श्रीविष्णु पुराण
अंश-५ (भाग-३)
प्रलंब व धेनुकासुराचा वध
आणि इंद्राचे गर्वहरण!
वैदिक साहित्यात म्हणजेच वेद आणि पुराणात दोन चरित्रे लोकप्रिय आणि विश्व प्रसिद्ध आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची! श्रीविष्णु पुराणात रामायणाचा कथासार आपण थोडक्यात पहिला. श्रीविष्णु पुराणातील संपूर्ण ५ वा अंश श्रीकृष्ण चरित्राला वाहिला आहे. आज आपण श्रीविष्णु पुराणातील श्रीकृष्ण चरित्र भाग -३ पाहणार आहोत.
धेनुकासुराचा वध
एके दिवशी कृष्ण आणि बलराम सवंगड्यांसहित गायी घेऊन तालवनापाशी गेले. त्या प्रदेशात घेनुक नाव असलेला गाढवाच्या रूपातील दैत्य राहत असे. तो नेहमी मांस खात असे. तिथे सर्व वृक्ष पिकलेल्या गोड ताड फळांनी लगडलेले होते. त्यांचा सुगंध दूरपर्यंत दरवळत होता. तेव्हा कृष्णाच्या खेळगडयांनी ताडफळे खाण्याची इच्छा बोलून दाखविली.
मात्र धेनुक राक्षसाच्या भीतीमुळे ते ती फळे तोडू शकत नव्हते, तेव्हा बलरामाने व श्रीकृष्णाने पुढे होऊन बरेच वृक्ष जोरजोराने गदगदा हालवले. त्यामुळे झाडांवरची फळे तुटून खाली पडली आणि त्यांचे जागोजागी ढिग झाले.
तो आवाज ऐकू गेला तेव्हा तो राक्षस धावत तिथे आला. तिथले दृश्य पाहून त्याला मोठा राग आला व त्याने मागच्या दोन पायांनी बलरामाच्या छातीवर प्रहार केला. तेव्हा बलरामाने त्याच्या दोन्ही तंगड्या पकडून आकाशात गरगरा फिरवला आणि एका ताड वृक्षावर आपटून मारला.
त्या राक्षसाचे इतर जोडीदार धाचून तिथे आले असता कृष्ण व बलराम या दोघांनी त्या सर्वांची गत धेनुकाप्रमाणे केली. तेव्हा ते तालवन फळे व राक्षसांची प्रेते यांनी भरून गेले.
त्यानंतर मात्र गुरे, गुराखी आणि नागरिक तशाच स्त्रिया निर्भयपणे वनात येऊ लागले.
प्रलंबाचा वध
धेनुकासुराचा वध झाल्यापासून तालवनात नागरिक ये-जा करू लागले. नंतर एकदा बलराम व कृष्ण भाण्डीर नावाच्या वडाच्या झाडापाशी आले.तिथे ते मनमुराद खेळू लागले. विविध प्रकारचे खेळ खेळताना ते त्यात रंगून गेले.त्यांना आजूबाजूचे भानही राहिले नाही.
अशा वेळी प्रलंब नावाचा एक दैत्य छोटया मुलाचे रूप घेऊन त्यांच्यात मिसळला. त्याचे सर्व लक्ष बलरामावर होते.
नंतर ते एक खेळ खेळू लागले. त्यात दोघाजणांनी एका ठराविक जागेपाशी धावत जायचे असते. तिथे जो आधी पोहोचेल तो जिंकतो, मग दुसर्याने त्याला खांद्यावर बसवून मूळ ठिकाणी घेऊन यायचे असते, त्या वेळी कृष्ण- श्रीदामा, प्रलंब-बलराम अशा अनेक जोड्या धावत सुटल्या.
मग जे हरले होते ते जिंकलेल्या जोडीदाराला खांद्यावर घेऊन परत फिरले. प्रलंब हरल्यामुळे त्याने बलरामाला खांद्यावर घेतला परंतु मागे न फिरता तो झरकन आकाशात उडून गेला पण बलरामाचे वजन जास्त झाल्यामुळे त्यानेही देह मोठा केला,
त्या समयी बलराम मदतीसाठी जोरजोरात ओरडून कृष्णाला हाका मारू लागला. त्यावेळी कृष्ण त्याला म्हणाला, “अरे! तू आपले मूळ रूप विसरलास की काय? आपण खरे कोण आहोत? आणि पृथ्वीवर कशासाठी आलो आहोत, ते जरा आठवून बघ. अरे अनंता! तू सहस्रमूर्ती, सहस्रचरण, सहस्रनेत्र, सहस्रशिरे, सहस्रबाहू आहेस. तुझे खरे रूप ब्रह्मांडमय आहे. तुझे खरे रूप तुझ्याविना कुणीच जाणत नाही.
