श्रीविष्णु पुराण अंश-५
(कृष्णकथा भाग-१)
कहाणी श्रीकृष्ण जन्माची!
वैदिक साहित्यात म्हणजेच वेद आणि पुराणात दोन चरित्रे लोकप्रिय आणि विश्व प्रसिद्ध आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची! श्रीविष्णु पुराणात रामायणाचा कथासार आपण थोडक्यात पहिला. श्रीविष्णु पुराणातील संपूर्ण ५ वा अंश श्रीकृष्ण चरित्राला वाहिला आहे. आज पासून आपण श्रीविष्णु पुराणातील श्रीकृष्ण चरित्र पाहणार आहोत.
मैत्रेय पुन्हा विचारते झाले – “भगवान! राजवंश, त्यांचे वंशविस्तार व राजांची चरित्रे आपण सांगितली. आता मला यदुच्या कुळात पूर्ण अंशाने विष्णूचा जो अवतार झाला त्याचा जन्मवृत्तान्त व त्याने केलेल्या लीला कृपा करून ऐकवा.”
कृष्णावतार – पूर्ववृत्त
पराशर बोलू लागले –
“हे मुनिवर्य! पूर्वीच्या काळी देवकाची मुलगी देवकी हिचा विवाह वसुदेवाशी झाला. त्यानंतर वरात निघाली तेव्हा भोजपुत्र कंस हा कौतुकाने सारथी होऊन, रथ हाकू लागला तेव्हा अकस्मात आकाशवाणी झाली की ‘अरे मूर्ख कंसा! तू जिला सासरी नेतो आहेस त्या देवकीचे आठवे संतान तुझा पुढे वध करणार आहे.’
त्यासरशी कंसाने रथ थांबवला व तलवार काढून देवकीवर उगारली. तेव्हा हात जोडून वसुदेव म्हणाला, “कंसा! स्त्रीहत्या करू नकोस. हिच्या पोटी जी मुले जन्मतील ती सर्व मी तुझ्या हाती देईन.” ते म्हणणे कंसाने मानले व तो शांत झाला.
त्याचवेळी असुरांच्या जुलुमाला विटून जाऊन पृथ्वी गायीचे रूप धरून ब्रह्मदेवापाशी गेली व तिने आपले गाऱ्हाणे मांडले. ती म्हणाली की पूर्वजन्मीचा कालनेमी राक्षस कंस म्हणून पुन्हा जन्मला आहे. त्याचप्रमाणे आणखी अगणित राक्षस पुन्हा जन्मास आले आहेत. आता यांनी मला बुडवून रसातळात नेण्याआधीच त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा.
तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेला तिथे आदिपुरुषाची आळवणी करू लागला. तेव्हा भगवान अनादि सिद्ध परमात्मा बोलू लागले
“हे ब्रह्मदेवा! तुला जे काही मागावयाचे असेल ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” त्यावर ब्रह्माने दैत्यांचे अत्याचार व जुलूम यांचा पाढा वाचला. तेव्हा नारायणाने एक काळा व एक पांढरा असे डोक्याचे केस उपटले व म्हणाला की, दोन्ही केसांचे पृथ्वीवर दोन अवतार होतील व पृथ्वी निर्भय करतील. देवांनीही योग्य जागी अंशवतार घेऊन त्यांना साहाय्य करावे.
जो काळा केस आहे तो देवकीच्या पोटचा आठवा पुत्र असेल व तो कंसाचा वध करील. असा वर मिळाल्यानंतर देव मेरूपर्वतावर परत गेले. पुढे त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतले.
याच वेळी नारद कंसापाशी गेला व देवकीला होणाऱ्या आठव्या प्रसूतीच्या समयी भगवान धरणीधर जन्मास येणार आहे असे त्याने सांगितले. तेव्हा कंस सावध झाला आणि त्याने वसुदेव व देवकीला तुरुंगात टाकले व चौक्या पहारा ठेवला. आपल्या वचनाला जागून वसुदेवाने प्रत्येक नवजात बालक कंसाला दिले. असे ऐकिवात आहे की सहा जीव जे गर्भात होते ते पूर्वजन्मात हिरण्यकशिपूचे पुत्र होते. हे सर्वकृत्य विष्णूच्या योगनिद्रेने केले.
विष्णूची आज्ञा अशी होती की, तिने असे सहा वेळा केल्यानंतर सातव्या वेळी देवकीच्या गर्भात शेष प्रवेश करील. त्यावेळी तिने तो सातवा गर्भ काढून गोकुळात वसुदेवाची आणखी एक पत्नी जी रोहिणी नावाची आहे तिच्या गर्भात तो ठेवावा. सर्वांना असेच वाटेल की देवकीचा सातव्या वेळी गर्भपात झाला. त्या रोहिणीपुत्राला ‘संकर्षण’ या नावाने लोक जाणतील.
