रपदात विवस्वान नावाचा आदित्य, उग्रसेन गंधर्व, भृगू ऋषी, आपूरण यक्ष, अनुम्लोचा अप्सरा, शंखपाल सर्प, त्याचप्रमाणे व्याघ्र नावाचा राक्षस असे सगळे सूर्यरथावर असतात.
आश्विन महिन्यात पूषा हा आदित्य, वसुरुचि हा गंधर्व, वात राक्षस, गौतम ऋषी, धनंजय सर्प, सुषेण यक्ष व घृताशी अप्सरा हे रथात असतात.
कार्तिकाच्या महिन्यात पर्जन्य नावाचा आदित्य, विश्वावसु गंधर्व, भरद्वाज ऋषी, ऐरावत सर्प, विश्वाची ही अप्सरा, सेनजित यक्ष आणि आप नामक राक्षस, हे रथावर असतात.
मार्गशीर्षात अंश हा आदित्य, काश्यप ऋषी, तार्क्ष्य नावाचा यक्ष, महापद्म सर्प, ऊर्वशी अप्सरा, चित्रसेन गंधर्व आणि विद्युत राक्षस हे रथात असतात.
पौषाच्या महिन्यात भग हा आदित्य, ऋतु ऋषी, ऊर्णायु गंधर्व, स्फूर्ज राक्षस, कर्कोटक हा सर्प, अरिष्टनेमि यक्ष व पूर्वाचिति अप्सरा हे सर्व जण सूर्यरथात असतात.
माघात त्वष्टा नामक आदित्य, जमदग्नि ऋषी, कंवल सर्प, तिलोत्तमा अप्सरा, ब्रह्मोपेत हा राक्षस, ऋतजित् यक्ष व धृतराष्ट्र हा गंधर्व असतो.
आता फाल्गुनात विष्णू आदित्य, अश्वतर हा सर्प, रंभा अप्सरा, सूर्यवर्चा गंधर्व, सत्यजित नामक यक्ष, विश्वामित्र ऋषी व यज्ञोपेत राक्षस हे सर्व असतात.
अशा प्रकारे दर महिन्याला हे सात-सात जण सूर्याबरोबर असतात. त्यांपैकी ऋषी स्तुतिगायन करतात, गंधर्व समोर उभे राहून यश वर्णन करतात, अप्सरा नृत्य करतात, राक्षस रथाच्या पाठीमागून चालतात. सर्प रथाची व्यवस्था पाहतात. यक्षगण रथाची गती अबाधित राखतात.
इतर वालखिल्य वगैरे गण वरकड कामे करतात. या सर्वांच्या अविरत प्रयत्नांमुळे ऋतू वेळेनुसार येत-जात रहातात.
सूर्यशक्ती आणि वैष्णवी शक्ती मधील फरक!
मैत्रेयांनी पुन्हा प्रश्न केला की – “हे महाराज! आपण केलेले सर्व वर्णन ऐकल्यानंतर मला काही शंका आल्या आहेत, त्या अशा १) आपण सूर्यरथावरील प्रत्येक गणाचे कार्य सांगितले खरे! पण मग सूर्य स्वतः काय करतो? २) जर ऋतूंच्या समतोल असण्याला सात गण हेच जबाबदार असतील तर मग सूर्याची जरुरीच कुठे राहिली? ३) मग ‘पाऊस सूर्यामुळे पडतो’ या म्हणण्याला आधार तरी कुठे उरतो? ४) हे सात जण जर ऋतूंना कारण आहेत तर मग सूर्य उगवला, आता माथ्यावर आला व सूर्य मावळला असे का म्हटले जाते?”
त्यावर पराशर सांगू लागले – “अहो! तुमच्या सर्व प्रश्नांचा खुलासा ऐका. सूर्य हा त्या सात गणांपैकी एक आहे परंतु तो मुख्य असल्यामुळे त्याचे महत्त्व जास्ती आहे. सूर्याला उष्णता विष्णूच्या पराशक्तीकडून मिळते व ती पापनाशिनी आहे. ही पराशक्ती वेदत्रय स्वरूपिणी असून ती सूर्याखेरीज ब्रह्मा आणि हरिहर यांच्यापाशीही आहे.
