अधिक मास विशेष-३५
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -२ )
५० बायका आणि १५० पुत्र असलेल्या
सौभरी ॠषींची विवाह कथा
त्याच काळात बऱ्हाच सौभरी नावाचा एक ऋषी बारा वर्षांपर्यंत पाण्यातच रहात होता. त्याच पाण्यामध्ये सम्मद नावाचा एक अति विशाल असा मासा तिथेच होता. त्या माशाचा परिवार फार मोठा होता. त्याचे पुत्र, कन्या, नातू, पणतू वगैरेंच्या सहित क्रीडा करीत मोठ्या आनंदात तो रहात असे. त्यांच्या लीला पाहताना सौभरी मुनींना भान रहात नसे व तोदेखील समाधी सोडून तासंतास बघत राही. त्याला त्यांचे मोठे आकर्षण वाटे.
त्याचा परिणाम असा झाला की, सौभरीच्या मनात प्रपंचाविषयी तीव्र आसक्ती उत्पन्न झाली; मग तो उठून पाण्यातून उठून बाहेर आला आणि मान्धात्यापाशी गेला. राजाने त्याचे स्वागत करून आगमनाचा हेतू विचारला असता तो म्हणाला की, त्याला गृहस्थाश्रम करावयाचा आहे तरी राजाने आपली एक कन्या द्यावी. “तुझ्या वंशातील पुरुष दानी म्हणून विख्यात आहेत तरी तू आपल्या पन्नास कन्यांतील एखादी मला दे.”
तेव्हा राजाने त्यांचे तपाने वाळलेला व जराजर्जर असा देह पाहिला व तो काहीच न बोलता मुकाट्याने मान खाली करून बसून राहिला. सौभरीने पुन्हा विचारले तेव्हा राजाने मनात असा विचार केला की, याचे रूप पाहिल्यावर प्रौढ स्त्रियाही मान फिरवतील. तरुणी तर नाकारतील “महाराज!
यात काही शंकाच नाही; मग तो उघडपणे म्हणाला आमच्या घराण्यात अशी रीत आहे की, कन्या स्वत: ज्याला पसंत करते त्यालाच ती दिली जाते. तरी मी काय करावे ते तुम्हीच सुचवा.’
सौभरीने राजाचा डाव ओळखला व तो एवढेच म्हणाला की, “काही हरकत नाही. मी एकदा अंतःपुरातून फिरून येतो. जर कुठल्याही कन्येला मी आवडलो नाही तर मी माघारी परतून जाईन.”
तेव्हा राजाने एक सेवक सोबत देऊन सौभरी मुनीला अंत:पुरात पाठविले. तिथे प्रवेश करतेवेळी सौभरीने योगाच्या सामथ्याने आपले स्वरूप देवादिकांपेक्षाही तेजस्वी बनविले व आत प्रवेश केला. सेवकाने राजकन्यांना सांगितले की, राजाने यांना कोणतीही एक कन्या देण्याचे ठरविले आहे. तरी कुणा एकीने यांना पसंत करावे. तेव्हा ऋषीचे दिव्य स्वरूप पाहताच सर्व जणींना तो आवडला आणि ‘मीच यांच्याशी लग्न करणार’ असे म्हणत त्या भांडू लागल्या.
हा वृत्तान्त सेवकाकडून समजला तेव्हा राजाचा नाइलाज झाला; मग त्याने त्या सर्वजणींचा विवाह सौभरीशी मोठ्या थाटामाटाने लावून दिला. जेव्हा त्या बायकांसह ऋषी परतला तेव्हा त्याने विश्वकर्म्याला सांगून पन्नास दालने असलेला सुखसोयींनी युक्त असा महाल बनवून घेतला व तो तिथे राहू लागला. योगसामर्थ्याने तो एकाच वेळी सर्व जणींशी रममाण होत असे.
पुढे एकदा राजा सहज कन्यांना भेटावयास गेला तेव्हा त्यांच्याकडून त्याला समजले की, त्या सगळ्या जणी परमसुखात आहेत. तेव्हा राजा सौभरीला भेटला व त्याचा पाहुणचार घेऊन माघारी गेला.
