अधिक मास विशेष लेखमाला
श्रीविष्णु पुराण (भाग ५)
राजा वेन आणि पृथु यांची कथा
श्री विष्णुपुराणच्या कालच्या भागात आपण ध्रुवाची प्रसिद्ध कथा ऐकली. आजच्या कथा भागात ध्रुवाचा वंशविस्तार पाहणार आहोत.
ध्रुवाचे दोन पुत्र झाले, त्यांची नावे शिष्टि व भव्य अशी होती. भव्याचा पुत्र तो शंभू होय. शिष्टिचे पाच पुत्र होते. १. रिपु, २. रिपुंजय, ३. विप्र, ४. वृकल आणि ५. वृकतेजा. त्यांपैकी रिपुचा चाक्षुष त्याचा मनू त्याचे कुरूसह दहा पुत्र होते. कुरुचे अंग आणि इतर पाच पुत्र. त्या अंगाचा पुत्र वेन होता. पुढे ऋषींनी वेन राजाच्या उजव्या हाताचे मंथन केले तेव्हा त्यापासून पृथु जन्मला त्याचे कारण ऐका.
अंगाची पत्नी सुनीता ही मृत्युदेवाची कन्या होती. तिच्या पोटी जन्मलेला वेन आनुवंशिकतेनुसार दुष्ट व क्रूर स्वभावाचा निपजला. जेव्हा ऋषीमुनींनी त्याला राजपदावर बसवून अभिषेक केला, तेव्हा त्याने अशी आज्ञा दिली की, राजाशिवाय कुणीही पूज्य असू शकत नाही. तेव्हा सर्वांनी धर्मकृत्ये व देवकार्ये बंद करून फक्त राजाचीच आराधना करावी.
ऋषींनी असा अविचार करण्यापासून वेन राजाला परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला परंतु ते सर्व प्रयत्न पालथ्या घडयावर ओतलेल्या पाण्याप्रमाणे वाया गेले. वेन कुणालाच जुमानीनासा झाला. जेव्हा राजाचे अत्याचार कळसाला पोहोचले तेव्हा सर्व ऋषी व मुनी यांनी एक होऊन मंत्रविलेल्या दर्भाच्या साहाय्याने राजाला मारून टाकला.
तेव्हा सर्वत्र मोठे अराजक निर्माण झाले. लूटमारीला ऊत आला.
बळी तो कान पिळी अशी अवस्था झाली मग सर्व ऋषींनी एकत्र जमून विचार विनिमय केला आणि त्या वेन राजाची मांडी घुसळली. त्यावेळी एक पुरुष त्यातून उत्पन्न झाला. त्याचे नाव ‘निषाद’ असे रूढ झाले.
पुढे त्याचे वंशज विध्याचलावर राहून पापे करू लागले. वेन राजाच्या पापांचा अशा तऱ्हेने संपूर्ण निचरा झाला. नंतर ब्राह्मणांनी वेन राजाच्या उजव्या हाताचे मंथन केले. तेव्हा त्यामधून अग्नीप्रमाणे तेजस्वी असा ‘पृथु’ नावाचा पुरुष उत्पन्न झाला. त्याच वेळी आकाशातून शिवधनुष्य, दिव्य बाण व कवच खाली पडले. वेनसुद्धा पुत्र जन्मल्यामुळे स्वर्गलोकी गेला.
पृथुचा राज्याभिषेक करण्यासाठी सर्व नद्या व सागर पवित्र जल व रत्ने घेऊन उपस्थित झाले. ब्रह्मदेवाने आंगिरस ऋषी व देवांसहित राजा पृथु याला अभिषेक केला; नंतर त्याने ‘पैतामह यज्ञ’ केला तेव्हा त्यातून सुत व मागध असे दोन पुत्र आणि ‘पृथ्वी’ नावाची कन्या जन्मले. हे पृथुचे चरित्र गायल्याने पापकर्मे व दुःस्वप्ने यांचा नाश होतो.”
