अधिक मास विशेष-३९
श्री विष्णु पुराण अंश -४ (भाग ६)
नहुषपुत्र ययातीची कहाणी
ख्यातनाम मराठी साहित्यिक कै. वि.स.खांडेकर यांनी लिहिलेल्या ‘ययाती’ या कादंबरीला मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचे सर्वविदित आहे. हा ययाती कोणत्या वंशात जन्मला तो कुणाचा पुत्र होता त्याचे पुत्र कोण होते याची मूळ माहिती श्री विष्णु पुराण मधील अंश-४ मध्ये सापडते. ज्या कथा बीजा वरून वि.स. खांडेकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी कादंबरी लिहिली त्याचे मूळ आज आपण पाहणार आहोत.
नहुषाला एकूण सहा पुत्र होते. १. यति, २. ययाति, ३. संयाति, ४. आयाति, ५. वियाति व ६. कृति. त्यांच्यापैकी सर्वांत थोरला जो यति होता तो राज्याविषयी विरक्त होता. त्यामुळे त्याच्यामागचा ययाति हा राजा झाला. ययातीला दोन बायका होत्या. एक होती दैत्यगुरू शुक्राचार्य यांची मुलगी ‘देवयानी’ आणि दुसरी दैत्यसम्राट वृषपर्वा याची मुलगी ‘शर्मिष्ठा’!
देवयानीला यदु व तुर्वसु असे दोन पुत्र झाले व शर्मिष्ठेला द्रह्यु, अनु आणि पुरू असे तीन पुत्र झाले. शुक्राचार्यांनी शाप दिल्यामुळे राजा ययाति हा अकाली वृद्ध बनला होता; नंतर शुक्राचार्यांनी उ:शाप दिल्यावर त्याने आपल्या सर्व पुत्रांना बोलावून घेतले आणि तारुण्याच्या बदल्यात त्याची वृद्धावस्था एक हजार वर्षांपर्यंत स्वीकारणार का? असे प्रत्येकाला विचारले. तेव्हा एकट्या पुरुशिवाय बाकीच्या पाचांनीही नकार दिला.
पुरू हा पाची जणातील सर्वांत छोटा व शर्मिष्ठेचा पुत्र होता. त्याने मात्र पित्याचे वृद्धपण आनंदाने घेतले. त्यावेळी ययातीने बाकीच्या चारीही पुत्रांना शाप दिले; मग तो पुन्हा तरुण बनला आणि सर्व सुखांचा उपभोग घेऊ लागला.
अशाप्रकारे एक हजार वर्षे पुरी झाली तेव्हा त्याला असे आढळून आले की, इतकी वर्षे सर्व प्रकारची सुखे पुरेपुर उपभोगली तरीही वासना थकल्या नाहीत. उलट त्या ताज्या व टवटवीत आहेत; मग त्याने विचार करून असे उद्गार काढले की, ” भोगांची तृप्ती भोग घेऊन कधीच होत नाही तर अग्नीत तूप ओतल्यावर तो जसा आणखीच उफाळतो तशी भोगवासना वाढत जाते. पृथ्वीवरचे उत्तमोत्तम असे धान्य, फळे, संपत्ती, पशू आणि सुंदर स्त्रिया जरी प्राप्त झाल्या तरी मनुष्याच्या मनाचे समाधान कधीही होणार नाही. माणसाने जर सर्वांभूती प्रेमभावना ठेवली तरच तो सुखी होऊ शकेल. अत्यंत दुस्तर अशी वासना ही अति वृद्धावस्थेतही माणसाला घट्ट चिकटून रहाते. जो कुणी तिच्या विळख्यात सापडत नाही तोच खरा सुखी. काळानुसार शरीर आणि गात्रे ही थकून जातात पण आणखी जगण्याची आशा आणि वैभवाची हाव ही मात्र जशीच्या तशीच रहातात. एक हजार वर्षांपर्यंत नित्य विषय भोगूनसुद्धा माझी आसक्ती अजूनही जरासुद्धा कमी होत नाही. तर आता मी सर्व प्रपंच सोडून अरण्यात जातो आणि ईश्वराचे स्मरण करीत फिरत रहातो.” मग त्याने पुरूला त्याचे उसने घेतलेले तारुण्य परत केले. त्याचा राज्याभिषेक थाटामाटात केला. इतर चारीही पुत्रांना मांडलिकत्व दिले आणि आपण वनात निघून गेला.”
