अधिक मास विशेष-३७
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -४ )
निमिचे चरित्र आणि वंशविस्तार
पराशर पुढे सांगू लागले-
“इक्ष्वाकूचा निमि नावाचा जो पुत्र होता त्याने एक हजार वर्षे चालणारा यज्ञ आरंभिला व त्यात मुख्य होता (यज्ञ चालविणारा पुरोहित) म्हणून आमंत्रण केले. तेव्हा वसिष्ठांनी प्रथमच सांगितले की, सध्या मी पाचशे वर्षांपर्यंत इंद्राच्या यज्ञाचा ऋत्विज आहे. तेव्हा तो संपला की, मी तुझ्या यज्ञाची जबाबदारी घेऊ शकेन. तोपर्यंत तुला थांबावे लागेल. तेव्हा राजा मुकाट्याने उठून निघून गेला. वसिष्ठांची अशी समजूत झाली की त्यांचे म्हणणे राजाने मान्य केले व ते यज्ञात गुंतले परंतु निमि राजाने गौतम मुनींना होता करून यज्ञ आरंभला.
इंद्राच्या यज्ञाची सांगता करून वसिष्ठ येऊन पहातात तर गौतमांच्या नेतृत्वाखाली निमिचा यज्ञ चालू होता. तेव्हा त्यांनी रागाने निमिला शाप दिला की, तो अशरीरी होईल. तेव्हा राजा झोपला होता. उठल्यावर त्यानेही वसिष्ठांना उलट शाप दिला की, “मी झोपलो असताना या दुष्टाने नीट चौकशीसुद्धा न करता अविचाराने शाप दिला म्हणून याचाही देह नाश पावेल.” असे बोलून राजा देहातून बाहेर निघाला.
निमिच्या शापामुळे वसिष्ठांचा सूक्ष्मदेह मित्रवरुण याच्या वीर्यात शिरला आणि उर्वशीपासून त्यांना नवीन देह मिळाला. निमिचा देह नीट काळजीपूर्वक औषधी लेप लावून जपून ठेवल्यामुळे तोसुद्धा जसाच्या तसा ताजातवाना राहिला.
पुढे यज्ञसमाप्तीचे वेळी आपले भाग घेण्याकरता देव आले असता पुरोहितांनी यजमानाला वर द्यावा अशी त्यांना विनंती केली. देवांनी राजाला त्याची इच्छा विचारली तेव्हा तो म्हणाला की, वारंवार देह धारण करणे आणि सोडणे हे मोठे दुःखदायक आहे म्हणून आता ती अशरीरी राहून सर्व प्राणिमात्रांच्या डोळ्यांत राहू इच्छितो.
तेव्हा देवांनी तसा त्याला वर दिला व त्यावेळेपासून प्राण्यांच्या पापण्यांची उघडझाक होऊ लागली. (एक वेळ पापणीची उघडझाक होताना जेवढा सूक्ष्म वेळ लागतो त्याचे ‘निमिष’ असे नाव आहे.)
नंतर सर्व मुनींना अशी भीती वाटली की, जर राजाच नसला तर अराजक माजेल म्हणून त्यांनी राजाचे शरीर शमीच्या सोट्याने घुसळले असता त्यातून एक पुत्र जन्मला तो जनक या नावाने प्रख्यात झाला. त्याचा पिता देहविरहित असल्यामुळे ‘वैदेह’ आणि मंथनातून जन्मल्यामुळे ‘मिथि’ अशीही त्याची नावे आहेत.
या जनकाचा पुत्र उदावसु – त्याचा नंदिवर्धन- त्याचा सुकेतु – त्याचा देवरात – त्याचा बृहदुक्थ – त्याचा महावीर्य- त्याचा सुधृति – त्याचा धृष्टकेतु – त्याचा हर्यश्व – त्याचा मनु – त्याचा प्रतीक – त्याचा कृतरथ – त्याचा देवमीढ- त्याचा विबुध- त्याचा महाधृति- त्याचा कृतरात – त्याचा महारोमा- त्याचा सुवर्णरोमा- त्याचा ऱ्हस्वरोमा- त्याचा सीरध्वज असा वंश वाढत चालला.
एकदा हा सीरध्वज पुत्राच्या इच्छेने यज्ञभूमी नांगरत असता नांगराच्या फाळाच्या टोकाला लागून त्याला सीता नावाची कन्या सापडली. या सीरध्वजाचा एक भाऊ होता. त्याचे नाव ‘कुशध्वज’ असे होते.