पृथुवा वंशविस्तार
“पृथुला अंतर्धान आणि बादी असे दोन पुत्र होते. अंतर्थानाला प्राचीनवर्हि, शुक्र, गय, कृष्ण, वृज आणि अजिन असे सहा पुत्र झाले. त्यांपैकी जो प्राचीनवर्हि होता त्याने यज्ञ करून प्रजा बाढविली. पुढे त्याने समुद्रकन्या सुवर्णा हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला दहा पुत्र झाले. ते सर्व जण ‘प्रचेता’ या एकाच नावाने प्रसिद्ध आहेत. ते सगळे धनुर्विद्येत निष्णात असून त्यांनी दहा हजार वर्षे समुद्रात राहून तपश्चर्या केली.
प्रचेता जेव्हा तपश्चर्येत मग्न होते तेव्हा शासनकर्ता असा कुणी नसल्यामुळे पृथ्वीवर मानवी वस्तीचा नाश होत गेला. त्याचा परिणाम असा झाला की, सर्वत्र फार घोर अशी अरण्ये माजली. ती एवढी घनदाट होती की, मोकळी हवासुद्धा दुर्मीळ झाली. सूर्यप्रकाश तर पृथ्वीपर्यंत येतच नसे. त्यामुळे प्रजा हतबल झाली व हळहळू नष्ट होत चालली होती.
तपश्चर्या संपवून परतलेल्या प्रचेतागणांनी जेव्हा ती अवस्था पाहिली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी मुखावाटे वायू सोडून ती वृक्षराजी उपटली आणि सुकविली. लगेच अग्नी उत्पन्न करून सर्व वृक्ष भस्मसात केले. पृथ्वीवी मोजक्याच वनस्पती शिल्लक राहिल्या.
तेव्हा वनस्पतींचा पोशिंदा राजा सोम येऊन त्या प्रचेतसांना भेटला व राग आवरण्याची विनंती केली. त्याने असेही सांगितले की, “मी वृक्षांचे तुमच्याशी सख्य करून देईन. तसेच वृक्षांची पुत्री मारिषा हिचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. हिचे लालनपालन मी केलेले आहे. यामुळे तुमच्या व माझ्या तेजाचा संयोग होऊन पुढे दक्ष नावाचा प्रजापती जन्माला येईल आणि मानव वंशाचा विस्तार होईल.
मारिषेची जन्मकहाणी
पराशर मुनी पुढे मारिषेची जन्मकहाणी सांगू लागले. ते म्हणाले – “पूर्वी कोणे एके काळी कंडू या नावाचे एक ऋषी होते. त्यांनी गोमती नदीच्या रमणीय परिसरात घोर असे तप केले. तेव्हा इंद्र घाबरला त्याने कंडूंचा तपोभंग करण्यासाठी प्रम्लोचा नावाची अप्सरा पाठविली.
तिने त्यांना मोहात गुंतविले व त्यांच्यासह सुख विलास भोगीत राहिली. असा शंभर वर्षांचा काळ गेला तेव्हा तिने जाण्यासाठी आज्ञा मागताच मुनींनी तिला आग्रह करून थांबवून घेतले व पुन्हा ती दोघेही सुखविलासात रममाण झाली. असे वारंवार होत गेले. कंडूमुनींना काळवेळाचे काही भान उरले नाही. एके दिवशी सूर्य मावळतीच्या दिशेने चालला आहे असे पाहून ते बाहेर जाऊ लागले. तेव्हा त्या सुंदरीने “कुठे चाललात?” असे विचारताच ते म्हणाले संध्याकाळ झाल्यामुळे नदीवरून स्नानसंध्या करून येतो, नाहीतर धर्मलोपाचा दोष पदरी येईल.
असे ऐकून ती खुदकन हसून म्हणाली की, महाराजा आजच नवीन संध्याकाळ झाली काय? तुमची संध्याकाळ बन्याच वर्षांनी उगवलेली दिसते.