पुढे विष्णू म्हणाला की, आठव्या गर्भात तो स्वतः प्रवेश करील. त्याचवेळी योगमाया तिनेही यशोदेच्या गर्भात प्रवेश करावा. ऐन पावसाळ्यातील भाद्रपदाच्या महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीस मध्यरात्री त्याचा जन्म होईल व नवमी लागली की तिचा जन्म होईल.
त्यावेळी असे घडेल की, हरिच्या योगमायेच्या शक्तीने वसुदेव देवकीचे बाळ घेऊन गोकुळात यशोदेपाशी जाईल आणि बाळांची अदलाबदल करून तिला घेऊन मथुरेत येईल; मग कंस तिला धरून शिळेवर आपटण्यासाठी उंच उचलील तेव्हा तिने त्याच्या हातातून निसटून गगनात जावे. तेव्हा इंद्र नतमस्तक होऊन तुला मोठ्या बहिणीचे स्थान देईल.
तू सुद्धा कालांतराने शुंभ-निशुंभ आदिकरून हजारो राक्षसांना मारून अनेक स्थळात विराजमान होशील. हे देवी! भूति, संनति, क्षांति, कांति तूच आहेस. आकाशापासून पृथ्वीपर्यंत असलेले सर्व काही, तसेच धारणा सद्बुद्धी, पोषिणी व उषा यांसह सर्व तूच आहेस. फार कशाला? माझी सर्वव्यापिनी शक्ती तूच आहेस.
जे कुणी सकाळ-संध्याकाळच्या वेळी अति श्रद्धेने व नम्रतापूर्वक तुला आर्ये! दुर्गे! भद्रे! वेदगर्भे! अंबिके! भद्रकाली! क्षेमदे! भान्यदे! वगैरे नावांनी आळवितील त्यांच्या सर्व मनोकामना मी स्वतः पुऱ्या करीन. तुला मदिरा (दारू) आणि मांस अर्पण करून व इतर खाद्यवस्तू अर्पण करून जे पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा माझ्या इच्छेने तुझ्याकडून पुरविल्या जातील.
आता तू आपल्या स्थानी जा!”
श्रीहरिचा गर्भप्रवेश आणि देवांकडून देवकीचे अभिनंदन
पराशर पुढे म्हणाले, “श्री विष्णूच्या योजनेनुसार योगमायेने देवकीच्या गर्भात सहा वेळा गर्भाची स्थापना केली; नंतर सातवा गर्भ दवडून तो रोहिणीच्या गर्भात ठेवला. श्रीविष्णू देवकीच्या उदरात शिरला आणि योगमाया यशोदेच्या गर्भात स्थिरावली.
देवकीच्या अंगोपांगी दिव्य तेज झळकू लागले. सर्व देव जमून तिची स्तुती करू लागले. ते म्हणाले की, “हे शुभांगी! तूच मूळ प्रकृती आहेस. वेदगर्भा, सृष्टिकर्ती, देव व दैत्यांची जननी तूच आहेस! सूर्याची प्रभा, ज्ञानगर्भा, इच्छा, लज्जा, तुष्टि, प्रज्ञा व धृति ही तुझीच रूपे आहेत.
ब्रह्मांडाचे आवरण जे आकाश ते तूच आहेस. समुद्र, महापर्वत, नदया, दीपे, गाव यांसह संपूर्ण पृथ्वी, अग्नी, जल, वायू, सप्तलोक, सप्तपाताळे व सर्व जीवात्मे यांना व्यापून असणारा परमात्मा तुझ्या पोटात आहे. हे देवी! तू प्रसन्न हो आणि जगाचे कल्याण व्हावे यासाठी तुझ्या गर्भातील जो जगदात्मा जगदीश्वर आहे, त्याचे संगोपन कर.”
कृष्ण जन्माला ग सखे कृष्ण जन्मला !
कृष्णजन्म व योगमायेचे गमन
“हळूहळू देवकीचे पूर्ण दिवस भरताच श्रावण वद्य ८ या तिथीला मध्यरात्री तिच्या पोटी बालक जन्मला. त्यावेळी मंद मंद वायू वाहू लागला. सगळ्या वातावरणात मधुर सुगंध भरून राहिला. सर्वत्र एक प्रकारची प्रसन्नता पसरली.
पुत्रमुख पाहून आनंदित झालेल्या वसुदेवाने बालकाची स्तुती केली आणि कंसाबद्दल वाटणारी भीती त्याला निवेदन केली. देवकीने देखील तिच्या मनातील भीती निवेदन केली आणि आपले दिव्य रूप आवरते घे अशी विनंती केली.
