श्रीविष्णु पुराण अंश-५ (भाग-५)
कृष्ण, बलराम मथुरेत आगमन
केशी राक्षसाचा वध
वैदिक साहित्यात म्हणजेच वेद आणि पुराणात दोन चरित्रे लोकप्रिय आणि विश्व प्रसिद्ध आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची! श्रीविष्णु पुराणात रामायणाचा कथासार आपण थोडक्यात पहिला. श्रीविष्णु पुराणातील संपूर्ण ५ वा अंश श्रीकृष्ण चरित्राला वाहिला आहे. आज आपण श्रीविष्णु पुराणातील श्रीकृष्ण चरित्र भाग – ५ पाहणार आहोत.
केशी राक्षसाचा वध
कृष्णाचा घात करण्यासाठी कंसाने त्याच सुमारास केशी नावाच्या एका राक्षसाला वृंदावनात पाठवला. तो दैत्य भल्या मोठ्या घोड्याचे रूप धारण करून तिथे गेला. आपल्या खुरांनी जमीन उकरीत प्रचंड वेगाने धावत तो तिथे गेला.
त्याच्या खिंकाळण्याच्या आवाजामुळे घाबरून गेलेले लोक कृष्णाकडे धावून गेले. तेव्हा त्याने गावकऱ्यांना अभय दिले व सांगितले की, एका साध्या जनावराला भिण्याचे काही कारण नाही. धैर्य मात्र सोडू नका.
मग तो केशीसमोर गेला व म्हणाला – “अरे दुष्टा! पुढे ये. आज मी तुझे दातच पाडून टाकतो.” तेव्हा तो दैत्य जबडा वासून कृष्णावर धावला. त्यावेळी कृष्णाने हाताची मूठ वळवून संपूर्ण हात त्याच्या घशात घालून गरागरा फिरविताच त्या केशीचे सगळे दात मुळासकट उपटून पडले.
कृष्णाने हात लांब करीत त्या दैत्याच्या पोटापर्यंत घुसवला. शेवटी तो दैत्य रक्त ओकू लागला. त्याचे डोळे विस्फारले गेले. अंग शिथिल पडले. जीव जातेवेळी तो चारी पाय झाडू लागला. घामाने तो ओलाचिंब झाला. शेवटी कृष्णाने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही ओठ पकडले व त्याला उभा फाडून टाकला.
मग कृष्ण हसतच मागे फिरला आणि सगळ्या गवळणींनी व गवळ्यांनी त्याच्याभोवती फेर धरला. त्यावेळी आकाशातून ते दृश्य पाहत असलेले नारदमुनी आनंदित होऊन म्हणाले,
“हे जगनाथा! अच्युता!! तुझी धन्य आहे. देवांचा छळ करणाऱ्या या दुष्टाला तू सहज मारलास. मी तुझा पराक्रम पहावा म्हणून मुद्दाम स्वर्गातून इथे आलो. अरे मधुसूदना! तू या अवतारात जे चरित्र दाखवलेस व दाखवतो आहेस ते बघून माझे तर डोळे निवले.
अरे! या घोड्याने आकाशाकडे साधी नजर जरी फेकली तरी इंद्रासकट सगळे देव चळचळा कापत असत. तू या ‘केशी’ राक्षसाचा वध केल्यामुळे आजापासून सर्वत्र तू ‘केशव’ या नावाने प्रसिद्ध होशील.
हे अच्युता! आता मी जातो. तुझे कल्याण असो. पुन्हा जेव्हा तू मथुरेत जाशील तेव्हा मी तिथे तुझा पराक्रम डोळे भरून पहाण्यासाठी मुद्दाम येईन. तू देवांवर फार मोठे उपकार केले आहेस.”
एवढे सांगून नादरमुनी अदृश्य झाले.”
अक्रुराचे गोकुळात आगमन
पराशर मैत्रेयांना म्हणाले – “तिकडे कृष्णाच्या भेटीसाठी उत्सुक झालेला अक्रूर एका वेगवान रथात बसून मथुरेतून निघाला. तो मनात विचार करीत होता की,
किती भाग्यवान आहे मी. आज विष्णूचा अंशवतार असलेल्या कृष्णाला समक्ष भेटणार आहे. खरोखर माझ्या जन्माचे सार्थक होईल, ज्याचे फक्त नाव घेतल्यानेच माणूस पवित्र होतो, त्याला आज मी उराउरी भेटेन, जो वेदशास्त्रांचा जनक असून महातेजस्वी आहे आणि यज्ञभोक्ता आहे तो मला प्रत्यक्ष भेटेल.