अरे! तू पृथ्वीचा आधार आहेस, सर्व अवतारांचे मूळ आहेस, तूच सर्वभक्षी काळ आहेस. हे विश्व वारंवार तुझ्यात विरते व तुझ्यातूनच जन्मास येते. थोडक्यात सांगायचे तर मी व तू याच्यात फरक असा मुळीच नाही.
तेव्हा आपले मूळ रूप आठव आणि आपल्या अवताराला साजेल असे जे करावेसे वाटेल तर कर.”
कृष्णाने स्मरण करून दिल्यावर बलराम फक्त हसला आणि त्याने रागाच्या आवेशात प्रलंबाच्या मुखावर असा एक जोरदार ठोसा लगावला की, त्याचे दोन्ही डोळेच उपटले जाऊन खाली पडले.त्याच्या मस्तकाचा चेंदामेंदा झाला आणि तो रक्त ओकत आकाशातून खाली जमिनीवर कोसळला.
नंतर जयजयकार करणाऱ्या सवंगड्यांसह बलराम व कृष्ण घरी परतले,
शरद ऋतून केलेली गोवर्धनपूजा
हळूहळू पावसाळा ओसरला आणि शरद ऋतूची चाहूल लागली, नया व ओढे भरून वाहू लागले. मोरांचे ओरडणे व नाचणे थांबले. आकाशातून ढग निघून गेल्यामुळे ते गडद निळे व स्वच्छ झाले. चिखलासहित डबकी सुकून गेली. सरोवरे व तलाव कमळांनी भरून गेले. रात्री चंद्र व चांदण्या आभाळात पूर्ण तेजाने चमकू लागल्या.
नद्या व सरोवरातील पूर ओसरले. तलावांतून हंस अनिर्बंध होऊन फिरू लागले. समुद्र जो पावसाळ्यात खवळला होता, तो पुन्हा पूर्वीप्रमाणे शांत झाला. सरोबरांतून निळ्या आकाशाचे प्रतिबिंब दिसू लागले. सूर्याच्या किरणातील उष्णता सुसह्य होत चालली. सर्व वातावरणात प्रसन्नता भरून राहिली.
अशाप्रकारे ब्रजभूमी सुखदायक बनली असताना ब्रजवासी लोक मोठ्या उत्साहाने इंद्राचा उत्सव साजरा करण्याची तयारी करू लागले. ती त्यांची धावपळ पाहन कृष्णाने मोठ्या लोकांना विचारले की, हा कोणता उत्सव असतो व तो का केला जातो? तेव्हा नंदराज म्हणाला की,
“ढगांचा आणि पावसाचा अधिपती इंद्र आहे. तोच ढगांकडून वर्षाव करवितो. त्यामुळे आम्ही धान्य पेरून शेती करू शकतो आणि स्वतः अन्न खाऊन देवांनाही त्यांचा हविर्भाग देतो. आम्ही सर्व प्रजाजन आणि आमची पाळलेली जनावरे भरपूर अन्न व मुबलक चारापाणी या गोष्टींनी तृप्त होतात. गायी तृप्त होऊन दुधदुभत्याचा सुकाळ होतो. हे ढगच जर नसले तर सर्वत्र दुष्काळ पडेल व लोकांची उपासमार होईल.
हा पावसाचा स्वामी इंद्र पृथ्वीवरचे पाणी सूर्याच्या किरणांच्या द्वारे शोषून घेतो व ढगांच्या मार्फत भूमीवर पाऊस पडतो म्हणून आम्ही सर्वच जण कृतज्ञतेपोटी देवराज इंद्राची शरद ऋतूत पूजा करीत असतो”.
असे नंदाचे सांगणे ऐकून कृष्ण म्हणाला “अहो पिताजी! आपण काही शेतकरी नाही आणि व्यापारीही नाही. आपण पशुपालक असल्यामुळे गायी याच आमच्या देवता आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की, एकूण विद्या चार आहेत. १. तर्कशास्त्र, २. कर्मकांड, ३. दण्डनीती व ४. बार्ता, यांतील वार्ता या विधेचा संबंध शेती, व्यापार व पशुपालन यांच्याशी आहे.
