अधिक मास विशेष (भाग ३१)
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग ७)
पितारांना संतुष्ट करणारे श्राद्ध!
और्व मुनी महात्मा सगर यानां सांगू लागले,
” हे राजा! पुत्र जन्माला आला की, पित्याने आधी सचैल स्नान करावे मग जातकर्म व वृद्धी श्राद्ध करावे. नंतर एकाग्र होवून देवांसाठी व पित्रांसाठी दोन दोन ब्राह्म्नांचे पूजन करून जेवू घालावे. या श्राद्धामुळ नांदीमुख नावाचे पितर संतुष्ट होतात. कन्येच्या व पुत्राच्या विवाहरंभी, गृहप्रवेश करतांना, बारसे जावळ या प्रसंगी हे श्राद्ध अवश्य करावे.
आता प्रेतक्रिया कशी करावी ते सांगतो,
आप्त व नातलगांनी स्नान करून, प्रेताला फुलांनी सजवून गावाबाहेर नेऊन जाळावे. लगेच स्नान करून दक्षिणेकडे मुख करून पाण्याने तर्पण करावे; नंतर घरी येऊन, पुन्हा स्नान करून, रात्री दर्भासनावर निद्रा घ्यावी, मृतासाठी दररोज पिंडदान करावे आणि साधा शाकाहार घ्यावा. शक्य असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावे.
प्रेताचे दहन केल्यापासून चौथ्या दिवशी जाऊन अस्थि गोळा कराव्या. नंतर सगोत्री आप्त दैनंदिन कर्मे करू शकतात. दहनक्रिया करणारा गादीवर झोपू शकतो. मात्र स्त्रीसंबंध वर्ज्य आहे. लहान मुले, देशांतरी गेलेला आप्त, पतित व संन्यासी यांच्या मृत्यूनंतर, त्याचप्रामणे आगीत सापडून मेलेला, पाण्यात बुडून आत्महत्या केलेला अशांच्या मृत्यूनंतर लगेच अशौच संपते. तेव्हा कुटुंबीयांनी घरामध्ये दहा दिवसांपर्यंत अन्न शिजवू नये व पूजापाठ, दानधर्म, अध्ययन करू नये. असे सुतक ब्राह्मणासाठी १० दिवसांपर्यंत, क्षत्रियासाठी १२ दिवसापर्यंत, वैश्य वर्णासाठी १५ दिवसांपर्यंत व शूद्रासाठी एक महिना असते.
सुतक संपले की, विषम संख्येत (१, ३, ५, ७, ९) ब्राह्मणांना जेवू घालावे व तिथे जवळच दर्भावर पिंडदान करावे; नंतर ब्राह्मणाने पाण्याला, क्षत्रियाने हत्याराला, वैश्याने चाबकाला आणि शूद्राने काठीला स्पर्श करावा.
हे राजा! एवढे झाले की, ज्याने त्याने आपल्या उद्योगास लागावे व दैनंदिन व्यवहार करावे नंतर प्रत्येक महिन्यातील तिथीस एकोद्दिष्ट मासिक श्राद्ध करावे. एकच पिंड द्यावा. फक्त ब्राह्मणांना जेवू घालावे. असा क्रम एक वर्षापर्यंत चालवावा. पुढे जेव्हा वर्ष पूर्ण होईल तेव्हा सपिंडीकरण करावे. तो विधी ऐकून ठेव! हा विधी १२ दिवसांत, ६ महिन्यांत अगर वर्षानंतर करता येतो. तो एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणे करावा.
त्यासाठी पाण्याने भरलेल्या चार भांड्यांत तीळ, चंदन घालावे. त्यातले एक भांडे मृत भांड्यातले थोडे थोडे पाणी इतर तीन भांड्यांत ओतावे. अशा तऱ्हेने त्या मृताला पितरांसोबत जोडल्यानंतर संपूर्ण श्राद्धविधी करावा.