शंभर यज्ञ करणाऱ्याला जो इंद्रपद बहाल करतो व ज्याचे संपूर्ण स्वरूपविधी हरिहरासह कुणीच जाणत नाही असा श्रीहरि आज मी उघड्या डोळ्यांनी बघेन. सर्वात्मा सर्वस्वरूपी, सर्व जाणणारा व चराचराला व्यापून उरणारा परमात्मा आज माझ्याशी सुखसंवाद करील, सात अवतार घेऊन ज्याने जगताचे रक्षण केले, त्याच्याशी आज मी प्रत्यक्ष बोलेन,
त्या अव्यय निराकार प्रभूने या वेळी कारणपरत्वे मानव देह घेतला आहे. आज तो माझ्याशी बोलेल. ज्याची सर्व जगाला भुलविणारी माया कुणीच जिंकू शकत नाही अशा त्या मायापतीला माझा नमस्कार असो! जो ती माया पार करण्यासाठी बळ देतो त्या हरिला नमस्कार! याज्ञिक लोक यज्ञपुरुष, (ज्याला) सात्वत लोक बासुदेव आणि वेदज्ञ लोक विष्णू अशा नावांनी जाणतात. त्याला मी वंदन करीन. मी त्याला शरण जाईन.
अशा तऱ्हेने विचारात गुंगून गेलेला अक्रूर जेव्हा गोकुळात पोहोचला तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. गावात प्रवेश केल्या केल्या त्याच्या दृष्टीला समोरच निळ्यासावळ्या रंगाचा कृष्ण गायी वासरांमध्ये खेळताना दिसला. त्याचे डोळे टपोरे होते. छातीवर वत्सचिन्ह होते. आजानुबाहू हात असून नाक बाकदार होते. मुखावर स्मितहास्य होते व तो एका शिळेवर बसला होता.
त्याच्या कमरेला व खांद्यावर दोन पितांबर होते. रानफुलांचे हार त्याच्या गळ्यात असून सफेद कमळे त्याच्या हातात होती. त्याच्याच एका बाजूला गोरापान व निळे वस्त्र नेसलेला बलराम उभा होता. उंचापुरा व धिप्पाड तरीही नयनमनोहर असा तो जणू काही निळ्या ढगांनी वेढलेल्या कैलास पर्वता प्रमाणे भासला.
त्या दोघांना पाहताच अक्रूराला आनंदाचे भरते आले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो मनात विचार करू लागला.
हा जो सावळ्या रंगाचा तरुण आहे तोच खरा विष्णूचा अवतार असावा. आज खरोखर माझे डोळे धन्य झाले परंतु तो मला जवळ करील काय? जर तसे घडले तर माझ्या देहाचे सार्थक होईल, ज्याचा ओझरता स्पर्श जरी झाला तरी पापांचे पर्वत विरून जाऊन पुरुष कैवल्यमोक्ष प्राप्त करतो, तो श्रीहरि माझ्या पाठीवरून आपला हात फिरवील काय?
याने अग्नी, वीज आणि सूर्य यांच्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राने दैत्यपतीच्या सैन्याचा संहार केला होता. बलिराजाने तर याला आचमनापुरते पाणी अर्पण केले व त्याच्या बदल्यात पृथ्वीतलावरील सर्व भोग तर भोगलेच शिवाय एका मन्वंतराएवढा काळ इंद्रपदही मिळवले होते.
असा हा श्रीविष्णू मला कंसाचा साथीदार समजून दूर ठेवील काय? त्याला माझ्या मनातील भावना कळणार नाहीत असे होणारच नाही; कारण तो सर्वांच्या हृदयातच आहे. तर मी आता त्याच्याजवळ भक्तिपूर्वक व श्रद्धापूर्वक शरणागत होऊन जातो; मग जे व्हावयाचे असेल ते होवो.