यदुवंश आणि सहस्रार्जुनाची कहाणी
पराशर मैत्रेयांना म्हणाले – “आता मी तुम्हाला ययातिचा थोरला पुत्र जो यदु, त्याच्या वंशाचे वर्णन करून सांगतो. या वंशाचे वैशिष्ट्य म्हणजे मानव, सिद्ध, गंधर्व, राक्षस, यक्ष, गुह्यक, किंपुरुष, अप्सरा, सर्प, पक्षी, दैत्य, दानव, आदित्य, रुद्र, बसु, अश्विनीकुमार, मरुत्, देवर्षी, मुमुक्षू व चारी पुरुषार्थांचे साधक ज्या एकमेव अनादिसिद्ध परमात्म्याची उपासना करीत असतात त्या भगवान विष्णुने त्या वंशात श्रीकृष्णाच्या रुपाने पूर्णावतार धारण केला होता.
असे म्हणतात की, श्रीकृष्णाच्या रूपात परब्रह्माने ज्या यदुवंशात अवतार घेतला त्याचे कीर्तन श्रवण केले तर मनुष्य सर्व पापांतून निःशेष मुक्त होतो.
त्या यदूचे सहस्राजित्, क्रोष्टु, नल आणि नहुष असे चार मुलगे होते. पैकी सहस्रजिताला शतजित हा पुत्र झाला. त्याला हैहय, हेहय व वेणुहय असे तीन पुत्र झाले. त्यातील जो हैहय त्याचा पुत्र धर्म त्याचा धर्मनेत्र त्याचा कुन्ति – त्याचा सहाजित व त्याचा पुत्र महिष्मान होता. त्याने माहिष्मती (महिकावती) हे नगर बसविले.
महिष्मानाचा पुत्र भद्रश्रेण्य त्याचा दुर्दम त्याचा धनक व धनकाचे कृतवीर्य, कृताग्नि, कृतधर्म व कृतौजा असे चार पुत्र होते. त्यातील कृतवीर्याच्या पोटी हजार हात असलेला व सात द्वीपांचा अधिपती ‘अर्जुन’ जन्मला. त्याने अत्रिकुलातील विष्णूचा अंश जो दत्तात्रेय त्याची आराधना करून हजार हात, अधर्माचे निवारण, स्वधर्माचे पालन, प्रजापालन, स्मर्तृगामित्व आणि भगवंताच्या अंशावताराच्या हातून मरण असे कितीतरी वर मिळविले होते.
सहस्रार्जुनाने दहा हजारांवर यज्ञ केले. त्याच्या राज्यात चोरीचे नावदेखील नव्हते. सर्व प्रजा पूर्णपणे सुरक्षित होती. त्याने ८५ हजार वर्षे राज्य केले. एकदा असे झाले की, तो दारू सेवन करून नर्मदा नदीत जलक्रीडा करीत असता, त्रैलोक्यविजयी रावणाने त्याच्या नगरीवर चढाई केली. तेव्हा अर्जुनाने रावणाला झोडपून काढला आणि नगराबाहेर एका वृक्षाला जनावरासारखा बांधून ठेवला होता. पंचाऐंशी हजार वर्षे राज्य केल्यावर तो नारायणाचा अवतार जो परशुराम, त्याच्याकडून युद्धात मारला गेला.
सहस्रार्जुनाला शंभर पुत्र होते. त्यातील शुर, शुरसेन, वृषसेन, मधु आणि जयध्वज हे पाच जण मुख्य होते. जयध्वजाचा पुत्र तालजंघ त्यालाही शंभर पुत्र होते. त्यांच्यामधला सर्वांत थोरला होता त्याचे नाव वीतिहोत्र! त्याच्यामागचा भरत होता. भरताला पुन्हा वृष हा पुत्र झाला त्याचा मधु – त्याचा वृष्णि असा वंश वाढत गेला. या वृष्णिमुळे या वंशाला यादव या नावाशिवाय वार्ष्णेय, मधुमुळे मधुवंश असेही म्हटले गेले.”
