अधिक मास विशेष लेखमाला (भाग २७)
श्री विष्णु पुराण – अंश-३ (भाग -३)
सामवेद १८ पुराणे व १४ विद्याशाखा
पराशरांचे कथन पुढे चालू राहिले. ते म्हणाले, “मैत्रेय! आता मी सामवेदाचा जैमिनीने केलेला विस्तार यथाक्रम सांगतो.
जैमिनीचा पुत्र सुमंतु व त्याचा पुत्र सुकर्मा होता. त्या उभयतांनी सामवेदाच्या एकेका शाखेचे अध्ययन केले. पुढे सुकम्यनि त्याच्या संहितेचे एक हजार विभाग केले. ते त्याच्या कौसल्य, हिरण्यनाभ व पौष्पिंजी या शिष्यांनी आत्मसात् केले. हिरण्यनाभाच्या पाचशे शिष्यांना ‘उदीच्य सामग’ असे नाव दिले गेले.
अन्य पाचशे विभाग ज्यांना मिळाले त्यांना ‘प्राच्य सामग’ असे म्हटले गेले. पौष्पिंजीचे शिष्य लोकाक्षि, नौधमि, कक्षीवान व लांगली हे होते. या चौघाजणांनी आपापल्या वाट्याच्या संहितांचे पुन्हा आणखी विभाग केले व ते प्रसृत केले.
हिरण्यनाभाचाच आणखी एक शिष्य महामुनी कृति हा होता. त्याने आपल्या शिष्यवर्गाला सामवेदाच्या चोवीस संहिता शिकविल्या. पुढे त्या शिष्यांनी त्यांचा आणखी विस्तार केला. आता अथर्ववेदाच्या संहिता कशा विस्तार पावल्या ते ऐका.
अगदी प्रथम महाबुद्धिमान सुमंतुने त्याचा शिष्य जो कबंध नावाचा होता त्याला शिकवला; मग त्याने त्याचे दोन विभाग केले व आपल्या देवादर्श आणि पथ्य या दोन शिष्यात वाटून दिले. त्यापैकी देवदर्श याचे शिष्य होते मेघ, ब्रह्मवलि, शौल्कायनी आणि पिप्पल, तसेच पथ्याचे शिष्य होते जाबाली, कुमुदादि व शौनक, या सातही जणांनी अथर्ववेदाच्या संहितांचे आणखी पोटविभाग पाडून ते शिष्यांना वाटून दिले.
शौनकाच्या बभ्रु व सैन्धव या दोन शिष्यांपैकी सैन्धवाच्या मुंजिकेश नावाच्या शिष्याने आपल्या संहितेचे दोन व नंतर तीन असे पाच भाग केले. ते असे १. नक्षत्रकल्प, २. वेदकल्प, ३. संहिताकल्प, ४. आंगिरसंकल्प व ५. शांतिकल्प. हे पाच भाग संपूर्ण अथर्ववेदात सर्वश्रेष्ठ आहेत.
पुढे व्यासांनी अनेकानेक आख्यानी, उपकथा, गाथा आणि कल्पशुद्धी यांनी भरलेली पुराणे रचली व ती सर्व त्यांच्या रोमहर्षण सुत या पट्टशिष्याला शिकविली. त्या सुताचे सहा शिष्य होते. ते सुमति, अग्निवर्चा, मित्रायु, शांतपायन, अकृतव्रण व सावर्णि यांनी रोमहर्षण या नावाच्या संहितेच्या आधारे प्रत्येकी एक अशा एकूण तीन संहितांची रचना केली.”
पराशर पुढे बोलू लागले – “मैत्रेयमुनी! मी जी आता विष्णुपुराण नावाची संहिता सांगतो आहे, ती त्या चार संहितांचे सार अर्थात तात्पर्य आहे. पुराणांचे जे जाणकार आहेत त्यांच्या मतानुसार एकंदर पुराणांची संख्या अठरा आहे व त्यातील ब्रह्मपुराण हे सर्वात प्राचीन आहे.
ती १८ पुराणे क्रमाने अशी आहेत – ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, भागवत,नारद, मार्कंडेय, अग्नि, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड यांच्याखेरीज आणखीही एकवीस उप- पुराणे आहेत. त्या सर्वांमध्ये सृष्टीची रचना, प्रलय, देवादिकांचे अंशावतार, मन्वंतरे व अनेकानेक राजांचे वंश यांचे वर्णन आहे.