ही पराशक्ती आदित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच सूर्य अखंडपणे प्रकाश व उष्णता यांचे उत्सर्जन करीत असतो.
सूर्याच्या रथात असणाऱ्या साती गणांची कर्तव्ये मी तुम्हाला याआधीच कथन केली आहेत. परा (वेदत्रयीरूपिणी) शक्तिरूप विष्णूला उदयास्त नसतो. सात प्रकारचे गण हे त्याच्यापासून अलग आहेत. अशी ती पराशक्ती सूर्यरथावर कायम असते व तीच सूर्याच्याद्वारे कार्यप्रवृत्त होते.
दिवस व रात्र यांचा आधार जो सूर्य आहे. त्याच्यामुळे पितर, देव आणि मानव तृप्त होतात. सुषुम्ना या नावाच्या सूर्यकिरणातून चंद्राचे पोषण होते. ते अगदी पौर्णिमेपर्यंत! नंतर वद्यपक्षात देव चंद्राच्या तेरा कला प्राशन करून तृप्त होतात व शेवटच्या दोन कला पितर सेवन करतात.
सूर्य आपल्या किरणांच्याद्वारे पृथ्वीवरून जेवढे पाणी शोषून घेतो तेवढे सर्वच्या सर्व तो प्राणिसृष्टीच्या निर्वाहाकरिता पुन्हा (ढगांच्या द्वारे) पृथ्वीवर परत सोडून देतो.
अशाप्रकारे सूर्य हा देव, पितर, मानव व इतर सर्व प्राण्यांचा पोशिंदा आहे.”
विष्णुमय विश्व!
भगवान पराशर पुढे सांगू लागले – “चंद्राच्या रथाला तीन चाके असून मोतिया रंगाचे दहा घोडे जुंपलेले आहेत. ध्रुवाच्या आकर्षण कक्षेत राहून नागमोडी मार्गावरून वाटेत असलेल्या अश्विनीसह २७ नक्षत्रांना ओलांडीत तो फिरत असतो. सूर्यासारखा त्याचाही प्रकाश कमी-जास्त होत असतो. असा तो रथ एका कल्पापर्यंत अविरत चालत असतो.
चंद्राच्या कलांचे प्रत्येक कृष्णपक्षात त्रयोदशीपर्यंत देवगण सेवन करतात; कारण त्यांचा आहारच तो आहे. असे देव ३३,३३३ प्रकारचे आहेत. जेव्हा चंद्राच्या दोनच कला उरतात तेव्हा तो रविमंडलात प्रवेश करतो. अमा नावाचे किरण तिथे असतात म्हणून ती अमावास्या होय. त्या रात्री तो प्रथम पाण्यात, नंतर वनस्पतींमध्ये व शेवटी सूर्यापाशी जातो. म्हणून जर अमावस्येला वनस्पतींचे एक पान तोडले तरी त्याचे पाप ब्रह्महत्ये समान असते.
पंधरावी कला थोडी शिल्लक असताना पितर त्याच्या सभोवती जमतात आणि तीही कला ते पिऊन घेतात; मग पुढे प्रतिपदेपासून त्याचे पोषण सूर्याद्वारा होत असते. अर्थात चंद्र हा सर्वांचा पोषक ठरतो.
चंद्रपुत्र बुध याचा रथ वायू व अग्नी यांच्या मिश्रणाने बनला आहे व मोतिया रंगाचे आठ घोडे तो ओढतात.
शुक्राच्या रथाला लोखंडाचे कवच व तळ असून त्यात शस्त्रागार आहे. त्याचे घोडे पृथ्वीवरील आहेत. मंगळाच्या रथाला शेंदरी माणीकाप्रमाणे आठ घोडे असून तो रथ सोन्याचा आहे. शुभ्रधवल अशा आठ घोडे जोडलेल्या रथात गुरू बसतो व दर सवा महिन्याला एकेक राशी ओलांडीत जातो. शनीचा रथ आकाशतत्त्वाचा आहे व त्याला जोडलेले घोडे विविधरंगी आहेत. त्या रथाचा वेग अतिमंद आहे.