क्रोष्टुचा वंशविस्तार
यदुचा पुत्र क्रोष्टु याच्या पुत्राचे नाव ‘ध्वजिनीवान्’! ध्वजिनीवानाचा स्वाति – त्याचा रुशंकु – त्याचा चित्ररथ – त्याचा शशिबिंदु होता. चौदा महारत्ने त्याच्याजवळ होती. तो चक्रवर्ती सम्राट असून त्याला एक लाख बायका आणि दहा लाख पुत्र होते. त्यांपैकी पृथुश्रवा, पृथुकर्मा, पृथुकीर्ति, पृथुयश, पृथुजय आणि पृथुदान हे सहाजण पुत्र मुख्य होते. पृथुश्रव्याचा पुत्र पृथुत्तम आणि त्याचा पुत्र उशना होता.
उशना याने शंभर अश्वमेध यज्ञ केले. त्याचा पुत्र शितपु रुक्मकवच – त्याचा परावृत् – त्याचे पाच पुत्र होते. त्यांची नावे रुक्मेषु, पृथु, ज्यामध, वलित आणि हरित अशी होती. त्यांच्यापैकी ज्यामध हा एवढा स्त्रीच्या कबजात होता की, जगात आजवर एवढा बाईलवेडा कुणीच झाला नाही. त्याची बायको शैब्या ही वांझ होती तरीसुद्धा तिच्या भीतीपोटी त्याने दुसरे लग्न केले नव्हते.
एकदा तो मोठ्या लढाईसाठी गेला असता सर्व शत्रूंचा पराभव केल्यानंतर त्याने एक निराधार व भयभीत अशी राजकन्या पाहिली, ती रक्षणाकरीता विलाप करीत होती. ती राजाच्या मनात भरल्यामुळे त्याने तिला अभय देऊन रथात बसवून घेतली व तो आपल्या राजधानीत परतला.
राजाच्या स्वागतासाठी शैब्या स्वतः नगराच्या वेशीवर मंत्रिमंडळासह हजर होती. रथात राजाच्या डावीकडे बसलेल्या त्या सुंदरीला पाहताच संतापाने कापणाऱ्या ओठांनी शैब्याने विचारले की, “अहो मनमौजी! तुमच्या बाजूस बसलेली ही कोण आहे?” त्यावर राजा गडबडला व म्हणाला की, “अगं ही आपली सून आहे. तेव्हा शैब्या बोलली की, मला तर पुत्रच नाही आणि तुम्हाला दुसरी पत्नीसुद्धा नाही; मग ही तुमची सून कशी ते सांगा.” तेव्हा राजाने शैब्याच्या धाकाने जे चुकीचे उत्तर दिले होते; त्याची सारवासारव करण्यासाठी असे सांगितले की, “तुला जो पुढे पुत्र होणार आहे त्याच्यासाठी मी आधीच ही पत्नी योजिली आहे.”
त्यावर “मग ठीक आहे” असे म्हणून शैब्या व सर्वजण नगरात दाखल झाले. त्यानंतर असे झाले की, तिच्या नशिबात संततियोग नसूनही राजाचे व तिचे जे बोलणे झाले त्या वेळेचा गुण म्हणून राणी शैब्या हिला मुलगा झाला. त्याचे नाव ‘विदर्भ’ असे ठेवले. पुढे त्या मुलीशीच त्याचे लग्नही झाले.
विदर्भाला दोन मुलगे झाले. त्यांची नावे क्रथ व कौशिक. शिवाय रोमपाद नावाचा तिसरा मुलगा होता तो नारदांचा शिष्य झाला. या रोमपादाचा मुलगा बभ्रु- त्याचा धृति – त्याचा कौशिक- त्याचा चेदि व चेदिचे वंशज ते चैद्य राजे झाले. क्रथ जो होता त्याचा मुलगा कुंति – कुन्तिचा धृष्टि- त्याचा निधृति – त्याचा दशार्ह- त्याचा व्योमा- त्याचा जीमूत- त्याचा विकृति त्याचा भीमरथ – त्याचा नवरथ – त्याचा दशरथ – त्याचा शकुनि – त्याचा करंभि त्याचा देवरात त्याचा देवक्षत्र त्याचा मधु- त्याचा कुमारवंश – त्याचा अनु- त्याचा पुरुमित्र- त्याचा अंशु – त्याचा सत्वत अशी वंशावळी आहे. सत्वतापासून पुढे सात्वतवंश असे नाव रूढ झाले. असे हे ज्यामध राजाचे व त्याच्या वंशाचे कथन जो ऐकेल तो पापमुक्त होईल.”
श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -६ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर