अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग ११)
अवकाशातील फेरफटका!
सारी भगवंताची करणी. .!!
सात ऊर्ध्वलोक असे आहेत!
ग.दि. मांचे एक गीत आहे,
सारी भगवंताची करणी |
अधांतरी हे खुले नभांगण |
शेष फडावर धरणी .. . .
हे अफाट विश्व हेच एक कोडं आहे.हे विश्व केवढ आहे? त्याचा विस्तार किती आहे? आणि त्याचा चालक कोण आहे हे मानव जातीला पडलेले प्रश्न .सगळे वेद आणि पुराने यांत याचीच चर्चा केलेली आहे. अधिक मासानिमित्त आपणही श्री विष्णु पुराणातील माहिती पहात आहोत.
मैत्रेयांनी पराशर ॠषींना विनंती केली की, त्यांना सप्तलोकांची माहिती ऐकवावी. त्यावर पराशर सांगू लागले.
“जेवढ्या अंतरापर्यंत सूर्य व चंद्र यांचे किरण पोहोचतात तेवढी भूमंडलाची कक्षा आहे. पुढे तेवढाच विस्तार भुवर्लोकाचा आहे. पृथ्वीपासून एक लाख योजनांबर सूर्य आहे आणि त्याच्यापुढे तेवढ्याच अंतरावर चंद्र आहे. त्याच्याही पुढे एक लक्ष योजने दूर नक्षत्रलोक आहे.
नक्षत्रलोकाच्या पुढे दोन लक्ष योजनांवर बुध आहे. आणखी पुढे दोन लक्ष योजनांवर शुक्र आहे. त्यापुढे तेवढाच दूर मंगळ, पुढे तेवढाच दूर गुरू, त्याच्यापुढे तेवढ्याच अंतरावर शनी आहे. त्याच्याही पुढे एक लाख योजने दूर सप्तर्षीलोक आणि त्यानंतर शंभर हजार योजनांवर या सर्व ब्रह्मांडाचे नाभिस्थान (केंद्र) अर्थात ध्रुव आहे. एवढा त्रैलोक्याचा विस्तार आहे.
आता ध्रुवाच्याही पलीकडे एक कोटी योजनांवर भृगु वगैरे सिद्ध राहतात तो महर्लोक आहे. त्याच्याही पलीकडे दोन कोटी योजनांवर जनलोक आहे. तिथे ब्रह्मदेवाचे पुत्र सनक, सनंदन बगैरे राहतात. त्यापुढे आठ कोटी योजने दूर तपोलोक आहे. तिथे वैराज वगैरे समूह राहतात. पुढे बारा कोटी योजनांएवढ्या अंतरावर ब्रह्मलोक आहे. तिथले रहिवासीशेवटी खऱ्या अर्थाने अमर आहेत.
देहाने चालत जिथवर जाऊ शकतो तेवढा भूलोक आहे. सिद्ध व मुनी राहतात तो भुवलॉक आहे. तो पृथ्वीपासून सूर्यलोकापर्यंत पसरलेला आहे. स्वर्गाचा विस्तार सूर्यापासून तो ध्रुवापर्यंत आहे. एवढेच त्रैलोक्य असून ते कृतक म्हणजे नाशीवंत आहे. त्याच्या पुढचे चार लोक हे अविनाशी आहेत.
मैत्रेय महाराज! ब्रह्मांडाचा विस्तार एवढाच आहे. त्याचा आकार कवठाच्या फळासारखा असून त्याच्या सभोवती दहापट पाणी आहे. त्या पाण्याभोवती अग्नीचे आवरण आहे. त्याच्या सभोवार वायूचे व वायूच्या भोवती आकाशाचे आवरण आहे. ही सर्व आवरणे एकापेक्षा दुसरे दहापट जास्त अशा प्रमाणात आहेत. पुन्हा आकाशाला तामस अहंकाराचे व त्याला महत्तत्वाचे वेष्टण आहे. महत्तत्व अनंत अशा प्रधान तत्त्वाने वेढलेले आहे. त्या प्रधान तत्त्वाचे कोणतेही मोजमाप नाही कारण त्याला अंतच नाही.
हे मुनिवर! ते तत्त्व म्हणजेच सर्व जगाचे मूळ आहे व तीच पराशक्ती होय. तिच्या उदरी आपल्या या ब्रह्मांडासारखी लक्षावधी ब्रह्मांडे आहेत. जसा अग्नी लाकडात सुप्त असतो किंवा जसे तेल तिळात असते तसा चेतन, स्वयंप्रकाश, व्यापक आत्मा तिच्यात सामावलेला आहे.