आमचे मुख्य कर्तव्य पशुपालन हे आहे. ज्या व्यक्तीची जी विद्या असते तीच त्याची इष्टदेवता होय. तिचीच पूजा करणे योग्य आहे. याच्या विरुद्ध जो बागेल त्याची इहलोकात व परलोकात अधोगतीच होणार.
हे पाहा! शेतांची सीमा आहे. सीमेबाहेर अरण्ये आहेत व अरण्याच्या शेवटी पर्वत आहेत. आमची मर्यादा तिथपर्यंतच आहे. आपण तर शेतकरी किंवा व्यापारी नसून सर्वत्र स्वैर संचार करीत असतो; मग इंद्राची पूजा करण्याचे आम्हाला काही कारण नाही.
आणखी असे सांगितले जाते की, हे पर्वत इच्छाधारी असतात व ते कोणतेही रूप घेऊन फिरत असतात. जर त्यांना कुणी त्रास दिला तर ते सिंहाचे नाहीतर दुसऱ्या पशूचे रूप घेऊन त्याला मारून टाकतात,
याकरता आपण इंद्रपूजा न करता गोपूजा अगर पर्वतपूजा करणे हे योग्य आहे. आपले देव खरोखर तेच आहेत, तर या वर्षीपासून आपण जी काही पूजा करून अथवा जो यज्ञ करून तो या पर्वतदेवांसाठी करू या.
कृष्णाचे म्हणणे ऐकून सगळे म्हणाले की, “उत्तम! हा विचार आम्हाला आवडला.” नंदाने सर्वांना सांगितले की, कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे हा उत्सव साजरा करू या. मग त्यांनी मोठ्या उत्साहाने ‘गिरीयज्ञ’ केला. अनेक फुले व फळे यांनी पर्वतांना पूराजले. गायीगुरांना घेऊन गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घेतली. कृष्ण एक दूसरे दिव्यरूप घेउन शिखरावर प्रकट झाला व त्याने सर्वांना दर्शन दिले.
नंतर सर्व गवळी समाज गुरासह परत फिरला घरी गेला.
इंद्राचे गर्वहरण
पराशर पुढे म्हणाले, “आपणासाठी दरवर्षी केला जाणारा यज्ञ करता तो पर्वतासाठी केला असे पाहून इंद्र अतिशय संतापला. त्याने ढगांना आज्ञा केली की, त्यांनी नंदाच्या वस्तीवर मुसळधार पावसाचा अखंड वर्षाव करावा, तो स्वतः ऐरावतावर स्वार होऊन वादळे उत्पन्न करील व ढगांना पाणी पुरवील,
इंद्राच्या आदेशानुसार ढगांनी पावसाचा वर्षाव सुरू केला. प्रचंड वेगाने वादळी वारा वाहू लागला. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले. भरदिवसा माध्यान्ही अमावास्येच्या रात्रीसारखा काळोख दाटला. दिशा कळेनाशा झाल्या. विजांचा कडकडाट सतत चालला होता,
अशा अखंड अस्मानी संकटामुळे ते बिचारे गवळी, त्यांचे परिवार आणि गुरेढोरे यांना जीव कसा वाचवता येईल ते कळेना आणि ते सैरभैर झाले. गायींनी आपली बासरे पोटाखाली घेतली व त्या पावसाचा मारा झेलत थरथरा कापत कशाबशा उभ्या होत्या. सर्व बातावरणात गुरांचे हंबरणे व गवळणींचे रडणे यांचा आवाज भरून राहिला होता,
असे प्राणसंकट पाहून कृष्णाने अंतर्ध्यान लावून पाहिले तेव्हा त्याला समजले की, नेहमीप्रमाणे यज्ञ न झाल्यामुळे संतापलेल्या इंद्राचा हा उद्योग आहे. आता या सर्वांचे रक्षण मला केलेच पाहिजे. असा विचार करून तो पुढे झाला आणि सर्व बळ एकवटून त्याने तो प्रचंड गोवर्धन पर्वत मुळापासून उपटला आणि छत्रीसारखा एका हाताने डोक्यावर तोलून धरला.
मग त्याने हसून सर्वांना पर्वताखाली बोलावले आणि अभय दिले.