कृष्ण मथुरेत जाण्यास निघतो
आपल्या मनाशी विचार करीत अक्रूर चालत कृष्णापाशी गेला आणि स्वत:च्या नाव-गोत्रासह परिचय सांगून नमस्कार करून उभा राहिला. तेव्हा कृष्णाने त्याच्या हाताला धरून जवळ घेऊन आलिंगन दिले नंतर नमस्कार वगैरे सोपस्कार आटोपल्यावर कृष्ण त्याला घेऊन घरी गेला नंतर भोजन वगैरे आटोपून ते स्वस्थ बसले असता अक्रूराने कृष्णाला येण्याचा हेतू सांगितला.
तेव्हा कंसाचे अत्याचार, वसुदेव व देवकी यांची मानहानी, उग्रसेनाचा छळ यांचे वर्णन करून आमंत्रण देण्यामागचा कंसाचा कपटी कावासुद्धा सांगितला.
त्यावर कृष्णाने उत्तर दिले की, “हे दानपती अक्रूरा! मला आता पूर्ण कल्पना आली आहे. यापुढे मला जे करणे आवश्यक वाटेल ते सर्व मी करीन पण कंसाचे आयुष्य संपत आले आहे असे निश्चित समज. मी व हा बलराम तुमच्याबरोबर येण्यासाठी उद्याच निघतो. इतर काही प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आमच्याबरोबर असतील.
आज तू स्वस्थ विश्रांती घे. कसलीच चिंता करू नकोस, मी तुला वचन देतो की, फक्त तीनच दिवसांत मी कंसाला त्याच्या साथीदारांसह मारून टाकीन.’
दुसऱ्या दिवशी कृष्णाने मथुरेला जाण्याची तयारी आरंभली, ते वृत्त वाऱ्यासारखे वृंदावनात पसरले. तेव्हा जो तो हातातले काम टाकून नंदाच्या घरी धावत सुटला. त्यात गोपीसुद्धा होत्या. त्यांचे दु:ख फार मोठे होते. आता हा कृष्ण गेला की, पुन्हा कधीही येणार नाही; ही जाणीव त्यांना झाली होती.
त्या दुःखाच्या भरात शोक करीत असताना त्या गोपी विधात्याची, आपल्या दुर्दैवाची आणि अक्रूराची यथेच्छ निंदा करीत होत्या. त्यांना वाटत होते की, एकदा का कृष्ण नागरी वातावरणात रमला आणि तिथल्या सभ्य व सुसंस्कृत नागरिकांत मिसळून गेला की, त्याला इथल्या खेडवळ लोकांत परतून यावे असे वाटणारच नाही.
तिथल्या चतुर स्त्रिया कृष्णाला वश करून घेतील. त्यांचे लाडे लाडे बोलणे, उत्तम प्रतीचा साजशृंगार व चतुराई यांचा पुरेपुर वापर करून त्याला आपलासा करून घेतील; मग तो आम्हांसारख्या खेडवळ लोकांत का म्हणून परत येईल?
शिवाय इथले लोकसुद्धा कृष्णाला थांबविण्याचा प्रयत्न न करता उलट त्याला निरोप देण्याचीच तयारी करण्यात गुंगून गेले आहेत. आता करावे तरी काय? खरोखरच मथुरावासी लोकांचे भाग्य उदयास आले आहे. कृष्णासोबत जे लोक चालत आहेत, ते धन्य आहेत.
अशा प्रकारे गोपींचा शोक चाललेला असतानाच अक्रूराचा रथ धीरे धीरे दृष्टीआड झाला. दुपार पर्यंत ते यमुनेसमीप येऊन पोचले. तेव्हा अक्रूराने रथ उभा केला व बलराम व श्रीकृष्णांना काठावरच कदंब वृक्षाच्या तळी बसवून तो माध्यान्ह स्नान करण्यासाठी नदीत उतरला.
त्याचे स्नान व आचमन वगैरे आटोपून ध्यान करू लागला तेव्हा त्याने बलरामाला हजारो महासर्पांच्या घोळक्यात पाहिला. त्याच्या हजारो फणा होत्या आणि तो वेटोळे घालून डोलत होता. त्याच्याच बाजूला पावसाळी ढगांसारख्या अंगकांतीचा, चार हातांमध्ये शंख, चक्र वगैरे आयुधे घेऊन श्रीकृष्ण हसत उभा होता. कमरेस पीतांबर असून, गळ्यात वनमाळा आणि कानात मकरकुंडले होती. छातीवर बत्सचिन्ह होते व हजारो सिद्ध, मुनी व योगी त्याची स्तुती करीत उभे होते.
