अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग ८)
श्रीविष्णुपुराण कथासार
प्रियव्रताचा वंश
आजपासून श्री विष्णु पुराण अंश २ भाग -१ सुरु होतो आहे. या भागात ध्रुवाचे चुलते प्रियव्रत आणि त्यांचे वंशज तसेच चार ते पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या ॠषि मुनींना ज्ञात असलेला पृथ्वीचा विस्तार आणि तत्कालीन भरत खंडाचे महात्म्य यांची माहिती ऐकायला मिळते.
मैत्रेयांनी विचारले की, “महाराज आपण मला स्वायंभुव मनूच्या प्रियव्रत व उत्तानपाद या दोन पुत्रांपैकी उत्तानपादाचा पुत्र जो ध्रुव त्याची सर्व कथा आणि वंशविस्तार सांगितला परंतु प्रियव्रताचे पुढे काय झाले ते ऐकण्याची मला उत्सुकता आहे. तरी कृपा करून ते ऐकवा.”
असा होता प्रियव्रताचा वंश
पराशर म्हणाले, “ठीक आहे! कर्दमांची मुलगी ही प्रियव्रताची पत्नी होती. तिला सम्राट व कुक्षि अशा दोन मुली व दहा मुलगे झाले. ते सर्वजण मोठे बुद्धिमान, पराक्रमी तसेच सद्गुणी होते. त्यांची नावे अशी होती – आग्नीध्र, अग्निबाहु, वपुष्मान, द्युतिमान, मेधातिथि, मेधा, भव्य, सवन, पुत्र व यथार्थ ऊर्फ ज्योतिष्मान्!
त्यांच्यापैकी मेधा, अग्निबाहु व पुत्र या तिघांनी जातिस्मर असल्यामुळे व पूर्वजन्मीचे योगी असल्यामुळे राज्याचा स्वीकार केला नाही. बाकीच्या सात जणांना पित्याने पृथ्वीवरील सात द्वीपे वाटून दिली. ती वाटणी अशी आग्नीध्र-जंबुद्वीप, मेधा-प्लक्ष, वपुष्मान-शाल्मल, द्युतिमान क्रौंच, भव्य-शाक, सवन-पुष्कर आणि ज्योतिष्मान-कुश.
त्यांच्यापैकी जंबुद्रीपाचा राजा आग्नीध्र याला नऊ मुलगे झाले. त्यांना पित्याने राज्याचे नऊ विभाग करून वाटून दिले. पुढे आग्नीध्र तपश्चर्येसाठी निघून गेला. त्यांत नाभि नावाचा जो पुत्र होता त्याच्या वाट्याला हिमवर्ष (सध्याचे भारतवर्ष) हा भाग आला.
इतर जे आठ विभाग आहेत त्यांच्यावर गतिमान काळाचा कोणताच परिणाम होत नाही. भारतवर्षाचा शासक जो नाभि त्याची पत्नी मेरुदेवी हिला ऋषभ या नावाचा एक तेजस्वी पुत्र झाला. या ऋषभदेवाचे शंभर पुत्र होते. त्यातला सर्वांत वडील पुत्र ‘भरत’ नावाचा होता. तो जाणता झाला तेव्हा त्याच्या हाती राज्य देऊन ऋषभदेव पुलह मुनाच्या आश्रमात गेला.
भरताला सुमति नावाचा पुत्र होता. जेव्हा भरताचे उतारवय झाले तेव्हा सुमतिवर राज्याची जबाबदारी सोपवून तो बनात निघून गेला व योगाभ्यास करू लागला. पुढे त्याचा वंश पुढीलप्रमाणे वाढत गेला.
सुमतिचा पुत्र इंद्रधुम्न – त्याचा परमेष्ठी – त्याचा प्रतिहार – त्याचा प्रतिहर्ता – त्याचा भव- त्याचा उद्गीथ- त्याचा प्रस्ताव – त्याचा पृथु- त्याचा नक्त – त्याचा गय – त्याचा नर- त्याचा विराट- त्याचा महावीर्य- त्याचा धीमान- त्याचा महान्त -त्याचा मनस्यु – त्याचा त्वष्टा- त्याचा विरज- त्याचा रज -त्याचा शतजित असे पुत्र होत गेले.