चौदा विद्या कोणत्या त्या ऐका चार वेद, सहा वेदान्त शाख मीमांसा, न्याय, पुराण व धर्मशास्त्र अशा सर्व मिळून चौदा विद्या होतात, त्यात पुन्हा आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद व अर्थशाख ही चार जोडली म्हणजे अठरा प्रकारच्या विद्या होतात.
– ब्रह्मर्षी, देवर्षी व राजर्षी असे तीन श्रेणीचे ऋषी आहेत,
तुम्ही विचारले ते सर्व मी खुलासेवार सांगितले आहे. आता आणखी काय सांगू ?”
यमगीता
मैत्रेयांनी पुन्हा विचारले की, “महाराज! सप्तद्वीपात्मिका पृथ्वी, सात उर्ध्वलोक व सात पाताळे वगैरमध्ये अति स्थूल जीवापासून ते अति सूक्ष्म जीव भरलेले असून नखाएवढी जागासुद्धा रिकामी नाही. हे सर्व जीव कर्मबंधनात जखडलेले असून, आयुष्याच्या अंती ते यमाकडे जातात; मग त्याच्या न्यायनिवाड्यानुसार नरक भोगून पापांची निष्कृति झाली की देव, गंधर्व, मानव वगैरे योनींतून फिरत राहतात. तर आता मला असा एखादा उपाय सांगा की, जो केल्याने मनुष्याची यमाकडे जाण्यापासून सुटका होऊ शकेल.”
पराशर म्हणाले “मुनिवर्य! हाच प्रश्न पूर्वी नकुलाने भीष्म पितामहांना केला होता. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर ऐका.
ते म्हणाले की, पूर्वी एका कालिंग ब्राह्मणाने त्यांना भेटून भविष्यात होणाऱ्या घटना सांगितल्या व पुढे तंतोतंत तसेच घडत गेले. ते पाहून मीही हाच प्रश्न त्याला केला होता. तेव्हा त्याने जे उत्तर दिले ते असे की, यम त्याच्या हत्यारबंद दूतांना आज्ञा देतो की, विष्णूभक्तांच्या वाटेस कधी जाऊ नका.
तो म्हणाला की, विष्णूभक्तांना सोडून इतर सर्वांवर मला अधिकार दिला आहे. मी विधात्याच्या सेवकांपैकी असून श्रीहरिच्या ताब्यात आहे. जसे नाना दागिन्यांत सर्वत्र सोनेच भरून असते तसा सर्वत्र विष्णू भरला आहे. या सर्व सृष्टीची अंतिम गती तोच आहे.
त्यावर दूताने विचारले की, विष्णूच्या भक्ताला ओळखण्याच्या काही खुणा सांगाव्या.
तेव्हा यम सांगू लागला- विष्णूचा भक्त हा वर्णधर्मानुसार वागत असतो. त्याच्या मनात कधी आपपरभाव नसतो. तो परद्रव्य उचलत नसतो व हिंसा करीत नसतो.
सोने जरी बेवारस पडलेले दिसले तरी तो त्याला स्पर्शही करीत नसतो. अशा माणसाच्या वाटेला राग, द्वेष इत्यादि विकार कधी जात नाहीत. गर्व, अहंकार, हेवा यांचे तर त्याच्याकडे नावही नसते. त्याच्या अंत:करणात श्रीहरिविना अन्य काहीच नसते. अशा हरिभक्ताला सोडून तुम्ही निघून जा.
जो दुष्टबुद्धी असून अत्यंत लोभी, अतिकंजूष, जुलमी असेल, नीच पुरुषांचा दोस्त असेल, सदैव पापाचरण करीत असेल, अविवेकी असेल असा माणूस हरिभक्त असू शकत नाही.
हरिभक्ताची नजर जिथवर जाऊ शकेल तिथवर मीही जाऊ शकणार नाही. त्याची अंतिम गती वैकुंठ हीच आहे.
असे भीष्मांनी त्या कालिंग ब्राह्मणाकडून जसे ऐकले होते ते तसेच्या तसे नकुलाला कथन केले. तात्पर्य एवढेच की, विष्णूखेरीज या भवचक्रातून सोडविणारा अन्य कुणीही नाही. हरिच्या भक्ताला कोणतेच भय नसते. त्याचा न्यायनिवाडा यम करीत असतो.” असे सांगून पराशर क्षणभर थांबले.
श्री विष्णु पुराण अंश-३ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
vishnu puran samved purane vidya shakha vijay golesar