अधिक मास विशेष-४०
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग – ७)
श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर ठपका ठेवणारी
स्यमंतक मण्याची कहाणी!
सत्वताचा वंशविस्तार
राजा सत्वत याचे भजन, भजमान, दिव्य, अंधक, देवावृध, महाभोज व वृष्णि असे सात मुलगे होते. भजमान याला सहा मुलगे जाले. देवावृध याला बभ्रु हा एकच मुलगा झाला. महाभोज याच्या वंशात भोजवंशीय आणि मार्तिकावर असे राजे झाले. वृष्णि याचे दोन मुलगे सुमित्र आणि युधाजित हे होते. त्यापैकी सुमित्र याचा मुलगा अनमित्र त्याचा निघ्न- त्याचा प्रसेन व सत्राजित असे दोघे जण!
हा सत्राजित सूर्याचा मित्र होता. एके दिवशी तो समुद्राच्या काठी बसला होता. बसल्या बसल्या त्याने सूर्याची स्तुती केली. तेव्हा त्याच्या पुढ्यात सूर्य प्रकट झाला. तो तेजाचा गोल असाच दिसला. तेव्हा सत्राजित म्हणाला की, तू जसा आकाशात दिसतोस तसाच आहेस. तुझे मूळ रूप काही मी पाहिलेले नाही. त्यावर सूर्याने आपल्या गळ्यातील पराकोटीचा तेजस्वी असा स्यमंतक नावाचा मणी काढून ठेवला. तेव्हा त्याचे रूप असे दिसले की, तांब्याच्या पत्र्यासारखी असून, तेजस्वी व सूक्ष्म होता. त्याचे डोळे पिंगट रंगाचे होते.
सत्राजिताने विनम्र होऊन त्याची स्तुती केल्यावर खूश होऊन सूर्याने जे हवे ते माग’ असे सांगितले. तेव्हा सत्राजिताने तो स्यमंतक मणीच मागितला; मग सूर्याने तो मणी त्याला दिला आणि निजलोकात निघून गेला.
नंतर सत्राजिताने तो मणी गळ्यामध्ये धारण करून त्याच्या तेजाने दहा दिशा उजळीत द्वारकेत प्रवेश केला. तेव्हा सर्वांना असा भास झाला की जणू काय प्रत्यक्ष सूर्यच पृथ्वीवर मानवी रूपात आला आहे. द्वारकेतील नागरिक असा विचार करीत असतानाच आकाशवाणी झाली
“लोक हो! हा सूर्यदेव नसून राजा सप्राजित आहे. सूर्यादिवाने दिलेला स्वयंमतक नावाचा दिव्य असा मणी त्याने धारण केला आहे. तरी तुम्ही निश्चित होऊन त्याचे स्वागत करा.” तेव्हा सर्व नागरिक निर्भय झाले.
सत्राजिताने तो मणी घरात सुरक्षित जपून ठेवला. तो मणी दररोज आठ तोळे सोने उगाळीत असे शिवाय त्याच्या प्रभावामुळे राज्यात रोगराई, दुष्काळ, सर्प, अग्नी, चोरी व तुटवडा या गोष्टींची नावनिशाणीही नव्हती एकदा अच्युताला असे वाटले की, तो मणी उग्रसेनापाशी असणे उत्तम आहे पण भीतीपोटी तो त्यावेळी गप्प बसला.
तरी सत्राजिताला अशी कुणकुण लागली की, कृष्ण तो मणी मागण्याच्या विचारात आहे. तेव्हा त्याने तो मणी आपला भाऊ प्रसेन याला दिला. नंतर तो मणी धारण करण्याचा विधी ठाऊक नसल्यामुळे प्रसेन एकदा नुसताच मणी गळ्यात बांधून बनात शिकारीसाठी गेला.
त्याचा विपरीत परिणाम असा झाला की, प्रसेन घोड्यासकट एका सिंहाकडून मारला गेला. त्यावेळी तो मणी तोंडात घेऊन सिंह निघाला. तेवढ्यात अस्वलाचा राजा जो जांबुवंत त्याने त्या सिंहाला मारला आणि तो मणी घेऊन आपल्या गुहेकडे परतला; मग त्याने सुकुमार नावाच्या पुत्राला तो मणी खेळण्यासाठी दिला.
तिकडे राजा प्रसेन परतून न आल्यामुळे सर्व यादव नागरिकांत अशी कुजबुज सुरू झाली की, तो स्यमंतक मणी कृष्णाला हवा होता. तेव्हा त्यानेच निश्चितपणे काही दगाफटका केला असणार.
असा लोकापवाद जाणून कृष्ण यादवसैन्य घेऊन प्रसेनच्या घोडयाच्या पाऊलखुणा पहात गेला असता सिंहाने मारून टाकलेला प्रसेन त्यांना दिसला. सर्व सैनिकांच्या समक्ष कृष्णाचे निरपराधित्व सिद्ध झाले. तेव्हा तो पुढे निघाला. पुढे काही अंतरावर तो सिंह मरून पडला होता. तेव्हा जांबुवंताच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत एका पर्वतापाशी गेले.
मग कृष्णाने सैन्याला तिथेच थांबवले आणि तो एकटा पर्वतावरील जांबुवंताच्या गुहेत घुसला. तिथे पाहतो तर सुकुमाराला खेळवत असलेली दासी त्याला सांगत होती की, “बाळा प्रसेनाला सिंहाने मारला आणि सिंहाला तुझ्या पित्याने मारला, तेव्हा आता हा स्यमंतक मणी तुझाच आहे, म्हणून उगी राहा, “
कृष्णाने असे ऐकून आत प्रवेश केला. तेव्हा अनोळखी पुरुषाला पाहताच ती दाई घाबरून ओरडत सुटली.
तिचा ओरडा ऐकून जांबुवंत धावतच तिथे आला. कृष्णाला पाहून त्याला मोठा संताप आला आणि तो युद्धाला सज झाला. दोघांचे मलयुद्ध सुरू झाले. दोघेही एकवीस दिवसपर्यंत लढत होते.
पर्वताच्या पायथ्याशी उभे असलेल्या सैनिकांनी आठवडाभर कृष्णाची वाट पाहिली आणि निश्चित कृष्ण मारला गेला असावा असा तर्क करून सगळे द्वारकेत परतून गेले. तिथे जाऊन त्यांनी सर्व वृत्त सांगितले आणि कृष्ण मारला गेला असेही ते म्हणाले. सर्व नातेवाईकांनी कृष्णाचे उत्तरकार्य यथाविधी केले.
त्यामुळे असे झाले की, अंत्यविधीत दिल्या गेलेल्या पिंडामुळे व तर्पणात सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णाची प्राणशक्ती अपार बाढली. जांबुवंत मात्र उपाशीपोटी युद्ध करीत राहिल्यामुळे दुर्बल झाला. तेव्हा मग तो कृष्णाकडून पराभूत झाल्यामुळे शरण गेला व म्हणाला
“प्रभू! मी तुम्हाला ओळखले नाही. तुम्हाला देवता, राक्षस, यक्ष, गंधर्व, नाग असे कुणीच जिंकू शकणार नाहीत. तिथे मानव, पशुपक्षी व माझ्यासारख्यांची काय कथा? माझी खातरी पटली आहे की, तुम्ही जगाचे स्वामी प्रभू नारायण यांचेच अंश आहेत.
तेव्हा त्याचा भाव जाणून कृष्णाने हस्तस्पर्श करून त्याला ताजातवाना केला. त्यानेही स्यमंतक मणी देऊन आपली कन्या जांबुवती हिचा विवाह कृष्णाशी करून दिला. तेव्हा कृष्णानेही मण्याचा लोभ नव्हता तरीसुद्धा आपले निरपराधित्व सिद्ध व्हावे यासाठी तो मणी घेतला व पत्नीसह द्वारकेत परतला.
तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला आलेला पाहून सर्वत्र आनंदाचा महापूर आला; नंतर कृष्णाने राजसभा भरविली व अथपासून इतिपर्यंतचा सर्व वृत्तान्त सबसमक्ष सांगून तो स्यमंतक मणी राजा सत्राजिताच्या हाती दिला.
त्यावेळी आपण कृष्णावर विनाचौकशी चोरीचा आळ घेतला याचा सत्राजिताला पश्चात्ताप झाला व त्यानेही आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह कृष्णाशी लावून दिला. यापूर्वी अक्रूर, कृतवर्मा, आणि शतधन्वा अशांसारख्या यादव वीरांनी तिला मागणी घातली होती पण सर्वांना डावलून कृष्णाशी तिचा विवाह लावून दिला हा त्यांचा अपमान समजून ते सर्व जण सत्राजिताचे वैरी बनले.
नंतर त्या सगळ्यांनी मिळून कट केला आणि संधी साधून सत्राजिताला मारावा व तो मणी शतधन्व्याने घ्यावा असा बेत केला व तशी संधी आपोआप चालून आली,
त्याच सुमारास पांडव लाक्षागृहात जळून मेले अशी बातमी सर्वदूर पसरली. तेव्हा खरी हकीकत जाणत असूनही दुर्योधनाची दिशाभूल व्हावी या हेतूने कृष्ण वारणावत नगरीत पांडवांची उत्तरक्रिया पार पाडावी म्हणून निघून गेला.
त्यानंतर शतधन्व्याने झोपेत असलेला सत्राजित याचा वध केला आणि मणी घेऊन पळाला. पित्याला बेसावध असताना मारला असे पाहून दुःख व क्रोध अनावर होऊन सत्यभागा वारणावत नगरात गेली आणि कृष्णाला सर्व घटना सांगून बोलली की, “जर याचे पारिपत्य केले नाही तर कृष्णाची सर्व जगात छी:थू: होईल.”
त्यावर कृष्ण म्हणाला की, “भामे! तुझे बरोबरच आहे. हा माझा अपमान आहे आणि याचा सूड तर मी घेईनच घेईन. तू आता दुःख आवरते घे.” असे सांगून तो लगोलग द्वारकेत जाऊन बलरामाला भेटला व म्हणाला – ‘दादा! वनात शिकारीला गेला असता प्रसेनाला सिंहाने मारले होते आणि आता शतधन्वाने सत्राजिताला मारला आहे.तर ते दोघेही मरण पावले असल्यामुळे त्या मण्यावर आपणच दोघांना समान हक्क पोहचतो.तेव्हा आता सज्ज व्हा आणि शतधन्वाला मारण्यासाठी निघा.”
ते म्हणणे बलरामाला पटले व तो कृष्णासहित युद्धासाठी बाहेर पडला. ती बातमी जेव्हा शतधन्वाला समजली तेव्हा तो मदत मागण्यासाठी कृतवम्ययाशी गेला, तेव्हा “बलराम व कृष्ण यांच्याशी सामना करणे मला अशक्य आहे,” असे सांगून त्याने नकार दिला.नंतर शतधन्वा अक्रूरापाशी गेला असताना त्यानेही असमर्थता प्रकट करून नकार दिला. तो म्हणाला, “जाणुन बुजुन वणव्यात उडी मारणे ठीक नाही,”
तेव्हा सर्वतोपरी निराश झालेल्या शतधन्वाने अक्रुराला विनविले की निदान त्याने स्यमंतक मणी तरी स्वीकारावा व तो जपून ठेवावा. त्यावर अक्रुराने उत्तर दिले की,
“जरी जीव जाण्याची वेळ आली तरीही ही गोष्ट जर गुप्त ठेवणार असलास तर मी हा मणी घेतो.” ती अट शतधन्वाने मान्य केली आणि तो मणी अक्रुराच्या हाती देऊन तो निघून गेला.
नंतर एका वेगवान घोडीवर बसून तो पळाला पण चार घोड्यांच्या रथांतून बलराम व कृष्ण यांनी त्याचा पाठलाग केला, शंभर योजने अंतर ओलांडले तेव्हा शतधन्व्याची घोडी थकून खाली पडली व तिचा प्राण गेला, तेव्हा शतधन्वा पायीच धावत सुटला.
मग कृष्ण भावाला बोलला- “दादा! आपले घोडे पुढे जायला घाबरत आहेत म्हणून तू स्थातच थांब. मी धावत जातो आणि त्या दुष्टाचा समाचार घेतो.” ती गोष्ट बलरामाने मान्य केल्यावर कृष्णाने शंभर कोस एवढा पाठलाग केला व शेवटी सुदर्शन चक्र फेकून शतधन्व्याचा शिरच्छेद केला.
पुढे त्याची वस्त्रे वगैरे सर्व सामान तपासले तरी मणी काही सापडला नाही. तेव्हा परत फिरून तो भावाकडे जाऊन म्हणाला की, “याला आपण उगाच मारला. मणी तर त्याच्याजवळ मिळालाच नाही.”
त्यावर बलरामाला ते सर्व ढोंग वाटले व तो म्हणाला की, “तुझा धि:कार असो. अरे! तू केवळ स्वार्थापोटी एवढा खोटारडेपणा करतोस, तर मलाही यापुढे तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही. तू परत जा. मी मात्र परत येणार नाही.” एवढे बोलून कृष्णाने केलेल्या विनवण्यांना न जुमानता तो विदेह देशाकडे निघून गेला. कृष्णसुद्धा द्वारकेत परतला.
