अधिक मास विशेष (भाग ३६)
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -३ )
सगर राजाची जन्मकथा
या त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र-त्याचा रोहिताश्व त्याचा हरित-त्याचा विजय व वसुदेव – विजयचा रुरुक-त्याचा वृक-त्याचा बाहू असा वंश वाढला. पुढे हैहय व तालजंघ वगैरे क्षत्रियांनी त्याचा पराभव केल्याने तो गर्भवती पत्नीला घेऊन वनात जाऊन राहिला.
मग त्या गरोदर राजपत्नीच्या सवतीने तिचा गर्भ नष्ट व्हावा या हेतूने तिला विष खाऊ घातले. त्या विषाचा परिणाम असा झाला की, तो गर्भ सात वर्षांपर्यंत पोटातच राहिला. त्या दरम्यान बाहू वृद्धपणामुळे और्व मुनींच्या आश्रमानजिक असतानाच मरण पावला; मग राणीने त्याच्या चितेवरच सती जाण्याचा विचार केला. तेव्हा काली और मुनीनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
त्यावेळी ते म्हणाले- ” हे पतिव्रते!असा हट्ट करू नको. तुझ्या पोटात जो गर्भ तो संपूर्ण पृथ्वीचा स्वामी होणार असून महापराक्रमी, अनेक यज्ञ करणारा व शत्रूचा पराभव करणारा असा चक्रपती राजा आहे. तेव्हा हा अविचार तू सोडून दे.” तेव्हा ती सती न जाता औरांच्या आश्रमात जाऊन राहिली. तिथे तिचे कन्येप्रमाणे पालन केले.
मग यथाकाळी तिने त्या गर म्हणजे विषासह एका पुत्राला जन्म दिला औचीनी सर्व जातकर्म संस्कार करून त्याचे नाव ‘सगर’ असे ठेवले. तसेच त्याचे मुंजीपासून पुढे संस्कार करून त्याला वेद, शास्त्रे, शस्त्रास्त्र विद्या यांचे संपूर्ण ज्ञान दिले.
त्याची पूर्ण वाढ झाल्यावर एकदा आईला म्हणाला की, “आई। आपण तपोवनात का राहतो? आणि माझे वडील कुठे आहेत? तेव्हा आईने त्याला संपूर्ण इतिहास सांगितला. तेव्हा त्याला आपले वडिलोपार्जित राज्य बळकावणाऱ्या शत्रूचा मोठा राग आला; मग त्याने मोठी तयारी केली आणि हल्ला करून हैहय व तालजंघ यांच्या दोन्ही कुळांचा नायनाट केला.
तेव्हा इतर लहानसहान लढवय्या जमाती उदा. शक, यवन, कांबोज आदिकरून सर्व जण सगर राजाचे कुलगुरू वसिष्ठांना शरण गेले. तेव्हा त्यांची भीती जाणून त्यांनी सगराला सांगितले की, “बाळा! अरे या दुर्बळांना मारून कोणता लाभ होणार? म्हणूनच मी यांना समाजाच्या बाहेर स्थान देत आहे.”
ती आज्ञा सगराने मान्य केली आणि त्या सर्वांच्या पोशाखांत व राहणीमानात बदल केले. यवनांच्या डोईचे केस कापले, शकांना दाढीविरहित केले. पारदांना केस वाढविण्याची अनुमती दिली व इतर लढाऊ जमातींना वेदाध्ययन व यज्ञकर्मे करण्यास मनाई केली. त्यामुळे त्या सर्वांना म्लेच्छ असे नाव पडले.
नंतर सगर राज्यासनावर बसून सात बेटांनी युक्त अशा पृथ्वीवर राज्य करू लागला.
सगरापासून श्रीरामचंद्रापर्यंत
राजा सगराला दोन बायका होत्या. एक काश्यपांची कन्या सुमती व दूसरी विदर्भराजाची कन्या केशिनी, त्यांनी आराधना केल्यामुळे औ मुनी प्रसन्न झाले व म्हणाले की, तुम्हां दोघींपैकी एकीला वंश चालविणारा एक पुत्र मिळेल व दुसरीला साठ हजार पुत्र होतील, तेव्हा जशी इच्छा असेल तसे मागा; मग केशिनीने एक पुत्र आणि सुमतीने साठ हजार पुत्र मागितले,
पुढे केशिनीला ‘असमंजस’ नावाच एक पुत्र झाला आणि सुमतीला साठ हजार पुत्र झाले, असमंजस याला पुढे अंशुमान नावाचा एक पुत्र झाला परंतु असंमजस हा लहानपणापासून दुराचारी होता तथापि पित्याला अशी आशा होती की, मोठा जाणता झाला की तो सुधारेल, पण त्यांचा स्वभाव कायम तसाच राहिल्यामुळे पित्याने त्याचा त्याग केला. त्याचे साठ हजार भाऊसुद्धा तसेच निघाले,
मग त्या सर्वजणांनी मोठे थैमान मांडले. यज्ञयाग बंद पाडले. तेव्हा देवांनी मिळून कपिलांची प्रार्थना केली असता ते म्हणाले की, “थोडा काळ धीर धरा. लवकरच या सर्वांचा नाश होणार आहे.”
