अधिक मास विशेष- ४२
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -९ )
पूर्व जन्मात शिशुपालच होता
‘हिरण्यकशिपू’ आणि ‘रावण’!
मैत्रेयांनी विचारले “भगवान पूर्वी हा शिशुपाल हिरण्यकशिपू व रावण असताना हरिच्या हातून मरण पावला व त्यामुळे अनेक देवदुर्लभ असे भोग त्याने भोगले खरे परंतु तो हरिरूप काही झाला नाही. मात्र शिशुपाल बनल्यावर श्रीहरिकडून मारला गेला तेव्हा सायुज्यमुक्ती मिळाली तर या मागचे कारण काय आहे, ते कृपा करून समजावून दया.”
त्यावर पराशर सांगू लागले.
पहिल्या जन्मात हिरण्यकशिपू असतेवेळी तो नृसिंह अवतारातील विष्णूकडून जेव्हा मारला गेला तेव्हा त्याची भावना अशी होती की, हा कुणीतरी मोठा पुण्यात्मा आहे पण तो विष्णू आहे हे तो जाणत नव्हता. त्यामुळे तो पुढे रावण झाला. त्यावेळी त्याच्या मनात तीव्र कामवासना असल्यामुळे रामाकडून मरण आले तरी त्याची भावना अशी होती की, हा कुणीतरी पुण्यवंत मानव आहे.
दोन्ही वेळा श्रीहरीच्या हातून मेल्यामुळे मृत्यूच्या पश्चात परलोकीचे उत्तमोत्तम भोग भोगून तो पुन्हा जन्मास आला; मग तिसऱ्यांदा तो श्रेष्ठ चेदिराजाच्या कुळात शिशुपाल म्हणून जन्मास आला व अपरंपार ऐश्वर्य भोगले. त्यावेळी पूर्वजन्मातील द्वेषाचे संस्कार त्याच्या चित्तात दृढ असल्यामुळे तो क्षणोक्षणी हरिचे नाव घेऊन निंदा करीत असे. विष्णूची निंदा करणे, हा त्याचा सततचा उद्योग होता,
नंतर जेव्हा तो कृष्णाकडून सुदर्शन चक्राने मारला गेला तेव्हाही त्याची दृष्टी कृष्णावर एकटक रोखलेली होती व मुखात त्याचेच नाव होते म्हणून ‘अंते मतिः सा गतिः’ या न्यायाने तो सायुज्य मुक्ती प्राप्त करता झाला. विरोधी भक्ती करणाऱ्याला जर एवढे फळ मिळते तर प्रेमभक्ती करणाऱ्याला मुक्ती मिळेल यात संशय नाहीच. असो!
वसुदेवाचा वंशविस्तार
वसुदेवाला देवकीखेरीज पौरवी, रोहिणी, मदिरा, भद्रा बगैरे कितीतरी स्त्रिया होत्या. त्यातील रोहिणीला बलराम, शठ, सारण, दुर्मद वगैरे बरेच पुत्र झाले. त्यांच्यापैकी बलराम व रेवती या जोडप्याला विशठ व उत्मुक असे दोन मुलगे झाले.
सारणाला सार्ष्टि, मार्ष्टि, सत्य व धृति हे मुलगे झाले. यांच्याशिवाय रोहिणीचे भद्राश्व, भद्रबाहु, दुर्दम, भूत असे पुत्र होते. मंदिरेचे नंद, उपनंद व कृतक वगैरे आणि भद्रेचे उपनिधि, गद बगैरे मुलगे होते. वैशालीला मात्र कौशिक हा एकच मुलगा झाला.
वसुदेव व देवकी यांना कीर्तिमान, सुषेण, उदायु, भद्रसेन, ऋजुदास व भद्रदेव असे सहा मुलगे झाले. ते सगळे कंसाने मारून टाकले नंतर देवकी सातव्या वेळी गरोदर असताना भगवंताच्या प्रेरणेने योगमायेने तो गर्भ काढून रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. त्याचे नाव संकर्षण असे पडले.
आठव्या वेळी मात्र सर्व ब्रह्मांडाचा मूलकारण, अनादि व अनंत असा भगवान वासुदेव पूर्णांशाने देवकीच्या गर्भात प्रवेश करता झाला. त्याच वेळी तिकडे गोकुळात नंदराजाची पत्नी यशोदा हिच्या गर्भात हरिने प्रवेश केला. नंतर पुढे कृष्ण जन्मास आला.
त्या अवतारात त्याच्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया होत्या. त्यांच्यात रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, चारुहासिनी वगैरे आठजणी पट्टराण्या होत्या. या सर्वांपासून एकंदर एक लक्ष ऐंशी हजार पुत्र जन्मास आले. त्यांत प्रद्युम्न, सांब, चारुदेष्ण असे तेरा जण प्रमुख होते. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मवतीशी झाला होता. त्यांचा पुत्र अनिरुद्ध! त्याचा विवाह रुक्मीची नात सुभद्रा हिच्याशी झाला.