हे राजा! श्राद्ध करण्याचा अधिकार कुणाला असतो तेही ऐका. मुलगा, नातू, पणतू हे मुख्य अधिकारी आहेत. ते नसले तर मृताचा भाऊ, भाचा किंवा कुणीही सगोत्र पुरुष करू शकतो. त्यांच्यापैकी कुणीच न मिळाल्यास पित्याकडील अथवा मातेकडील संबंधित आप्त करू शकतो. जर दोन्हीकडील पुरुष उरले नसतील व निर्वंश झाला असला तर स्त्रिया करू शकतात. त्याही नसल्या तर राजाला अधिकार आहे.
प्रेतसंबंधित कर्मांचे तीन विभाग आहेत व त्यांची नावे – १ पूर्वकर्म, २ मध्यमकर्म व ३ उत्तरकर्म. त्यांची लक्षणेही सांगतो. प्रेताला अग्नी दिल्यापासून शस्त्र वगैरे स्पर्श करण्यापर्यंतची जेवढे विधी आहेत तेवढे सर्व पूर्वकर्म आहेत. सर्व मासिक एकोद्दिष्ट श्राद्धे ही मध्यमकर्मे आहेत. पुढे सपिंडीकरणाचा विधी करून मयताचा पितृलोकात प्रवेश झाल्यानंतरचे जे विधी केले जातात, ते सर्व उत्तरकर्मे होत.
मृत व्यक्तीची आई, बाप, सपिंड व सगोत्र बांधव, ज्ञातिबांधव किंवा राजा हे पूर्वकर्मासाठी पात्र आहेत परंतु उत्तरकर्म मात्र मयाताचा मुलगा, नातू व त्यांचे संतान अर्थात रक्ताचे वारसदार हेच करू शकतात.
हे राजा! स्त्रियांच्या मृत्युतिथीला त्यांचेही एकोद्दिष्ट श्राद्ध अवश्य करावे. आता कुणाकुणाची उत्तरक्रिया कोणकोणत्या प्रकारे करावी? केव्हा करावी? कशा प्रकारे करावी? या सर्व गोष्टी सांगतो, त्या ऐक.”
योग्य श्राद्ध कसे करावे?
और्वांनी आपले कथन पुढे चाल केले. ते म्हणाले, “हे राजा! श्राद्ध जर श्रद्धापूर्वक केले तर त्या श्राद्ध करणाऱ्यावर ब्रह्मदेव, इंद्र, रुद्र, अश्विनीकुमार, सूर्य, अग्निदेव, वसू, मरुद्गण, विश्वेदेव, पितृदेव, पक्षी, मनुष्य, पशू, जीवजंतू, ऋषी, भूतसमूह, असे सर्वजण प्रसन्न होतात.
आता श्राद्धाकरता योग्य काळ सांगतो,
दर महिन्यातील वद्य पंचमी व हेमंत आणि शिशिर ऋतूतील चार शुक्ल अष्टम्या या श्राद्धासाठी योग्य आहेत. हे नित्यश्राद्धाकरिता असून जेव्हा काम्यश्राद्ध करावयाचे तोही काळ सांगतो.
उत्तरायनाच्या व दक्षिणायनाच्या आरंभी व व्यतिपात असेल तेव्हा काम्य श्राद्ध करावे. विषुवसंक्रांतीच्या दिवशी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, सूर्य राशी ज्या दिवशी बदलतो त्या दिवशी, नक्षत्रपीडा अगर ग्रहांची पीडा होते तेव्हा, दुःस्वप्न पडल्यास आणि घरी नवीन पीक येते अशावेळी जरूर काम्य श्राद्ध करावे.
अनुराधा, विशाखा आणि स्वाती नक्षत्र असलेल्या अमावास्येला श्राद्ध केल्याने पितर आठ वर्षांपर्यंत तृप्त होतात. जर अमावस्येला पुष्य, आर्द्रा व पुनर्वसु नक्षत्र असताना श्राद्ध केले तर पितर बारा वर्षांपर्यंत तृप्त होतात.
धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा व शततारका नक्षत्रयुक्त अमावास्या फार दुर्लभ आहे. तेव्हा वरीलप्रमाणे नऊ नक्षत्रांपैकी कोणतीही अमावास्या असेल तेव्हा केलेल्या श्राद्ध विधीमुळे पितर अत्यंत संतुष्ट होत असतात. याशिवाय पितृभक्त पुरुरवा याने विचारल्यावरून सनत्कुमारांनी आणखीही तिथी सांगितल्या आहेत.