नंतर त्या सर्वजणींना मिळून दीडशे पुत्र झाले. सौभरीसुद्धा त्यांच्या बाललीला पहात आनंदीत होई; मग तो त्यांच्या मोठेपणाची, विवाहांची, नातवंडाची स्वप्ने पहात राही. अशी कितीतरी वर्षे उलटली.
पण पुढे तो भानावर आला व मनाच्या मोहाने आपण केवढी तपश्चर्या व्यर्थ दवडली याचा त्याला पश्चात्ताप झाला आणि सर्व प्रपंच पुत्रांच्या हवाली करून, सर्व बायकांना सोबत घेऊन वनात निघून गेला. पुढे पुन्हा तपस्या करून तो मोक्षाप्रत गेला. असे हे सौभरीचे परम पावन चरित्र जो कुणी ऐकेल, शिकेल, शिकवील, स्मरण करील, लिहिल, लिहवून घेईल व दुसऱ्यांना ऐकवील तो सहा जन्मांपर्यंत सर्व शुभ फळे प्राप्त करील.
मान्धात्याचा वंशविस्तार – त्रिशंकू व सगर यांची कथा
आता मांधात्याचा वंशविस्तार कसा होत गेला ते ऐका. मांधात्याचा पुत्र अंबरीष आणि त्याचा युवनाश्च होता. युवनाश्वाचा हारीत व त्याचे हारीतगण होते. पूर्वी रसातळात रहाणाऱ्या सहा कोटी गंधर्वांनी तिथल्या सर्व नागांची संपत्ती व अधिकार हिरावून घेतले.
तेव्हा सर्व नागप्रमुखांनी परमात्म्याची करुणा भाकली असता देव त्यांना म्हणाला की, “युवनाश्वाच्या पुरुकुत्स नावाच्या पुत्राच्या अंगात संचार करून मी त्या दुष्ट गंधर्वांचा नायनाट करीन.”
असे ऐकल्यावर सर्व नागप्रमुख माघारी परतले आणि त्यांनी नर्मदेला पाठवून पुरुकुत्साला बोलावणे पाठविले. त्याप्रमाणे पुरुकुत्साने येऊन सर्व गंधर्वांना मारून टाकले व तो परतून गेला, तेव्हा सर्व नागांनी नर्मदेला असा वर दिला की, जो कुणी तुझे स्मरण करून तुझे नाव उच्चारील त्याला केव्हाही सर्पविषाची बाधा होणार नाही. तो श्लोक असा आहे.
‘नर्मदायै नमो प्रातर्नर्मदायै नमो निशि
नमोऽस्तु नर्मदे तुभ्यं रक्ष मां विषसर्पतः।।’
या मंत्राचे उच्चारण करण्याने सर्प दंश करीत नाही व अन्नातील विषसुद्धा बाधत नाही. पुरुकुत्साने समस्त नागांना असा वर दिला की नागांचा वंश कधीही खंडित होणार नाही. पुढे नर्मदेला पुरुकुत्सापासून त्रसदस्यु नावाचा पुत्र झाला.
या त्रसदस्युचा अनरण्य त्याचा पृषदूश्व त्याचा हर्यश्च – त्याचा हस्त त्याचा सुमना त्याचा त्रिधन्वा त्याचा त्रैयारुणि व त्याचा सत्यव्रत नावाच पुत्र होता, तो पुढे त्रिशंकू या नावाने ओळखला गेला. नंतर तो त्रिशंकू चांडाळ बनला.
एकदा असे झाले की, बारा वर्षांपर्यंत पाऊसच न पडल्याने दुष्काळ पसरला. तेव्हा विश्वामित्र मुनी व त्यांच्या परिवाराच्या पोषणासाठी त्रिशंकू दररोज एका वडाच्या झाडाला हरिणाचे मांस टांगून ठेवीत असे. ते त्याचे कृत्य पाहून संतुष्ट झालेल्या मुनी विश्वामित्रांनी त्याला सदेह (मानवी शरीरासह) स्वर्गात पाठविला.
श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -२ ( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
vishnu puran saubhari rishi wedding story by vijay golesar