राहूच्या रथाचा रंग धुरकट आहे व भुंग्याप्रमाणे काळ्यानिळ्या रंगाचे आठ घोडे त्याला असून सतत एकाच गतीने ते चालत रहातात. पौर्णिमेच्या सुमारास राहू चंद्रापाशी असतो तर अमावास्येच्या सुमारास तो सूर्यापाशी असतो. असेच केतूच्या रथाला आठ लाखेसारख्या लाल रंगाचे आठ घोडे असून ते सर्व तेजस्वी आहेत.
असे हे ग्रह एकंदर नऊ असून ते ध्रुवाशी वायूच्या दोरीने बांधलेले आहेत. सर्व ग्रह, तारे आणि नक्षत्रे वायूच्या दोरीने ध्रुवाला जोडलेली असून त्यांच्या त्यांच्या विशिष्ट परीघात सतत फिरत असतात. प्रत्येक ताऱ्यासाठी स्वतंत्र दोरी आहे. ते सर्व ध्रुवाच्या भोवती फिरतात. ते वायूचे चक्र सर्वांना सतत गतिमान ठेवते, म्हणून त्याला ‘प्रवह’ असे नाव आहे.
मी जे शिशुमार चक्र याआधी म्हणालो, त्याचे स्वरूपसुद्धा आता सांगतो. त्याचे रात्री जर दर्शन घेतले तर तो दर्शन घेणारा दिवसभराच्या पापकर्मांपासून मुक्त होतो. त्या चक्राचा आकार सुसरीसारखा आहे. त्याचा वरचा ओठ ‘उत्तानपाद’ असून ‘यज्ञ’ हा खालचा ओठ आहे. ‘धर्म’ हे त्याचे मस्तक आहे तर ‘नारायण’ हृदय आहे. ‘अश्विनकुमार’ हे पाय असून मांड्यांच्या ठिकाणी ‘वरूण’ आणि ‘अर्यमा’ हे आहेत, त्यांचे लिंग ‘संवत्सर’ आहे तर गुदद्वार ‘मित्र’ आहे. त्याच्या शेपटीवर अग्नि, कश्यप, महेन्द्र व ध्रुव हे चौघे आहेत.
आता याचा सारांश पुन्हा ऐका. जल हे विष्णूचे मूर्त रूप आहे. त्यातून नवरत्ना पृथ्वी उत्पन्न झाली. या विश्वात जे काही दृश अथवा अदृश्य आहे ते विष्णूमय आहे.ज्ञान (जाणीव) हे विष्णूचे स्वरूप असल्याकारणाने तो ‘सर्वमय’ आहे. तो मापता येणार नाही. म्हणून जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी एकमेव विज्ञान (शुद्ध जाणीव) भरून राहिली आहे.
ही शुद्ध जाणीव अर्थात ‘आत्मज्ञान’ ज्याला प्राप्त होते तो भेदाभेद नसणारा परमहंस बनतो. या विश्वात ज्या सतत बदलत जाणाऱ्या गोष्टी आहेत त्यात सत्य कुठून सापडणार? कर्माच्या जाळ्यात अडकलेले लोक यातून कसे सुटतील? तर एकमेव विज्ञानावाचून काहीच अस्तित्वात नाही. हे विज्ञान अत्यंत पवित्र असून तेच विष्णू आहे. त्याच्याशिवाय कुठेच काही नाही.
परमार्थ म्हणतात तो हाच आहे. ‘केवळ ज्ञान’ हेच परम सत्य आहे. त्याशिवाय जे काही दिसते व भासते ते नश्वर आहे. तथापि या विश्वरूप अशा आभासाला फसून व तो खरा समजून सर्व जण गरगरा फिरत आहेत. हे ओळखून कायम आणि पवित्र अशा वासुदेवाशी एकरूप व्हावे, हीच एक श्रेष्ठ गोष्ट आहे.”
(श्री विष्णु पुराण अंश-२ क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७
vishnu puran surya aani sahayak by vijay golesar
adhik mas Special Article