सनत्कुमारांनी सांगितले की, वैशाख शुद्ध ३, कार्तिक शुद्ध ९, भाद्रपद वद्य १३ व माघ अमावास्या या चार तिथींना ‘युगाधा’ असे नाव आहे आणि या चारीही तिथी फार पुण्यदायी आहेत. शिवाय चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, तीन अष्टका किंवा उत्तरायणाच्या आरंभी किंवा दक्षिणायनाच्या आरंभी तिळमिश्रित पाण्याने जो मनुष्य पितरांसाठी तर्पण करील त्याला १००० श्राद्धे केल्याचे फळ मिळेल.
त्यांतही जर माघातल्या अमावास्येला शततारका नक्षत्र असेल तर तो मुहूर्त फारच श्रेष्ठ असतो पण असा योग भाग्यानेच मिळतो. माघ अमावस्येला जर धनिष्ठा नक्षत्र असतांना श्राद्ध केले तर पितर १०,००० वर्षांपर्यंत तृप्त होतात. त्याचप्रमाणे जर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असताना श्राद्ध केले तर पितर एक हजार युगांपर्यंत तृप्त होतात. अशा प्रकारच्या तृप्तीसाठी पितर अशी प्रार्थना करतात की –
आमच्या वंशात असा कुणी जन्मेल का? जो सढळ हाताने ब्राह्मणांना दान देऊन संतुष्ट करील व विधिपूर्वक श्राद्ध करील. नाहीतर जर त्याची परिस्थिती साधारण असली तरी यथाशक्ती श्राद्ध करील, तेवढेही सामर्थ्य नसले तर त्याने ब्राह्मणांना निदान मूठमूठ तीळ तरी दान द्यावेत, नाहीतर तिळमिश्रित पाण्याने तर्पण तरी करावे. एवढेही करण्याची ऐपत नसली तर कुठूनतरी गवत आणून एक दिवसभर गायीला खाऊ घालावे. जर वरील पर्यायांपैकी काहीही करता येणार नसेल तर निदान त्याने गावाबाहेर वनात जावे व दोन्ही हात उंच उभारून सूर्याला अशी प्रार्थना मोठ्या आवाजात करावी
“अहो! मी अत्यंत दरिद्री असल्याकारणाने श्राद्ध करू शकत नाही. तरी सर्व पितरांना मी फक्त नमस्कार करून विनंती करतो की, त्यांनी माझी श्रद्धा व भक्ती जाणून तृप्त व्हावे.”
वरीलपैकी कोणत्या ना कोणत्या प्रकाराने का असेना, पण श्राद्ध जरूर करावे.”
असे करतात शास्त्रशुद्ध श्राद्ध!
और्य पुढे सांगतात
“राजा! श्राद्धासाठी जे ब्राह्मण आमंत्रित करावयाचे त्यात सहा वेदांगांचे जाणते, वेदोनारायण, श्रोत्रिय, योगी, सामगायन करणारे तसेच ऋत्विक, भाचे, नातू, जावई, सासरा, मामा, तपस्वी, पंचाग्नी साधना करणारे, शिष्य, आप्तसोयरे आणि आई-वडिलांचे स्नेही असे लोक असावे. त्यात वेदांग जाणकारांपासून ते सामगायकांपर्यंत पूर्वकर्मासाठी व ऋत्विक पासून पुढचे उत्तरकर्मांसाठी योजावे. कुपात्र ब्राह्मणांना मात्र बोलावू नये.
श्राद्ध तिथीच्या आदल्या दिवशी जाऊन ब्राह्मणांना पितृश्राद्ध व विश्वेदेव श्राद्ध करावयाचे आहे असे सांगून आमंत्रण द्यावे. स्वतः क्रोध आवरूनआणि स्त्रीपासून दूर राहून व्रतस्थ असावे, अन्यथा मोठा दोष लागतो. श्राद्धाच्या वेळी अचानक जर कुणी तपस्वी ब्राह्मण अनाहूतपणे आलाच तर त्याचेही स्वागत करून जेवू घालावा.