या सीरध्वजाचा पुत्र भानुमान् त्याचा शतगुन त्याचा शुषि त्याचा ऊर्जनामा- त्याचा शतध्वज त्याचा कृति त्याचा कुरुजित्- त्याचा पुत्र अरिष्टनेमि त्याचा सुपार्श्व- त्याचा संजय, त्याचा क्षेमावि त्याचा अनेना त्याचा भौमस्थ- त्याचा सत्यरथ त्याचा उपगु त्याचा उपगुम त्याचा स्वागत – त्याचा स्वानन्द- त्याचा सुवर्चा त्याचा पुत्र सुपार्थ त्याचा सुभाष – त्याचा सुश्रुत- त्याचा जय त्याचा विजय त्याचा ऋत त्याचा सुनय- त्याचा बीतहव्य- त्याचा धृति त्याचा बहुलाथ त्याचा कृति असा तो वंश वाढत गेला. कृतिनंतर तो वंश खंडित झाला,
या वंशातील सर्व राजे आत्मविद्येचे उपासक होते।”
सोमवंशाचा विस्तार, चंद्र, बुध व पुरुरवा यांची कथा
मैत्रेयांनी पराशरांना विनंती केली की, आता त्यांना चंद्राच्या सोमवंशातील राजांविषयी माहिती सांगावी; कारण असे तेसुद्धा पराक्रमी व कीर्तिमान होते.
पराशर बोलू लागले – “ऐका! चंद्राच्या वंशात नहुष, ययाति, कार्तवीर्य आणि अर्जुनासारखे कितीतरी महापराक्रमी, सद्गुणी, देखणे व चतुर राजे उत्पन्न झाले. त्यांचे थोडक्यात मी वर्णन करतो.
सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचे पुत्र ‘अत्रि’ होते. चंद्र हा त्यांचा पुत्र आहे. त्याला ब्रह्मदेवाने औषधी वनस्पती, विप्र आणि नक्षत्रमंडल यांच्यावर प्रमुख अधिकारी केला; नंतर चंद्राने राजसूय यज्ञ केला. राज्याधिकार प्राप्त झाल्यामुळे त्याने सर्व देवांचा गुरू जो बृहस्पती, त्याची पत्नी तारा हिलाच पळवून नेली.
तेव्हा गुरूने तक्रार केल्यावर ब्रह्मदेवाने चंद्राची कानउघडणी केली. नारदांनी चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या परंतु त्याने कुणालाच दाद दिली नाही. त्यात आणखी भर घातली गुरूचे वैरी शुक्राचार्य यांनी त्यांनी संपूर्ण दैत्यसेनेसह चंद्राला मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर बृहस्पतीतर्फे इंद्र व चंद्र यांच्यात लढाई चालू झाली, देव आणि दैत्य यांनी परस्परांवर भयानक शस्त्रे व अत्रे यांचे प्रयोग केले. त्यामुळे व संहारच्या भयाने विश्व ब्रह्मदेवाला शरण गेले; मग ब्रह्मचाने सर्वांमध्ये मध्यस्थी केली आणि समेट घडवून आणला. त्याप्रमाणे चंद्राने गुरूपत्नी तारा हिला परत पाठवावी असा सर्वानुमताने निर्णय झाला.
चंद्राने तारेला गुरूकडे परत धाडून दिली. तरी ती गरोदर असल्याकारणाने गुरू तिला घरात घेईना; मग तिने तो पुत्र एका झाडीत ठेवून दिला. तेव्हा तो बालक अत्यंत तेजस्वी आहे असे पाहून गुरू व चंद्र हे दोघेही त्याच्यावर हक्क सांगू लागले. अशा पेचप्रसंगी सर्वांनी तारला तो पुत्र कुणापासून झाला? असे विचारले असता ती लाजून काहीच न बोलता मान खाली करून बसून राहिलो. तेव्हा तो पुत्रच तिला शाप देण्यास तयार झाला.
असे पाहून ब्रह्मदेवाने तिला एकीकडे नेऊन विचारले असता तिने हळूच सांगितले की ‘चंद्रापासून’! तेव्हा चंद्राने त्याचे ‘बुध’ असे नाव ठेवले व तो त्याला घेऊन निघून गेला. इलेपासून बुधाला जो पुरूरवा नावाचा पुत्र झाला त्याची हकीकत पूर्वीच सांगून झाली आहे. पुरूरवा अत्यंत उदार व पराक्रमी होता.
ऊर्वशी नावाच्या एका अप्सरेला इंद्राने मृत्युलोकी रहाण्याचा शाप दिला होता. तिच्या दृष्टीला एकदा पुरूरवा पडला असता तिला तो आवडला. त्यालाही ती आवडली. त्याने तिला लग्नाविषयी विचारले असताना तिने त्याला तीन अटी घातल्या. त्या अशा
१. तिने दोन मेंढे पाळले आहेत ते रात्रंदिवस तिच्या सोबत रहातील .त्यांना दूर करू नये.