तेव्हा आश्चर्याने थक्क झालेला तो काही बोलणार होता पण प्रभूने त्याची वाचाच रोखून धरली. तेव्हा तो सावध होऊन देहभानावर आला आणि नदीतून बाहेर पडून राम-कृष्ण होते तिथे स्थापाशी आला. तेव्हा कृष्णाच्या अवतारित्वाची खातरी पटून तो श्रीकृष्णाची स्तुती करू लागला. तो म्हणाला
“हे सर्वात्मका! सर्वव्यापी देवा! तुला नमन असो. तू बुद्धीच्या पलीकडचा, प्रकृतीचा आधार, साकार झालेला व चराचरात्मक, इंद्रियांचा स्वामी आणि जीवात्मा व परमात्मा आहेस. अशा तुला नमन असो. सर्व ब्रह्मांडाचे एखादे वेळी वर्णन करणे शक्य आहे पण तू अवर्णनीय आहेस.
जिथे कल्पना पोहोचू शकणार नाही व शब्दसुद्धा मुके होतात ती अविकारी परब्रह्म अवस्था तू आहेस; परंतु नामरूपाहून वेगळ्या अशा तुझी स्तुती नावांनी आम्ही करीत असतो.
हे सर्व आभासात्मक विश्व तुझ्या आधारावरच असून तुझेच रूप आहे. सर्व देवतांच्या अंतर्यामी तूच आहेस. शक्तीच्या कमी-जास्त भेदाप्रमाणे नानाप्रकारे या जगाचा कारभार खरोखर तूच चालवतोस, सूर्य, त्रिगुण, प्रणव (ॐकार), वासुदेवा, प्रद्युम्ना, संकर्षण व अनिरुद्धा तुला पुन्हा- पुन्हा नमस्कार!
कृष्णाचा मथुरेत प्रवेश
अशाप्रकारे मानसपूजा आटोपून अक्रूर किनाऱ्यावर आला. तो कृष्णाला म्हणाला की, “आता निघायला हवे. उशीर झाला तर कंस रागावेल.” आणि त्याने अत्यंत वेगाने रथ चालविला व सायंकाळ होता होता ते मथुरेत पोहोचले.
मग त्याने कृष्णाला सांगितले की, “त्याने इथे उतरून चालत यावे. अक्रूर एकटाच रथ घेऊन पुढे जाणार आहे.”
बलराम व कृष्ण नगरीची मौज पहात राजमार्गावरून चालू लागले. वाटेत त्यांना कपड्यांचे बोचके घेऊन जाणारा कुणी एक धोबी दिसला. कृष्णाने त्याला थांबवून वस्त्रे मागितली. तो कंसाचा धोबी होता. त्याने वस्त्रे तर दिली नाहीतच पण उलट यथेच्छ दुरुत्तरे केली.
तेव्हा संतापलेल्या कृष्णाने त्याला हाताने एक फटका मारताच तो खाली पडून गतप्राण झाला; मग रामाने निळ्या रंगाचे वस्त्र व कृष्णाने पिवळ्या रंगाचे वस्त्र काढून घेतले व ते नेसून ते पुढे एका माळ्याच्या घरी गेले.
तिथे गेल्यावर त्यांनी माळ्याकडे फुले मागितली. तेव्हा माळ्याने त्यांचा आदरसत्कार केला आणि सुगंधी फुलांचे हार व गजरे अर्पण केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या कृष्णाने त्याला वर दिला व म्हणाला –
“अरे! तुझ्यापाशी लक्ष्मी चिरकालपर्यंत टिकेल. तुझे वैभव आणि सामर्थ्य कधीच कमी होणार नाही. आचंद्रसूर्य तुझा वंश चालत राहील. तू सुद्धा पुढे शेवटी माझ्या लोकांत येशील. तुझ्या वंशातील लोकांवर माझी सदैव कृपा असेल.” एवढे सांगून बलराम व कृष्ण पुढे चालू लागले.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-५) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Vishnu Puran Mathura Keshi Rakshas Vadh by Vijay Golesar