सर्वच घडामोडींना ती विष्णूशक्तीच कारणीभूत आहे. सर्व ब्रह्मांडांची उत्पत्ती-स्थिती व विलय या सर्व गोष्टी तीच घडविते परंतु या सर्वांमागे सत्ता मात्र एका श्रीहरिची आहे. अर्थात हा जो विश्वाचा विस्तार दिसत आहे आणि घडोघडी जे जन्ममृत्यूंचे रहाटगाडगे स्वयंप्रेरणेने फिरते असे आपणांस वाटते त्याच्या मुळाशी विष्णू अर्थात परब्रह्म हाच आहे. सर्व चराचर, दृश्य-अदृश्य जग व त्यात चालणारे यज्ञ, यजनक्रिया, वनद्रव्ये, साहित्य व यज्ञाचा फलदाता सर्व काही एकमेव श्रीहरिच आहे.
ब्रह्मांडाची कालगणना
पराशर पुढे म्हणतात- मी तुम्हाला ब्रह्मांडाची रचना सांगितली. आता सूर्य, नक्षत्रे, कालचक्र, लोक व गंगेची उत्पत्ती यांबद्दल सांगणार आहे. हा जो सूर्य आहे त्याच्या रथाचा आकार नऊ हजार योजने एवढा आहे. त्याच्या आसाचे एक टोक ध्रुवाच्या दिशेस असून दुसरे टोक मानसोत्तर पर्वताच्या दिशेला आहे. त्याला एकच चाक असून सात छंदरूपी घोडे तो रथ ओढीत असतात. अतिशय वेगवान अशा गतीने तो अखंडपणे फिरत असतो.
सूर्याला उदय नाही की अस्त नाही. परंतु (गतीमुळे) तो दिसला की उगवला व दिसेनासा झाला की, मावळला असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यावरच दिशा आधारित आहेत. रात्री सूर्य दिसत नसतो तेव्हा प्राण्यांना अग्नीचा आधार असतो.
सूर्याच्या गतीमुळेच पळे, घटिका, मुहूर्त, मास, दिवस-रात्र, अयने, संवत्सर, युगे अशी काळाची मोजणी करणे शक्य होते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून पृथ्वीवर उत्तरायनाचा आरंभ होत असतो. तेव्हापासून दिनमान कलेकलेने वाढू लागते. नंतर जेव्हा तो सहा राशी पार करून कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायन सुरू होते व रात्रिमान कलेकलेने वाढू लागते. सूर्याची गती नेहमी एकसारखी नसून राशींमधील अंतराप्रमाणे कमीजास्त होत असते. असा हा सूर्य विष्णूचा श्रेष्ठ अंश आहे.
आता दैनंदिन कालगणना सांगतो. पंधरा निमेष (पापण्यांची उघडझाप होते तेवढा काळ म्हणजे एक निमिष) उलटले की १ काष्ठा, ३० काष्ठा म्हणजे १ कला, ३० कला म्हणजे १ मुहूर्त व ३० मुहूर्तांएवढी १ दिवस- रात्र असते. सूर्योदयापासून तीन मुहूर्तांपर्यंत ‘प्रातःकाल’ असतो. त्यानंतर तीन मुहूर्तांएवढा ‘संगव’, नंतर तीन मुहूर्त एवढी ‘मध्यान्ह’, नंतर तीन मुहूर्तपर्यंत ‘अपरान्ह’, व तीन मुहर्त ‘सायंकाळ’ असे मोजतात. एवढाच काळ (१५ मुहूर्त) रात्र असते.
अशा १५ दिवस-रात्रीचा एक पंधरवडा, दोन पंधरवड्यांचा १ महिना, दोन महिन्यांचा एक ऋतू, तीन ऋतूंचे एक अयन होते. दोन अयने मिळून एक वर्ष होते. हे संवत्सर होय. अशी पाच प्रकारची संवत्सरे आहेत व ती सर्व मिळून एक युग असे धरले जाते. पौर्णिमा दोन असतात, त्यांची नावे ‘सिनीवाली’ व ‘कुहू’ अशी आहेत.
या अगोदर मी ज्या लोकालोक पर्वताचा उल्लेख केला होता त्याच्या दक्षिणेस पितृयान मार्ग असून कर्मकांडी लोकांसाठी तो आहे. ते लोक धर्माचरणी असून वर्णाश्रमावर आधारित धर्माचे संरक्षण करतात. त्या करिता ते पुन्हा पुन्हा एकाच गोत्रात जन्मास येत असतात.
