अधिक मास विशेष- ४१
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -८)
भर सभेत श्रीकृष्णाने
शिशुपालाचा वध का केला?
पराशर म्हणाले – “अनमित्राला शिनि नावाचा मुलगा होता, त्याचा सत्यक- त्याचा सात्यकी उर्फ युयुधान- त्याचा संजय – त्याचा कुणि- त्याचा युगंधर! या सर्वांना शैनेय असे म्हटले गेले. याच वंशात पुढे पृश्नि जन्मला, पुलिचा अफल्क (याच्याविषयी मागील अध्यायात माहिती दिली आहे.) त्याचा गान्दिनीपासून अग्रत पुत्र झाला.
दुसऱ्या एका पत्नीपासून ज्यभट्ट, मुदामुद, विश्वारि, मेजय, निरिक्षत्र, उपक्षेत्र, शतघ्न, अरिमर्दन, धर्मदूक, दृष्टधर्म, गंधमीज, वाह व प्रतिवाद असे तेरा मुलगे आणि सुतारा नावाची मुलगी होती, अकाचे दोन मुलगे देववान आणि उपदेव हे होते. अंधकाचे चार मुलगे कुकुर, भजमान, शुचिवम्बल व वय असे होते. पैकी कुकुराचा मुलगा तो धृष्ट- त्याचा कमीसरीमा – त्याचा निलीमा- त्याचा अनु (तुम्बरूचा मित्र) – त्याचा आनकदमि त्याचा अभिजित- त्याचा पुनर्वसु – त्याचा आहुक असे पुत्र व आधुकी ही कन्या झाली, आहुक याला देवक व उग्रसेन हे दोन मुलगे झाले. देवकाचे चार मुलगे अनुक्रमे देववान, उपदेव, सहदेव आणि देवरक्षित हे होते, यांच्या सात बहिणी होत्या, त्यांची नावे नकदेवा, उपदेवा, देवरक्षिता, श्रीदेवा, शांतिदेवा, सहदेवा व देवकी अशी असून त्या सगळ्या वसुदेवाच्या बायका होत्या. उग्रसेनाचे पुत्र कंस, न्यग्रोध, सुनाम, आनकाह, शंकु, सुभूमि, राष्ट्रपाल, युद्धतुष्टि आणि सुतुष्टिमान् असे नऊ जण असून कंसा, कंसावति, सुतनु व राष्ट्रपालिका अशा चौघी मुली होत्या.
भजमानाचा मुलगा विदूरथ- त्याचा शूर- त्याचा शमी- त्याचा प्रतिक्षत्र- त्याचा स्वयंभोज त्याचा हृदिक- त्याचा देवगर्भ असा वंश वाढला. त्यांपैकी देवगर्भ याचा पुत्र शूरसेन होता. त्याच्या मारिषा या पत्नीला वसुदेव आणि नऊ मुलगे होते,
पैकी वसुदेवाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या पोटी पुढे विष्णूचा अवतार होईल असे भविष्य जाणून देवांनी स्वर्गात वाद्ये वाजविली होती. त्यात दुंदुभी (नगारे) आनक वगैरे वाद्ये असल्यामुळे ‘आनकदुंदुभि’ असे नावसुद्धा प्रसिद्ध झाले, वसुदेवाचे जे नऊ भाऊ होते त्यांची नावे क्रमाने देवभाग,देवश्रवा,अष्टक, कुकुचक्र, वरसधारक, संजय, श्याम, शमिक आणि गंडूष अशी असून पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ति, श्रुतश्रवा व राजाधिदेवी या पाच बहिणी होत्या.
शूरसेनचा एक कुंतिभोज नावाचा मित्र निःसंतान होता, त्याला आपली मुलगी पृथा ही दत्तक दिली. पुढे पृथेचा उर्फ कुंतीचा विवाह झाला. तिला धर्म, वायू व इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, अर्जुन असे तीन पुत्र झाले.
तिला विवाहापूर्वी कुमारी असताना सूर्यदेवापासून कर्ण नावाचा एक अनौरस मुलगा झाला होता. तिची माद्री नावाची सवत होती. अश्वीनिकुमारांपासून नकुल व सहदेव असे दोन मुलगे झाले होते.
शूरसेनाची दुसरी मुलगी श्रुतदेवा ही कारूश देशाचा राजा वृद्धधर्मा याची पत्नी होती. तिच्या पोटी दंतवक्र नावाचा महादैत्य जन्मास आला. श्रुतकीतींचा विवाह केकय देशच्या राजाशी झाला. तिला संतर्दन वगैरे पाच मुलगे झाले. राजाधिदेवी हिला विंद व अनुविंद असे दोन मुलगे होते.
पाचवी सर्वांत धाकटी कन्या श्रुतिश्रवा हिचा विवाह चेदि देशीचा राजा दमघोष याच्याशी झाला. तिला शिशुपाल हा पुत्र झाला. तो पूर्वीच्या जन्मात हिरण्यकशिपू नावाचा दैत्यांचा मूळपुरुष होता. त्यावेळी त्याचा भगवान नृसिंहाने वध केला होता. पुढे पुन्हा तो सर्वगुणसंपन्न, विद्वान व महापराक्रमी व त्रैलोक्य जिंकून घेणारा रावण बनला.
पूर्वी वीरमरण आल्यामुळे त्या पुण्याईच्या जोरावर अनेक सुखोपभोग दीर्घ काळापर्यंत भोगून शेवटी तो रामरूपी भगवंताकडून मारला गेला. नंतर द्वापारयुगात तोच पुन्हा शिशुपाल बनला, तरीही तो विष्णूचा द्वेष करीत होताच पण शेवटी कृष्णाच्या हातून मृत्यू पावून तो सायुज्य मुक्तीला गेला”
श्री विष्णु पुराण अंश-४/ भाग -८ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७