याच सुमारास सगराने अश्वमेध यज्ञ आरंभिला. त्यावेळी त्याचे पुत्र घोड्याचे रक्षण करीत असताना कुणीतरी तो घोडा चोरून नेला. त्यावेळी घोड्याच्या पावलांच्या ठशांच्या अनुरोधाने त्या सगर पुत्रांपैकी प्रत्येकाने एकेक योजनाप्रमाणे पृथ्वी खणून काढली. जेव्हा ते पाताळात गेले तेव्हा त्यांनी तिथे त्यांचा घोडा चरत असलेला पाहिला.
जवळच तेजस्वी कपिलमुनी डोळे मिटून शांतपणे बसलेले त्यांना दिसले. तेव्हा त्या सर्वांना घोडा त्यांनीच चोरला असावा असे वाटून ते शस्त्रे उपसून मोठा कोलाहल करती मुनीना मारण्यासाठी पावले असता मुनीनी रागाने पाहताक्षणी ते सर्वच्या सर्व अजून खाक झाले.
हे वृत्त समजले तेव्हा राजा सगराने आपला नातू अंशुमान याला पाठविला. तो पाताळात गेला व भक्तिपूर्वक कपिलमुनींची स्तुती करू लागला. त्यावर संतुष्ट होऊन मुनी बोलले “बाळा! तू हा घोडा नेऊन आजोबांना दे आणि तुला जे हवे असेल ते मागून घे. पुढे तुझा नातू गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन येणार आहे.”
त्यावर अंशुमान म्हणाला की, “मला असा उपाय सांगा की, जेणेकरून हे ब्रह्मशापाने मेलेले माझे पितर उदरून स्वर्गात जातील.
कश्यप म्हणाले “भी अगोदरच तुला सांगितले आहे की, तुझा नातू स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर घेऊन येईल. त्या जलाचा या हाडांना स्पर्श होताच हे सगळे स्वर्गात जातील. विष्णूच्या पायांच्या नखांतून उत्पन्न झालेल्या गंगेच्या पाण्याचे महत्त्व फार मोठे आहे. ते जशी इच्छा असेल त्याप्रमाणे सर्वांना फळ तर देतेच परंतु मृताच्या अस्थि, चामडे, स्नायू अगर केसांना जरी त्या जलाचा स्पर्श झाला तरी त्याचा उद्धार होतो.
तेव्हा त्यांना प्रणाम करून अंशुमान घोडा घेऊन सगराकडे आला; मग सगराने यज्ञ पूर्ण केला. त्या अंशुमानाचा पुत्र दिलीप त्याचा भगीरथ झाला. पुढे भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणली म्हणून तिचे एक नाव भागीरथी असेही आहे.
भगीरथाचा पुत्र सहोत्र त्याचा श्रुति त्याचा नाभाग त्याचा अंबरीष त्याचा सिंधुद्वीप त्याचा अयुतायु त्याचा ऋतुपर्ण झाला. तो जुगार खेळण्यात मोठा बाकबगार असून नळराजाचा मदतगार होता.
ऋतुपर्णाचा पुत्र सर्वकाम त्याचा सुदास त्याचा मित्रसह होता. हा एकदा शिकरीसाठी अरण्यात गेला असताना त्याने दोन बाघ पाहिले. त्यातील एकाला त्याने बाणाने मारले. खरे तर दोघे मायावी राक्षस बंधू होते. मरतेवेळी त्याचे राक्षसरूप प्रकट झाले. त्याचा भाऊ मात्र सूड घेण्याचे ठरवून पळून गेला.