शतजिताला शंभर पुत्र झाले त्यांच्यात विष्वज्योति हा सर्वात वडील पुत्र होता. अशा या सर्व वंशजांनी भारतवर्षाचा उपभोग ७१ युगांपर्यंत घेतला. अशी वाराह नावाच्या कल्पातील स्वायंभुव मनूच्या वंशविस्ताराची हकीकत आहे.
पृथ्वीचा विस्तार
मैत्रेय म्हणाले – “स्वायंभुव मनूच्या वंशाचे वर्णन मी ऐकले. आता मला पृथ्वीचा विस्तार सांगावा.” त्यावर पराशर सांगू लागले-अहो मैत्रेय! पृथ्वीचा विस्तार जर सविस्तर सांगावा तर हजारो वर्षे संपली तरी तो संपूर्ण सांगून संपणार नाही म्हणून मी तुम्हाला तो थोडक्यात सांगतो.
पृथ्वीवर सात द्वीपे आहेत. त्यांची नावे – जंबू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाक व पुष्कर अशी आहेत. यांच्या सभोवती क्रमाने खाऱ्या पाण्याचा, ऊसाच्या रसाचा, दारूचा, तुपाचा, दह्याचा, दुधाचा व गोड्या पाण्याचा अशा सात समुद्रांचा वेढा आहे.
या सर्वांच्या मधोमध जंबूद्वीप आहे. त्याच्या मध्यभागी सोन्याचा मेरूपर्वत असून तो ८४००० योजने एवढा उंच आहे. १६००० योजने तो पृथ्वीत घुसला आहे. तळाशी त्याचे क्षेत्रफळ १६००० योजने आहे, तर वर शिखरापाशी ३२००० योजने आहे. हा पर्वत जणू काही पृथ्वीरूप कमळाचा परागकोश आहे असे भासते.
याच्या (जंबूद्वीपाच्या) दक्षिणेस व उत्तरेस क्रमाने चार-चार वर्षपर्वत आहेत. त्यांचा विस्तार आणि उंची हजारो योजने एवढी आहे. मेरूपर्वताच्या दक्षिण दिशेला क्रमाने भारतवर्ष, किंपुरुषवर्ष व हरिवर्ष असे विभाग आहेत. उत्तर दिशेला रम्यक, हिरण्मय आणि उत्तरकुरू असे तीन विभाग आहेत. त्यांचे आकार चंद्रकोरीसारखे आहेत. प्रत्येकाचे क्षेत्रफळ नऊ हजार योजनांएवढे असून सर्वांच्या मधोमध इलावृत्त आहे. तिथे सोन्याचा मेरूपर्वत आहे.
इलावृत्ताचे क्षेत्रफळ औरस चौरस नऊ हजार योजने एवढे आहे. या मेरूपर्वताच्या चारी बाजूंकडून आधार देत चार पर्वत उभे आहेत. यांतील प्रत्येक पर्वताची उंची १० हजार योजनांएवढी आहे. या प्रत्येकावर ११०० योजने उंच असे कदंब, जांभूळ, पिंपळ व बडाचे वृक्ष आहेत.
त्यांपैकी जंबू (जांभूळ) वृक्षामुळे जंबूद्वीप असे नाव प्रचलित झाले. त्याच्या फळांतील रस नदीसारखा वाहत असतो व तो पिणारे तेथील रहिवासी चिरतरुण असतात. तिच्या काठावर सुवर्णकणांची वाळू आहे. मेरू पर्वताच्या पूर्वेस भद्राश्व व पश्चिमेस केतुमाल असे प्रांत आहेत. चार बने आहेत व चार सरोवरे आहेत. चारी दिशांकडे प्रत्येकी पाच पाच केसरपर्वत आहेत.
या मेरूच्या वर अंतराळात ब्रह्मलोक आहे. त्या लोकाच्या आठ दिशांना इंद्र वगैरे लोकपालांच्या वस्त्या आहेत. विष्णूच्या चरणांपासून गंगा नदी उगम पावते व चंद्रलोकाला स्नान घालून ब्रह्मलोकी येते; मग ती पृथ्वीवर पडते आणि चार प्रवाहांनी वाहत जाऊन पुढे सागराला मिळते.