अनिरुद्धाचा मुलगा वज्र -त्याचा प्रतिबाहु -त्याचा सुचारू अशा तऱ्हेने यादवांचा वंश एवढा वाढत गेला की, त्यांची गणती करायला शंभर वर्षेही कमी पडतील. एका ग्रंथांत असा उल्लेख आहे की, यादववंशीय पुत्रांना शिक्षण (धनुर्विद्येचे) देण्याकरीता जे आचार्य नेमलेले होते, ते तीन कोटी अठ्ठयाऐंशी लक्ष एवढे होते. अशा स्थितीत यादवांची मोजदाद कोण बरे करू शकेल? या यदुवंशाची एकूण एकशे एक घराणी होती. असे हे वृष्णिच्या वंशाचे पावन आख्यान ऐकणारा विष्णूलोकांत जातो.
तुर्वसू आणि द्रुह्युचा वंश
पराशर पुढे म्हणाले “तुर्यसूचा मुलगा वन्ही त्याचा भार्ग त्याचा-भानु- त्याचा त्रयीसानु-त्याचा करंदम- त्याचा मरुत्त होय.
हा मरुत्त निःसंतान असल्यामुळे त्याने पुरुच्या वंशातील दुष्यंत याला दत्तक घेतला. अशा तऱ्हेने ययातीच्या शापामुळे तुर्ब पुरु या दोन्ही वंशांचे एकीकरण झाले.
“दुयुचा पुत्र बश्रु – त्याचा सेतु -त्याचा आरब्ध- त्याचा गांधार-त्याचा धर्म -त्याचा घृत- त्याचा दुर्दम -त्याचा प्रचेता त्याचा शतधर्म होता, तो उत्तरेकडील म्लेच्छ लोकांचा अधिपती होता.”
अनुची वंशावळ
“ययातीचा चौथा मुलगा अनु- अनुचे तीन मुलगे सभानल, चक्षु आणि परमेषु असे होते. पैकी सभानलाचा पुत्र कालानल -त्याचा संजय -त्याचा पुरंजय- त्याचा जनमेजय- त्याचा महाशाल -त्याचा महामना -त्याचे उशीनर व तितिक्षु हे दोन पुत्र। उशीनराला पाच मुलगे झाले. त्यांची नावे शिबि, नृग, नर, कृमि आणि वर्म अशी होती. पैकी शिबिला पृषदर्भ, सुबीर, केकय व मद्रक असे चार पुत्र झाले. उशीनराचा भाऊ तितिक्षु याचा पुत्र रुशद्रथ त्याचा हेम- त्याचा सुतचा, त्याचा बलि होता. या बलिच्या पत्नीपासून दीर्घतमा नावाच्या मुनीने अंग,वंग,कलिंग, सुम्ह, आणि पौड्र असे पाच क्षत्रिय जन्माला घातले. त्यांच्या नावावरून पुढे पाच राज्ये निर्माण झाली.
त्यांच्यापैकी अंग याचा पुत्र अनपान -त्याचा पुत्र दिविरथ -त्याचा धर्मरथ -त्याचा चित्ररथ होता. त्याला रोमपाद असेही आणखी एक नाव होते. तो अजाचा पुत्र दशरथाचा स्नेही असून दशरथाने आपली शांता नावाची मुलगी त्याला दत्तक दिली होती.
रोमपादाचा पुत्र चतुरंग व त्याचा पृथलाक्ष आणि त्याचा चंप होता. त्याने चंपानगरी बसविली. चंपाचा मुलगा हर्यंग – त्याचा भद्ररथ- त्याचा बृहद्रथ -त्याचा बृहत्कर्मा -त्याचा बृहद्भानु -त्याचा बृहन्मना -त्याचा जयद्रथ असे पुत्र झाले.
जयद्रथाची पत्नी ही ब्राह्मण व क्षत्रिय अशा आई-बापांच्या पोटची असून तिला विजय हा पुत्र झाला. विजयाचा मुलगा धृति -त्याचा धृतव्रत -त्याचा सत्यकर्मा- त्याचा अतिरथ (अधिरथ) होता. पृथा
(कुंती) हिने पेटीत घालून गंगाप्रवाहात सोडून दिलेला मुलगा (कर्ण) यालाच मिळाला होता.
कर्णाला एकच पुत्र वृषसेन हा होता. अंगवंश एवढाच आहे.”
*
श्री विष्णु पुराण अंश-४/ भाग -९ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर मोबाईल-९४२२७६५२२७
Vishnu Puran Shishupal Last Birth by Vijay Golesar