त्यावर मुनी बोलले की, हे काय सांगतेस? आजच सकाळी तर तू इथे आलीस मग अशी थट्टा का करते आहेस. ती म्हणाली की, मी सकाळच्या वेळी आले हे खरे आहे पण त्याला शेकडो वर्षांचा काळ लोटला आहे. मुनींनी पुन्हा खोदून विचारले तेव्हा तिने सांगितले की अचूक सांगावयाचे झाले तर ९०७ वर्षे ६ महिने व ३ दिवस झाले आहेत. तेव्हा ते ऋषी भानावर आले.
असे तिचे वचन ऐकून त्यान ऋषींनी स्वतःची निंदा केली व धिकार केला. आपले तप नष्ट झाल्याचे त्यांना फार दुःख झाले. श्रीच्या मोहात सापडून वासनांच्या आहारी गेल्याचे त्यांना उमगले; मग ते तिला म्हणाले “अगं! तुला तरी संपूर्ण दोष कसा देता येईल? खरोखर मीच दोषी आहे. तरी तू या क्षणीच इथून चालती हो! तू इंद्राच्या सांगण्यावरून माझ्या तपसामर्थ्याचा नाश केला आहेस.”
तेव्हा ती ऋषींच्या रागाला भिऊन बाहेर पडली व वृक्षांवरून उड्डाण करीत निघून गेली. तेव्हा ती गरोदर होती व तिचा गर्भ गळून पडला; मगत्या गर्भाला वृक्षांनी आधार दिला, वायूने एकत्रित केला व मी स्वतः माझ्या किरणांनी तिचे पोषण केले. अशी ती मारिषा नावाची कन्या वृक्षदेव तुम्हाला अर्पण करतील, कंडू मुनी तिचा पिता व प्रम्लोचा ही माता असून माझी व वायूदेवाची ती धर्मकन्या आहे म्हणून तिचा स्वीकार करा.
कश्यप पुत्र हिरण्यकशिपू
पराशरांनी पुढे सांगितले , “अनेक युगे आणि कल्प पुन्हा पुन्हा येतात व जातात तेच तेच प्राणी पुन्हा पुन्हा जन्मत व मरत असतात. दिव्य दृशी असणा महात्म्यांना त्यात मुळीच नवल वाटत नसते.’ दक्षाने जेव्हा प्रजा उत्पन्न करावयाचे ठरविले तेव्हा त्या संकल्पाने दैवी, मानवी, राक्षसी, पाशवी अशी प्रजा निर्माण केली प्रजेची वाढ काही होईना, तेव्हा त्याने मनाशी विचार करून नर-मादी संयोगातून प्रजा निर्माण करावी असे ठरविले व स्वतः वीरणा प्रजापतीची कन्या असिक्ति हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून ५००० पुत्र जन्मले.
पुढे दक्षाच्या कन्यांपासून प्रजा वाढत गेली. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय व अस्त, ऋतू वगैरे गोष्टी फिरफिरून येत जात असतात त्याचप्रमाणे सर्व जीव व देव प्रत्येक युगांमध्ये पुन्हा पुन्हा जन्मत व मरत असतात. आता कश्यप मुनी व दिति यांच्या वंशाचे वर्णन ऐका. त्यांना हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष असे दोन मुलगे आणि सिंहिका नावाची एक मुलगी झाली. तिचे लग्न विप्रचित्ती याच्याशी झाले. हिरण्यकशिपूला चार पुत्र झाले. त्यांची नावे अनुल्हाद, ल्हाद, प्रल्हाद व संल्हाद अशी होती. त्यांच्यापैकी प्रल्हाद हा हरिभक्त निपजला, त्यामुळे पित्याला तो आवडत नसे. त्याने प्रल्हादाला मारून टाकावा याकरिता अनेक अघोरी उपाय केले परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला तर नाहीच, उलट प्रल्हादाची हरिभक्ती अधिकाधिक दृढ होत गेली. श्री विष्णु पुराणच्या पुढील भागात आपण प्रल्हादाच्या अविचल भक्तीचा महिमा जाणून घेणार आहोत.
( श्री विष्णु पुराण क्रमश:)
सादरकर्ते:- विजय गोळेसर