तेव्हा सर्वजण सामानसुमान घेऊन व गुरांना गोळा करून पर्यताखाली जमा झाले. माथ्यावर तो महापर्वत घेतलेल्या कृष्णाकडे ते डोळे विस्फारून पहातच राहिले. श्रीकृष्ण मात्र एखाद्या पुतळ्यासारखा शांत उभा होता.
‘सात दिवस व सात रात्रीपर्यंत असा प्रकार चालू होता!
तरीही गोकुळवासीय गोवर्धन पर्वताखाली सुखरूप होते. अखेरीस इंद्र थकला आणि त्याने जलवर्षाव थांबवला; मग सर्व लोक पर्वताखालून बाहेर आले आणि वृंदावनात आपापल्या घरी गेले. सर्व जण गेल्याचे पाहून श्रीकृष्णाने तो पर्वत जसा होता तसा पूर्ववत ठेवला.”
इंद्र कृष्णाला शरण येतो
एकंदर झालेल्या प्रकारावरून इंद्राची कृष्णाच्या अवतारित्वाविषयी खातरी पटली; मग तो ऐरावतावर बसून कृष्णाची भेट घ्यावी म्हणून गोवर्धनापाशी आला.
त्यावेळी कृष्ण व त्याचे सवंगडी गुरे राखत होते. इंद्राच्या दिव्यदृष्टीला असेही दिसले की, पक्षिराज गरुडाने अदृश्य रूपाने कृष्णावर छत्र धरलेआहे. ते दृश्य पाहिल्यानंतर तो ऐरावतावरून खाली उतरून कृष्णापाशी येऊन म्हणाला
“हे श्रीकृष्णदेवा! मी ज्या हेतूने इथे आलो आहे ते सांगतो. मला समजले आहे की, पृथ्वीवरील संकट निवारण्यासाठी अवतार घेतलेला तू परमात्मा आहेस. मला हविर्भाग न मिळाल्यामुळे संतापाच्या भरात मी अपरिमित जलवर्षाव केला परंतु तू गोवर्धनच उपटून गायींचे रक्षण केलेस. त्यामुळे मी आनंदीत झालो.
तू जो एकाच हातावर गोवर्धन तोलून धरलास त्यामुळे तुझ्या सामर्थ्याची चुणूक मिळाली म्हणून खास तुझा सत्कार करण्यासाठी इथे आलो आहे. कामधेनूने विनंती केल्यावरून मी उपेंद्र पदावर तुझा अभिषेक करणार आहे आणि तू गायींचा स्वामी (इंद्र) आहेस म्हणून तुला ‘गोविंद असेही म्हटले जाईल.”
नंतर इंद्राने ठिकठिकाणाहून तीर्थजल आणले व कृष्णाचा सर्व देवांसमक्ष अभिषेक केला; मग तो म्हणाला की, “मी कामधेनूला दिलेले वचन आज पुरे केले आहे पण माझे आणखी एक मागणे आहे तेही सांगतो.
माझ्याच अंशाने पृथ्वीवर अर्जुन जन्मला आहे. तरी तू कृपा करून त्याच्या पाठीशी उभा राहून त्याचे सर्वदा रक्षण कर. तो पृथ्वीचा भार उतरण्याच्या कामी तुला साहाय्य करील. तेव्हा तू त्याला सांभाळून घेत जा.”
त्यावर कृष्ण बोलला की, “अर्जुन हा पृथेचा पुत्र असून तुझाच अंशावतार आहे ते मला ठाऊक आहे. मी जोपर्यंत जिवंत असेन तोपर्यंत त्याचे रक्षण करीन. इंद्रा! मी असेतोवर अर्जुन नेहमी अजिंक्य राहिल. आता थोड्याच काळात कंस, अरिष्ट, केशी, कुवलयापीड व नरकासुर आदिकरून दैत्य नष्ट पावणार आहेत.
त्यानंतर अभूतपूर्व असे महाभारत युद्ध होईल. ते समाप्त झाले की पृथ्वीचा भार उतरला असे ओळख. आता तू निश्चितपणे परत जा. मी जोवर अर्जुनाच्या पाठीशी असेन तोबर त्याला कुणीच जिंकू शकणार नाही. महाभारताच्या अखेरीस मी पाचही पांडव सुखरूपपणे कुंतीच्या हवाली करीन.”
तेव्हा इंद्र समाधानाने परतून गेला.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-३) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल: ९४२२७६५२२७
Vishnu Puran Pralamb Vadha Indrache Garvaharan by Vijay Golesar