नंतर काही काळाने राजाने एक यज्ञ आरंभिला, त्यावेळी मुख्य पुरोहित वसिष्ठ स्नानाला गेले असताना त्या राक्षसाने आचाऱ्याचे रूप घेतले व भोजनात नरमांस शिजविले. दुपारी भोजनाचे वेळी ताटात मांस पाहिले तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टीने शोध करताच त्यांना कळले की, ते नरमांस आहे. तेव्हा रागावून त्यांनी राजालाच दोषी समजून शाप दिला की, तू सुद्धा नरमांस खाणारा राक्षस होशील. त्यावर राजाने आपण यांत निर्दोषी आहोत असे सांगितले.
तेव्हा वसिष्ठांनी पुन्हा ध्यान लावताच त्यांना खरा प्रकार कळून चुकला. त्यांनी राजाला उ:शाप दिला की, तो फक्त बारा वर्षे राक्षस होईल. तरीही विनाकारण मुनींनी अविचाराने शाप दिला म्हणून राजाने त्यांना उलट शाप द्यावा म्हणून ओंजळीत पाणी घेतले पण त्याची राणी मदयंती हिने गुरूला शाप देणे अनुचित आहे अशी विनंती करून राजाचा राग शांत केला पण त्या मंत्रविलेल्या पाण्याचे काय करावे? असा राजाला प्रश्न पडला व त्याने ते पाणी स्वतःच्या पायांवर ओतले.
परिणामी त्याचे पायांवर काळे चट्टे उमटले आणि त्याचे नाव ‘कल्माषपाद’ असे पडले; मग तो राक्षस बनला आणि रानवनात संचार करीत माणसांना मारून खाऊ लागला. एकदा त्याने एक नवपरिणित जोडपे प्रेमक्रीडा करताना पाहिले. भूक लागल्यामुळे त्याने त्या ब्राह्मणाला धरले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याची अनेक प्रकारे विनवणी केली पण तिला न जुमानता त्याने ब्राह्मणाला तिथेच मारून खाल्ला.
तेव्हा दुःखाने तळमळणाऱ्या तिने राजाला शाप दिला की, प्रेमक्रीडेत मग्न असलेल्या तिच्या पतीला खाल्ला म्हणून तो जेव्हा कामार्त होऊन कोणत्याही स्त्रीला नुसता स्पर्श करील तर त्या क्षणीच तो मरण पावेल. एवढे बोलून तिने अग्निप्रवेश केला.
शापाची मुदत संपल्यावर राजा पुन्हा मूळरूपांत परत आला; मग एकदा तो मदयंतीपाशी गेला असताना तिने त्याला ब्राह्मणीच्या आठवण करून दिली. त्यामुळे राजा मनास आवर घालून राहिला तथापि पोटी संतान नसल्यामुळे व वारस नाही म्हणून उभयतांनी कुलगुरू वसिष्ठांना पुत्रासाठी गळ घातली. तेव्हा मग वसिष्ठांनी मदयंतीशी संबंध ठेवला व त्यापासून ती गर्भवती झाली.
तो गर्भ पूर्ण होऊन सात वर्षांनी जन्मास आला. त्याचे नाव अश्मक ठेवले. त्याचा पुत्र मूलक उर्फ नारीकवच नावाचा होता. त्याचे कारण असे की, जेव्हा परशुराम क्षत्रियसंहार करीत होते तेव्हा स्त्रियांनी नग्न होऊन व घोळका करून या बालकाला लपवून ठेविले होते.
मूलकाचा पुत्र दशरथ त्याचा इलविल त्याचा विश्वसह- त्याचा खट्टांग असा वंश वाढत गेला. त्याने देव व असुर यांच्या लढाईत देवांच्या बाजूने सामील होऊन दैत्यांचा नायनाट केला होता. तेव्हा देवांनी वर मागण्यास सांगितले असता त्याने आपली आयुष्याची मर्यादा जाणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्याला देव म्हणाले की, त्याचे आयुष्य फक्त एक मुहूर्त (साडेतीन घटका) एवढेच बाकी राहिले आहे.
मग तो तातडीने पृथ्वीवर आला आणि त्याने समाधीद्वारा देहत्याग केला.
याच वंशात घडले रामायण
खट्टांगाचा पुत्र दीर्घबाहू व त्याचा रघु- रघुचा अज – त्याचा दशरथ असा वंश चालला. विश्वकल्याणाच्या उद्देशाने महाविष्णूने त्याच्या पत्नींच्या पोटी अंशरूपाने चार पुत्रांचा अवतार घेतला. ते म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे होत.