२. राजा कधीही नग्नावस्थेत तिच्या नजरेस पडता कामा नये.
३. ती केवळ तूप पिऊनच राहील.
या अटी राजाने कबूल केल्यानंतर ती दोघही साठ हजार वर्ष परस्परांच्या सहवासात राहिली. ऊर्वशी तर स्वर्गलोकाला विसरूनच गेली.तेव्हा तिला परत नेण्याकरता विश्वावसु गंधर्वाने इतर साथीदारांना सोबतघेऊन तिच्या पलंगाजवळचा एक मेंढा उचलून नेला.
ते जाणून ऊर्वशीने हाका मारल्या पण पुरूरवा काही उठला नाही. तेव्हा गंधर्वांनी दुसरा मेंढा उचलला. तेव्हाही उर्वशी विलाप करू लागली; मग मात्र काळोख आहे असे पाहून राजा उठला व तलवार घेऊन निघाला. तेव्हा गंधर्वांनी विजेचा लखलखाट केला व त्या उजेडात राजा नग्नावस्थेत दृष्टीस पडल्यामुळे ऊर्वशी तत्काळ निघून गेली व गंधर्वसुद्धा पळून गेले.
या घटनेचा धक्का बसून पुरूरवा वेड्यासारखा भ्रमिष्ट होऊन भटकत राहिला. त्यानंतर एकदा कुरूक्षेत्रातील सरोवरात नहाणारी ऊर्वशी त्याला दिसली व तो तिची विनवणी करू लागला.
तेव्हा तिने सांगितले की, “उगीच शोक करू नकोस. एका वर्षानंतर याच दिवशी मी तुला इथेच भेटेन आणि मला झालेला तुझा पुत्र तुला देईन. शिवाय एक रात्र तुझ्यासोबत राहिन.” तेव्हा राजा माघारी फिरला. त्यावेळी तिने त्याची ओळख मैत्रिणींशी करून दिली.
एक वर्ष उलटले तेव्हा राजा तिथे आला. ऊर्वशीने त्याच्या हातात ‘आयु’ नावाचा पुत्र दिला. त्याच रात्री ती राजाबरोबर राहिली व म्हणाली की, आपले दोघांचे गाढ प्रेम पाहून गंधर्वांची तुम्हाला वर देण्याची इच्छा आहे. तरी जे तुम्हाला हवे असेल ते मागून घ्या.
राजाने उत्तर दिले – “मी सर्व शत्रूंना नामोहरम केले आहे. माझे सामर्थ्य अजूनही अबाधित आहे. मला प्रियजन भरपूर आहेत. माझे सैन्य अफाट आहे व मला धनाची मुळीच कमतरता नाही. आता मी या ऊर्वशीच्या सहवासात कायम राहू इच्छितो.”
तेव्हा गंधवांनी त्याला एक हवनपात्र अग्रीसह देऊन सांगितले की, त्याने या अग्नीचे तीन भाग (गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणानी) असे करून ऊर्वशीच्या प्राप्तीसाठी या पात्रात यज्ञ करावा. म्हणजे त्याची इच्छा पुरी होईल, तेवढे ऐकल्यावर समाधानाने राजा परत फिरला पण त्याने ते हवनपात्र तिथेच ठेवले.
परतीच्या वाटेवर त्याला त्या पात्राची आठवण झाली म्हणून तो पुन्हा तिथे गेला पण ते पात्र त्या जागेवर नव्हते. मात्र एक पिंपळाचे रोप तेवढे उगवले होते मग राजा ते रोप सोबत घेऊन घरी निघून गेला. नंतर त्याने त्याच्या खोडापासून एक अरणी तयार केली.
त्या अरणीचे बोटाएवढे तीन तुकडे करून गायत्री मंत्राने अभिमंत्रित केले असता, त्यांचे प्रत्येकी ८ असे चोवीस तुकडे बनले; मग त्याने त्यांचे मंथन केले. तेव्हा त्यातून तीन प्रकारचे अग्नी प्रकट झाले; नंतर राजाने विधिपूर्वक ऊर्वशीची कायम प्राप्ती व्हावी असा संकल्प करून नाना तऱ्हेचे यज्ञ केले.
त्या यज्ञाचे फळ म्हणून राजा गंधर्व बनून त्या लोकात जाऊन ऊर्वशीसह कायम राहिला.
यापूर्वी फक्त एकच अग्नी होता. या मन्वंतरापासून अग्नीचे तीन विभाग प्रचारात आले.”
श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -४ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Vishnu Puran Miniche Charitra by Vijay Golesar