मेरूच्या सीमेवरील पर्वतांच्या बाहेर चार लोक आहेत. ते भारत केतुमाल, भद्राश्च आणि कुरुवर्ष असे आहेत. त्यांच्या सभोवती प्रत्येकी दोन दोन असे सीमापर्वत आहेत. आधी तुम्हाला मी जे केसरपर्वत सांगितले होते त्यांवर सिद्ध-चरण यांच्या वस्त्या आहेत. अनेक सुंदर नगरे व बागा आहेत. लक्ष्मी, विष्णू, अग्नी, सूर्य आदिकरून अनेकानेक देवांची नगरे आहेत. यक्ष, राक्षस, दैत्य व दानवांचीही नगरे आहेत.
हा मैत्रेय! या आठ क्षेत्रांमध्ये भूक-तहान असे विकार नाहीत. रोगराई नाही आणि पृथ्वीप्रमाणे तिथे कालगणना सुद्धा नाही.
‘भरतखंडाचे माहात्म्य’ अर्थांत हमारा भारत महान!
पराशर पुढे सांगू लागले सागराचा उत्तर किनारा व हिमालयाचा दक्षिण पायथा यांच्या मध्ये असलेल्या प्रदेशाला भारतवर्ष असे म्हटले जाते. तिथे भरताचा वंश नांदतो. त्या भू-भागाचे क्षेत्रफळ नऊ हजार योजनांएवढे आहे. ती पवित्र अशी कर्मभूमी आहे. तिच्यात सात कुलपर्वत आहेत. इथेच शुभ अगर अशुभ कर्मे करून मानव सद्गती अथवा दुर्गती प्राप्त करतात. असे कर्मस्वातंत्र्य अन्यत्र कुठेच नाही.
या प्रदेशाचे नऊ विभाग आहेत. त्यातील जो विभाग समुद्रवेष्टित आहे तो नववा आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ एक हजार योजने आहे. याच्या पूर्वेकडील प्रदेशांत वनवासी (भिल्ल वगैरे) व पश्चिमेकडील प्रांतात यवन रहातात. उरलेल्या प्रदेशांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असून ते आपापल्या वर्णानुसार कामधंदा करतात.
या भागात अनेकानेक नद्या आहेत, उपनद्या तर हजारो आहेत, हिमालय, पारियात्र, विद्याचल, ऋक्षगिरी, सह्याद्रि, मलयगिरी, महेंद्रगिरी त्याचप्रमाणे शक्तिमान या पर्वतात त्या नद्या उगम पावतात, या सर्वनद्यांच्या किनारी सुपीक प्रदेशांत अनेक जातीचे लोक राहात असतात, ते सर्व जण. परस्परांशी मिळून मिसळून राहतात,
“अहो मैत्रेय मुनी! चार युगांची कालगणना फक्त भारतातच प्रचलित आहे. दुसरीकडे कुठेही नाही. परलोक साधावा म्हणून इथे मुनिजन तपस्या करतात. याज्ञिक लोक यज्ञयाग करतात, दानधर्म करतात, इथे यज्ञाद्वारा भगवान विष्णूची आराधना होत असते. इतरत्र अन्य द्वीपांमध्ये आराधनेचे वेगवेगळे प्रकार व पद्धती आहेत. या जंबूद्वीपात भारतवर्ष सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे कारण म्हणजे कर्मस्वातंत्र्य फक्त इथेच आहे, इतरत्र नाही. इतर देश फक्त भोगभूमी आहेत.
जीवाला अनेक जन्मांच्या फेऱ्यांनंतर केव्हातरी महान पुण्याचा उदय झाला की, या देशात मनुष्याचा जन्म मिळतो. अशा जीवांचा देवांनासुद्धा हेवा वाटतो. असे हे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याच्या लाखो योजने वेढा असणारे व नऊ खंडांनी युक्त जंबूद्वीप आहे.
(श्री विष्णु पुराण अंश-२ क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७