ब्राह्मण आले की आधी त्यांना पाय धुवून व हात धुवून आचमन करण्यास पाणी देऊन आसन द्यावे. जसे आपले सामर्थ्य असेल त्याप्रमाणे पितरांसाठी विषम संख्येत व देवांसाठी सम संख्येत ब्राह्मणांची नियुक्ती करावी. नाहीतर दोन्ही पक्षांसाठी एकेका ब्राह्मणाची नियुक्ती करावी.
नंतर मातामह व पितामह यांचेसाठी वेगळे वेगळे वैश्वदेवयुक्त श्राद्ध करावे अगर एकत्रपणे करावे; नंतर भोजनासाठी देवपक्षाच्या ब्राह्मणांना पूर्वाभिमुख आणि पितरांच्या ब्राह्मणांना उत्तरेकडे मुख करून बसवावे..
प्रथम ब्राह्मणांना दर्भासन देऊन, अर्घ्य व इतर उपचारांनी त्यांची पूजा करावी, नंतर ते जसे सांगतील तसे जवमिश्रित पाण्याने देवांना अर्घ्य देऊन यथासांग पूजा करावी; नंतर पितरांना तिळमिश्रित पाण्याने अर्घ्य देऊन त्यांची पूजा करावी.
त्या वेळी जर एखादा अतिथी आला तर तेव्हा त्यालाही जेवू घालावा. कारण बऱ्याच वेळा योगी व महात्मे मानवाच्या कल्याणासाठी रूप बदलून फिरत असतात. तेव्हा तर अतिथी विन्मुख गेला तर संपूर्ण श्राद्धविधी निष्फळ होतो.
त्यानंतर अळणी भाताच्या तीन आहुत्या अग्नीत द्याव्यात. त्या क्रमाने १ कव्यवाहन २ सोम व ३ वैवस्वत यांच्याकरिता असतात. त्यानंतर उरलेला भात थोडा थोडा ब्राह्मणांच्या ताटात वाढावा; मग संपूर्ण भोजन वाढावे व ब्राह्मणांना जेवण्यासाठी विनंती करावी. ब्राह्मण जेवल्यानंतर त्यांच्या रुपाने जेवनार्या पितरांच्या तृप्तीसाठी प्रार्थना करावी त्यात पिता, पितामह व प्रपितामह, मातामह, मातामही त्याप्रमाणे विश्वेदेव यांच्यासाठी त्यांची नावे उच्चारून प्रार्थना करावी.
नंतर ब्राह्मण जेवून उठले की, थोडे अन खाली जमिनी आचमनासाठी पळीभर पाणी सोडावे. नंतर ब्राह्मण सांगतील त्याप्रमाणे तिलमिश्रित अचाचे पिंड दयाचेत आणि पितरांना तिलांजली द्यावी.
पिंड तीन असावेत. त्यातील एक पिल्यासाठी, दुसरा आजोबांसाठी व तिसरा पणजोबांसाठी असतो; नंतर ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी व आशीर्वाद घ्यावे. आईकडच्या पितरांसाठी असाच विधी आहे.
त्यावेळी आधी वडिलांकडील व नंतर आईकडील पितरांना पिंडदान करावे. मात्र निरोप देताना उलट क्रमाने म्हणजे आधी मातृपक्षाचे पितर व नंतर पितृपक्षाचे पितर यांना निरोप द्यावा.
नंतर श्राद्धविधी चालविणाऱ्या ब्राह्मणांची उत्तम प्रकारे संभावना करून त्यांना फाटकापर्यंत सोबत करावी; नंतर नेहमीप्रमाणे वैश्वदेव करावा व घरच्या सर्वांनी भोजन करावे. तृप्त झालेले पितर श्राद्धकर्त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात.
पितरांचा अधिपती चंद्र असून योगाचा आधार चंद्राला आहे म्हणून जर श्राद्धासाठी एक योगी भाग्याने लाभला तरी हजारो ब्राह्मणांपेक्षाही त्याला तृप्त करण्याचे पुण्य जास्त आहे.”
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग -7)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल -९४२२७६५२२७
Vishnu Puran Pitarana Santusha Shraddha by Vijay Golesar