श्रीरामाने लहानपणीच विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना मार्गात ताटिका राक्षसिणीला मारली. पुढे यज्ञशाळेत पोचल्यावर मारीचाला बाणाच्या फटकाऱ्याने समुद्रापार भिरकावून दिला व सुबाहू आदिकरून राक्षसांचा वध केला. पुढे त्याने शिळा बनलेल्या अहिल्येला मूळचे रूप दर्शन देऊन प्राप्त करून दिले. जनकाच्या राजदरबारात सहजपणे शिवधनुष्य तोडून सीतेशी विवाह केला; मग क्षत्रियवंश संहारक व हैहयकुळ जाळणारा जणू अग्नीच अशा परशुरामाचा गर्व नष्ट करुन त्याने सामर्थ्य खेचून घेतले.
पुढे पित्याच्या वचनाच्या रक्षणासाठी, साम्राज्य सोडून भाऊ लक्ष्मण व पत्नी सीता यांना घेऊन वनात निघून गेला. तिथे त्याने विराध, खर, दूषण आदिकरून राक्षसांना मारले. कबंध आणि वालीचा वध केला; मग पुढे समुद्रावर पूल बांधला. लंकेत जाऊन संपूर्ण राक्षसकुळाचा संहार केला.
अतिपवित्र अशा जानकीला रावणाने पळवून नेली होती. तिला अग्निद्वारा शुद्ध करून अयोध्येत घेऊन गेला. तिथे त्याचा राज्याभिषेकाचा समारंभ ‘न भूतो न भविष्यति’ अशा थाटामाटात साजरा झाला. त्यावेळी त्रैलोक्यातील सर्व देवगण, संपूर्ण ऋषिमंडळ, वेदोपासक, गंधर्व, यक्ष, नाग वगैरे आले होते.
सर्व नद्या, योगी, तपस्वी उपस्थित होते. नानाविध मंगलवाद्यांच्या गजरात व अनेक राजांच्या उपस्थितीत राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला नंतर प्रभु रामचंद्राने अकरा हजार वर्षे राज्यकारभार केला.
भरताने गंधर्वलोकात जाऊन, युद्ध करून तीन कोटी गंधर्वांना मारून विजय मिळवला. शत्रुघ्नाने देखील मधुदैत्याचा महापराक्रमी व बलवान पुत्र जो लवणासुर त्याला नष्ट करून मथुरा नावाचे नगर बसविले. अशा प्रकारे पृथ्वीवर सर्वत्र सुव्यवस्था निर्माण करून नंतर त्या चारी भावांनी जलसमाधी द्वारा स्वर्गलोकात गमन केले जाते वेळी ज्या नागरिकांना सोबत जाण्याची इच्छा होती त्यांनाही स्वर्गात घेऊन गेले. पुढे वंश कसा वाढत गेला ते पाहा.
रामाला लव आणि कुश हे दोन पुत्र झाले. लक्ष्मणाला अंगद व केतू, भरताला तक्ष व पुष्कल, शत्रुघ्नाला सुबाहू व शूरसेन असे प्रत्येकी दोन पुत्र होते. पैकी रामपुत्र कुश याचा पुत्र अतिथि नावाचा होता.
अतिथिचा निषध- त्याचा अनल- त्याचा नभ- त्याचा पुंडरीक- त्याचा क्षेमधन्वा त्याचा देवानीक- त्याचा अहीनक- त्याचा रुरु- त्याचा पारियात्रक- त्याचा देवल त्याचा वच्चल- त्याचा उत्क- त्याचा वज्रनाभ त्याचा शंखण त्याचा युषित्वाश्च आणि त्याचा विश्वसह.
विश्वसहाला हिरण्यनाभ हा पुत्र झाला. त्याने जैमिनीचे शिष्य महायोगी याज्ञवल्क्य यांच्यापासून योगविद्या शिकून घेतली. या हिरण्यनाभाचा पुत्र पुष्य- त्याचा ध्रुवसंधि- त्याचा सुदर्शन त्याचा अग्निवर्ण- त्याचा शीघ्रग त्याचा मरू होय. हा मरू योगसाधना करीत अद्यापिही कलाप नावाच्या गावी आहे.
या मरूचा पुत्र प्रसुश्रुत- त्याचा सुसंधि- त्याचा अमर्ष- त्याचा सहस्वान्- त्याचा विश्वभव त्याचा बृहद्वल होता. तो महाभारत काळच्या युद्धात अर्जुनाचा पुत्र अभिमन्यु याजकडून मारला गेला, असा हा इश्वाकू कुळातील मुख्य मुख्य राजांचा इतिहास आहे. यांच्या चरित्रकथा ऐकण्याने माणूस पापांतून मुक्त होतो.”
श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -३ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Vishnu Puran Sagar Rajachi Janmakatha by Vijay Golesar