विदेह नगरीमध्ये राजा जनक त्याला घरी घेऊन गेला. तिथे असेतोवर त्याने दुर्योधनाला गदायुद्धाचे शिक्षण दिले. साधारण तीन वर्षांनी बभ्रू, उग्रसेन आदीकरून यादवांनी जाऊन कृष्णाच्या निरपराधपणाची खातरी दिली तेव्हा तो द्वारकेत परतला.
अक्रूर त्या मण्याच्या प्रभावामुळे अखंडित यज्ञ व अनुष्ठान करू लागला. यज्ञाची दीक्षा घेतलेल्या व्यक्तिला मारल्यास ब्रह्महत्येचे पाप लागते म्हणून तो संरक्षणासाठी सत् यज्ञ करीत असे. त्या स्यमंतक मण्याच्या प्रभावामुळे बासष्ट वर्षांपर्यंत द्वारकेत रोगराई, दुष्काळ आजार नव्हते. एवढेच नव्हे तर तेवढ्या काळात एकदेखील मृत्यू झाला नाही.
नंतर अक्रूराच्या भोजवंशीय लोकांनी सात्वताचा नातू ‘शत्रुघ्न’ याला मारल्यानंतर त्यांच्यासोबत अक्रूर देखील द्वारका सोडून चालता झाला. अक्रूर गेल्यापासून पुन्हा द्वारकेत रोगराई, दुष्काळ, पावसाचे दुर्भिक्ष, साथींचे आजार, सापांचे उपद्रव, घातपात, अपघात यांचे थैमान चालू झाले.
तेव्हा कृष्ण, बलराम, उग्रसेन आदिकरून ज्येष्ठ यादव विचारविनिमय करू लागले की, अशा अचानक आपत्ती कोसळण्याचे कारण कोणते असावे? त्यावर एक वयोवृद्ध यादव अंधक सांगू लागला की, “अक्रूराचा बाप श्वफल्क हा जिथे रहात असे तिथे कधीच कोणत्याही आपत्ती येत नसत म्हणून काशीनरेशाच्या राज्यात जेव्हा एकदा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा तो श्वफल्काला घेऊन गेला असता लगेच भरपूर पाऊस झाला होता. “
त्या सुमारास काशीराजाच्या पत्नीच्या गर्भात एक कन्या वाढत होती. पूर्ण दिवस भरूनही प्रसूती होईना. अशी बारा वर्षे निघून गेली. तेव्हा काशीराजाने त्या मुलीला प्रश्न केला की, “बाळा! तू बाहेर का पडत नाहीस? तुझ्या आईला होत असलेल्या कष्टांचा तरी विचार कर.”
तेव्हा ती मुलगी बोलली की, “पिताजी! जर तुम्ही दररोज एक गाय ब्राह्मणाला दान करू लागलात तर मी आजपासून तीन वर्षांनी जन्म घेईन.” ती गोष्ट मान्य करून राजाने गोदान देण्यास आरंभ केला. तेव्हा तीन वर्षांनी ती बालिका जन्मली. राजाने तिचे नाव ‘गांदिनी’ असे ठेवले. नंतर ती उपवर झाली असता तिचा विवाह श्वफल्काशी लावून दिला. त्या दोघांचा अक्रूर हा पुत्र आहे.
असा तो पवित्र आई-वडिलांपासून जन्मलेला अक्रूर निघून गेल्यावर तिथे आपत्ती कोसळतील यात आश्चर्य असे कोणतेच नाही. तेव्हा कसेही करून त्याला परत नगरात घेऊन या. सगुणी माणसाच्या अपराधाची जास्त चिकित्सा करणे ठीक नव्हे.”
हे अंधकाचे मत सर्वांना पटले. उग्रसेन, कृष्ण, बलराम यांच्यासहित द्वारकेतील प्रतिष्ठित नागरिक जिथे अक्रूर होता तिथे गेले व त्याचे अपराध क्षमा करून समेट केला व त्याला द्वारकेत घेऊन आले. तो आल्यापासून स्यमंतक मण्याच्या प्रभावाने द्वारकेत पुन्हा पूर्वीप्रमाणे निरुपद्रवी परिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र आनंदीआनंद झाला.
तरीही तेवढ्याने कृष्णाचे मात्र पूर्ण समाधान झाले नाही. त्याने विचार केला की, अक्रूराचा जन्म पुण्यवान आई-बापांच्या पोटी झाला हे जरी खरे असले तरी दुष्काळ, महामारी, पाऊस न पडणे यावर तो काही निर्वाणीचा उपाय निश्चितच नाही. याचे मूळ कारण काहीतरी निराळे असणार. ते म्हणजे स्यमंतक मणीच होय. याचाच हा प्रभाव आहे. अर्थात या अक्रूराजवळ तो मणी असला पाहिजे.