त्यावर श्रीहरिने सांगितले की, पूर्वी एका जन्मात तिने परमात्मा पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. त्यानुसार आज ती प्रार्थना फळाला आलेली आहे. त्यानंतर वसुदेवाने बाळाला उचलून घेतला व एका मोठ्या टोपलीत ठेवून व ती टोपली डोक्यावर घेऊन तो बाहेर निघाला. त्यावेळी योगमायेच्या प्रभावामुळे सर्व दारे सताड उघडलेली होती आणि पहारेकरी बेहोश होऊन पडले होते,
वसुदेव निघाला तेव्हा पाऊस कोसळत होता म्हणून शेषाने आपल्या फणांनी टोपलीवर छत्र धरले होते व रस्ता दिसावा म्हणून विजा चमकत होत्या. तुफान वेगात वहात असलेली यमुना पार करताना वसुदेवाला कुठेही गुडघ्याच्या वर पाणी लागले नाही. गोकुळात यशोदेला मुलगी झाली होती. तिथेही सर्व लोक बेहोश होऊन पडले होते.
तेव्हा वसुदेवाने गुपचूप मुलांची अदलाबदल केली आणि तो मुलीला उचलून घेऊन गेला आणि देवकीपाशी निजवली. त्यानंतर योगमायेने आपला प्रभाव काढून घेतला तेव्हा ती मुलगी रडू लागली; मग ते पहारेकरी जागे झाले आणि त्यांनी ते वृत्त कंसाच्या कानी घातले. तेव्हा कंस धावतच आला व देवकी रडत असताना तिच्या कुशीतली मुलगी ओढून घेऊन बाहेर अंगणात गेला. तिथे त्याने शिळेवर आपटावी म्हणून ती मुलगी उंच उचलली पण ती त्याच्या हातातून निसटून आभाळात गेली.
तिथे तिने आपले आठ हातात शस्त्रे घेतलेले रूप प्रगट केले आणि खदखदा हसत कंसाला म्हणाली,
“अरे कंसा! मला उचलून आणून तुला काय बरे मिळाले? तुला मारणारा तर जन्माला आलाच आहे तो श्रीहरिच तुझा पूर्वजन्मातील (कालनेमी रूपातील) काळ होता. तेव्हा आता तरी तू सावध हो व आपले कल्याण साधून घे.”
असे बोलून ती देवी गुप्त झाली!”
वसुदेव व देवकीची सुटका
तेव्हा कंस खिन्न झाला. मग त्याने प्रमुख दैत्य बोलावून घेतले आणि सर्वांना म्हणाला,
“मी जे आता सांगणार आहे ते ऐकून घ्या. मला मारण्यासाठी देव सतत प्रयत्न करीत असतात परंतु त्यांना मी खिजगणतीत घरीत नाही. भितरा इंद्र, एकटा शंकर आणि कपटी विष्णू हे त्यांना कसली मदत करणार? आदित्य, वसू, अग्नी वगैरे सर्व देवगण माझे काहीही बाईट करू शकत नाहीत.
युद्धात इंद्र पाठ दाखवून कितीदा पळून गेला ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. या इंद्राने जेव्हा मेघांना रोखून जलवर्षाव बंद पाडला तेव्हा मी बाणांनी ढगांना फोडून अपार पाऊस पाडला नव्हता काय? माझे सासरे जरासंध महाराज यांच्याखेरीज पृथ्वीवरचे एकूण एक राजे माझ्या आधीन आहेत. या देवांचे माझ्याविरुद्ध जे प्रयत्न चालू असतात ते पाहून मला तर हसूच येते.
तरीसुद्धा माझ्या मित्रांनो! आपण गप्प न बसता आपली मोहीम अजून तीव्र केली पाहिजे. जिथे कुठे कुणी यज्ञयाग करीत असतील तर त्यांना ठार केले पाहिजे.
देवकीच्या कन्येने मला सांगितले की, माझा वैरी तर जन्मला आहे.. तेव्हा सर्व तान्ह्या बाळांचा वध करा.”
असे सांगून त्याने वसुदेव व देवकी यांना सोडून दिले व म्हणाला“मी आजपर्यंत तुमची सर्व बाळे निष्कारण मारली; कारण माझा नाश करणारा तर कुठे ना कुठे जन्मला आहे पण ही विधीचीच इच्छा होती असे मानून दुःख करू नका. तर ते तुमचे दुर्भाग्य होते.”
असे सांगून तो निघून गेला.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (भाग-१) (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल: ९४२२७६५२२७
Vishnu Puran Shrikrishna Birth Story by Vijay Golesar