उत्तरेकडचा जो मार्ग आहे त्याला ‘देवयान मार्ग असे नाव आहे. तिथे जितेंद्रिय व ब्रह्मचारी असे ऐंशीहजार मुनी आहेत. ते प्रलयकाळ येईतोबर तिथे स्थिर असतात. जेव्हा प्रलय होतो तेव्हा ध्रुवापर्यंत पसरलेले सर्व ब्रह्मांड लयास जात असते. सप्तर्षी व ध्रुव यांच्यामधला भाग तेजोमय असून श्रीविष्णूचे ते तिसरे दिव्यधाम आहे. निर्मळ चित्ताच्या मुनिजनांचे ते परमस्थान आहे. ते विष्णूचे परमपद आहे.
ध्यानावस्थेत योगीलोकांना याच परमपदाचा तेजस्वी सूर्यरूपात साक्षात्कार होत असतो. त्याच तेजात सूर्यासह ग्रहमाला, ध्रुव, नक्षत्रमंडळ वगैरे स्थिर असतात. असे हे सर्वांचे आदिकारण विष्णुपद आहे.
इथूनच पापनाशिनी गंगा उगम पावलेली आहे. प्रथम तिचा ओघ ध्रुव धारण करतो; नंतर ती चंद्रमंडल, मेरूपर्वत यांना स्नान घालीत चार प्रवाहांनी वाहत जाते. त्या प्रवाहांची नावे १ अलकनंदा, २ सीता, ३ चक्षु व ४ भद्रा अशी असून श्रीशंकराने मस्तकी धारण केला तो अलकनंदा नावाचा दक्षिणेकडे जाणारा प्रवाह आहे.
विष्णूचे शिशुमार नावाचे चक्र
अवकाशात विष्णूचे सुसरीच्या आकाराचे भव्य असे नक्षत्रांनी भरलेले शिशुमार नावाचे चक्र आहे. त्याच्या शेपटीच्या ठिकाणी ध्रुवाचा तारा आहे. तो सूर्य, चंद्र व इतर ग्रहांना गती देतो व स्वतः गिरक्या घेत असतो. त्यांच्यासोबत नक्षत्रेसुद्धा गरगर फिरत राहतात. त्या सर्वांचे केंद्र ध्रुव असून त्याचे आकर्षण असल्यामुळे ते विशिष्ट मर्यादेतच फिरतात.
या शिशुमार चक्राला नारायणाचा आधार आहे. ध्रुवाला चक्राचा, सूर्याला ध्रुवाचा व चराचर जगाला सूर्याचा आधार आहे. आता याचे आणखी स्पष्टीकरण ऐका.
सूर्य आठ महिन्यांपर्यंत किरणांद्वारा रसभरीत जलांश शोषून घेतो आणि पुढे चार महिने पाऊस पाडतो. तेव्हा अन्नाची उत्पत्ती होते व अन्नामुळे सर्व जगाचे पोषण होत असते. त्या जलांशाद्वारे चंद्राचे पोषण होते व चंद्र ते जल वायूच्या द्वारे धूम, अग्नि आणि ढगांपर्यंत पोहोचवतो. तेव्हा ते जल ढगात साठून योग्य वेळ आली की, वायूच्या दाबामुळे पावसाच्या रूपाने पृथ्वीवर कोसळते.
मुनिवर्य! सूर्याच्या किरणांतील जलांशाच्या स्पर्शाने पापनाश होऊन माणूस नरकात जात नाही म्हणून त्याला दिव्यस्नान म्हणतात. जेव्हा आकाश निरभ्र असते व सूर्य असतो तेव्हा आकाशगंगेतून जलवर्षाव होतो ते स्नान देखील दिव्यस्नान आहे. ढगांतून पृथ्वीवर पावसाच्या रूपाने जे पाणी पडते ते प्राण्यांच्या जीवनाचा आधार असते. ते कसे? ते सुद्धा ऐका!
त्या पावसामुळे वनस्पतींचे पोषण होऊन पुढे धान्ये, फळे वगैरे मिळतात मग त्यांचे हवन करून याज्ञिक वर्ग यज्ञाच्याद्वारे देवांना तृप्त करतात. अशा तऱ्हेने एका पावसामुळे किडे-मुंग्यांपासून तो अगदी देवांपर्यंत सर्व जीव जगत असतात, जलवर्षाव हा या दृष्टीने सर्वांना आधार आहे. ती वृष्टी सूर्यामुळे होत असते. आता तुमच्या ध्यानात आले असेल की, सृष्टीला आधार सूर्याचा आहे. त्याला ध्रुवाचा ध्रुवाला शिशुमार चक्राचा व शिशुमार चक्राला श्री नारायणाचा! अर्थात सर्व ब्रह्मांडाला एका नारायणाचा आधार आहे.
(श्री विष्णु पुराण अंश-२ क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७