दुसरी गोष्ट अशी की, उत्पनाचा काही मार्ग नसतानाहार एकामागोमाग एक असे करीत सुटला आहे. तरी मग त्याने वेगळ्याच कारणावर चर्चा करण्याच्या बहाण्याने सर्व यादव गोत्रीय नेत्यांना एकत्र बोलावले. सगळे जण एकत्र जमल्यावर मुख्य कारण जे होते त्यावर चर्चा होऊन निर्णय झाला. नंतर अक्रुराकडे वळून कृष्ण म्हणाला “हे दानपती शतधन्वाने बहुमोलाचा स्यमंतक मणी तुला सुपूर्द केला आहे ही गोष्ट आम्हाला समजून चुकली आहे. परंतु राज्यातील सर्व नागरिकांचे कल्याण जर का त्यामुळे होत असेल तर तो तुझ्याकडेच असू दे! पण बलरामदादाला संशय वाटतो की, तो मणी मीच लांबविला आहे. तेव्हा माझ्यावरचा आळ जाण्यासाठी तू या सर्वांना तो मणी फक्त दाखव म्हणजे झाले.”
तेव्हा अटूर मनाशी म्हणाला की, मी जर आता मणी दाखवला नाही तर हे सगळे मिळून माझी पुरी झडती घ्यायला कमी करणार नाहीत व पुन्हा नाचकी होण्याची काही टळणार नाही. तेव्हा खरे जे आहे ते सांगून मोकळे व्हावे हे उत्तम!
मग तो उघडपणे बोलला “हे प्रभू कृष्णा! तो मणी मला शतधन्व्याने दिला होता. त्याच्या मृत्यूनंतर मी तो जिवापाड जपून ठेवला आहे; कारण मी असा विचार केला की, केव्हा ना केव्हातरी तुम्ही तो मागून घ्यालच, मात्र त्या मण्याचे रक्षण करण्याची जोखीम शिरावर असल्यामुळे मला शांती नसते.
तेव्हा हा मणी घ्या व त्याची योग्य वाटेल अशी व्यवस्था करा.” असे सांगून त्याने तो मणी बाहेर काढून सर्वांसमोर ठेवला. त्या मण्याच्या विलक्षण अशा तेजाने तिथल्या सर्वांचे डोळे दिपले. सर्व यादवांनी अक्रूराची प्रशंसा केली.
परंतु बलरामाने मात्र त्यावर आपणालाही मालकी हक्काचा वाटा हवा असे सांगितले. सत्यभामासुद्धा म्हणाली की, तिचा पिता सत्राजित हा त्या मण्याचा मूळ मालक असल्याकारणाने तीच खरी हक्कदार आहे.
आता मात्र कृष्णासमोर मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. तरीही तो शांतपणे म्हणाला की, “सभाजन हो! माझा निरपराधीपणा सर्वांसमोर सिद्ध व्हावा म्हणून मी तो मणी सर्वांना दाखविला. या मण्यावर माझा व दादाचा समसमान अधिकार आहे.
सत्यभामेचा दावासुद्धा न्याय्य आहे. तो मणी तिची वडिलोपार्जित वस्तू आहे परंतु मुख्य अडचण अशी आहे की, पवित्र आणि ब्रह्मचर्य पाळणाऱ्यापाशी हा मणी असला तर तो सर्व समाजाचे कल्याण करतो. पण अपवित्र व्यक्तीने जर तो मणी धारण केला तर तो धारण करणाऱ्याचा सत्यानाश करील.
माझ्या सोळा हजार बायका आहेत त्यामुळे मी किंवा सत्यभामा हा वापरू शकणार नाही. बलरामाला यासाठी दारू व इतर व्यसने सोडावी लागतील. तेव्हा सर्वांच्या वतीने मी अक्रूराला विनंती करतो त्यानेच हा मणी सांभाळावा. त्यामुळे सर्व राज्याचे भलेच होईल.”
कृष्णाचा हा तोडगा सर्वांनी मान्य केला आणि अक्रूर मणी उचलून घेऊन निघाला.
अशी ही कथा जो स्मरण करील त्याच्यावर कधी कोणता आळ येणार नाही.”
श्री विष्णु पुराण अंश-४ / भाग -७ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७